सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

सांगलीला लतादीदींचे स्मारक व्हावे


प्रसिध्द गानकोकिळा लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सांगलीशी असलेला संबंध, स्नेह, जिव्हाळा जतन करून ठेवण्यासाठी सध्या पडीक असलेल्या सांगलीतल्या दीनानाथ नाट्यगृहात लतादीदींचे स्मारक बनवण्यात यावे. तसेच याठिकाणी संगीत अकादमी, कला व प्रदर्शन केंद्र तसेच नाट्यगृह असा बहुउपयोगी म्हणून वापर केला जावा, अशी अपेक्षा आहे. लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटूंबियांचे सांगलीला वास्तव्य होते. याची स्मृती जतन करून ठेवणे गरजेचे आहे. लता मंगेशकर म्हणजे भारत वर्षाला पडलेले स्वप्न आहे. भारतरत्न लतादीदींनी विविध 32 भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. भारतीय सिनेमाच्या उन्नतीच्या त्या साक्षीदार आहेत. अशी असामान्य व्यक्ती पुन्हा होणे नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणादायी ठरावी, यादृष्टीने हे स्मारक अस्तित्वात येणे आवश्यक आहे. सध्या सांगलीतील दीनानाथ नाट्यगृह स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कालाप्रेमींच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे. 2000 साली याच नाट्यगृहाचे लतादीदींच्या हस्ते नूतनीकरण झाले होते.शिवाय याठिकाणी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही झाले होते. मात्र नंतर हे नाट्यगृह अडगळीतच पडले आहे. त्याची खूप मोठी दुरवस्था झाली आहे. आता इथे कुठलेच कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे याठिकाणी लतादीदींचे स्मारक व्हायला काहीच हरकत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली