गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

उच्च शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी चिंताजनक

बेरोजगारीचा दर घसरल्याच्या बातम्या येत असतानाच दुसरी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे  पदवीचे शिक्षण पूर्ण करूनही, पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाचे ४२ टक्के तरुण अजूनही नोकरीच्या शोधात आहेत. रोजगाराच्या संधी वाढवल्याचे सरकारचे दावे किती पोकळ आहेत, हेच यातून दिसून येते. अझीम प्रेमजी विद्यापीठाने जारी केलेल्या 'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया' नावाच्या ताज्या अहवालातही बेरोजगारीचा मुद्दा आवश्यक तितक्या गांभीर्याने घेतला जात नसल्याचे सूचित केले आहे. आपल्या तरुणांना नोकरीच्या शोधात भटकंती का करावी लागत आहे, हा मोठा प्रश्न आहे.

चिंताजनक परिस्थिती अशी आहे की आपल्या धोरणकर्त्यांनी बेरोजगारी कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न केवळ वरवरचे ठरत आहेत. रोजगाराला शिक्षणाशी जोडले तर हे स्पष्ट होते की, जो जितका जास्त शिक्षित असेल त्याच्यासमोर तितकीच बेरोजगारीची समस्या जास्त दिसून येते. रोजगाराचा शिक्षणाशी सकारात्मक संबंध असला, तरी देशातील रोजगाराची परिस्थिती ही वस्तुस्थिती नाकारणारी दिसते. अहवालात म्हटले आहे की देशातील केवळ 8 टक्के निरक्षर आणि कमी शिक्षित लोक बेरोजगार आहेत, तर पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील बेरोजगारीचा दर त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 16 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 25 वर्षांपर्यंतच्या पदवीधरांमध्ये, हा दर 42 टक्के आहे. रोजगाराअभावी आपल्या सुशिक्षित तरुणांमध्ये किती नैराश्य आणि निराशा वाढत असावी, याचा सहज अंदाज येऊ शकतो. 

असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की पदवीधर आणि अधिक शिक्षित तरुणांना नोकरीच्या बाबतीत काहीशा आवडी-निवडी असतात. याशिवाय त्यांच्या पगाराच्या अपेक्षाही काहीशा जास्त आहेत.  खरी गोष्ट अशी आहे की तरुणांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षांनुसार ना बाजारात मागणी निर्माण होत आहे ना रोजगार निर्माण होत आहेत. सरकारच्या स्वयंरोजगार योजनांपासून दूर राहण्याचे मुख्य कारण म्हणजे कौशल्य विकासाला चालना देण्याचे प्रयत्न त्यात दिसत नाहीत. 

बेरोजगारीचा दंश तरुण पिढीला गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलत आहे हीदेखील एक मोठी समस्याही आहे. सरकारने नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर नाहीतच पण खाजगी क्षेत्राला अशा संधी वाढवायला सांगण्याचे कामदेखील केले नाही. अहवालाचा चांगला पैलू म्हणजे कमी शिक्षित आणि अशिक्षित लोकांची रोजगाराची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी कुशल व्यक्तींसाठीही रोजगाराच्या संधी वाढवण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा