बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

चांगल्या सवयींचा विकास


कुटुंबातून आत्मसात केलेली मूल्ये आणि नातेवाइकांच्या जवळून मिळालेल्या उत्तम सवयी या आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीला कारणीभूत असतातच शिवाय जीवनाची दिशाही ठरवतात.  दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, चांगल्या सवयी केवळ चांगले भविष्य घडवत नाहीत, तर त्या एक उत्तम व्यक्तिमत्त्वही घडवतात.  चांगल्या सवयी चांगल्या जगण्याच्या दृष्टीने खूप प्रभावी आहेत.  विचार करा, काही लोक खोटेपणाचा अवलंब केल्याशिवाय त्यांच्या जीवनातील कोणतंही काम सुरू करू शकत नाहीत;  काही लोक निंदा करणं, चुगली करणं आणि निरर्थक बडबड करणं यातच आपला सगळा वेळ खर्ची घालतात.त्यांना त्यातच मजा येते.त्यातच त्यांना आनंद वाटतो.  काहींना लोकांना इच्छा असूनही आपल्या जुन्या सवयी,खोडी सोडता येत नाहीत.

प्रख्यात अमेरिकन पत्रकार चार्ल्स डूहिग यांनी आपल्या प्रसिद्ध ' द पॉवर ऑफ हॅबिट' या पुस्तकामध्ये, सवयींचा थरारक आणि महत्त्वाचा प्रवास सप्रमाण मांडला आहे.  कोणत्या प्रकारच्या सवयी माणसाला त्याच्या कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करतात, हेही स्पष्टपणे नमूद केले आहे.

किंबहुना, काही कुरापत काढणारी डोकी तोपर्यंत शांत बसत नाहीत, जोपर्यंत  एखाद्याचे जीवन पार ढवळून निघत नाही. अशा लोकांची गणना विघ्नसंतोषी श्रेणीत केली जाते.  मानवी जीवन चांगल्या सवयींच्या अभावी कलंकित,बदनाम होते आणि वाईट सवयी नसल्यामुळे तेच जीवन सुंदर होते.  चांगल्या सवयींमुळे माणसामध्ये निरोगी विचार आणि सकारात्मक शक्ती विकसित होते. चांगल्या सवयी असतील तर जीवनावर विधायक  परिणाम होतात आणि वाईट सवयी असतील तर नकारात्मक परिणाम. जीवन आनंदी, समाधानी असावे असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे  चांगल्या  व्यक्तींची संगत आणि चांगली सवय अंगी बाणवली गेली पाहिजे. जीवनात आळस, क्रोध, कलह, चिंता, आणि भीती असेल तर बहुतेक वेळा विचार आणि सवयी तपासून बघितल्या पाहिजेत. वास्तविक, मोठ्या माणसांच्या किंवा  दिग्गजांच्या अभूतपूर्व यशाची ही गुरुकिल्ली आहे.  असंख्य सेलिब्रिटींच्या यशाचे रहस्य म्हणजे स्वतःमध्ये सतत चांगल्या सवयींचा विकास करणे.  चला तर मग वाईट सवयी सोडून देऊया आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने चांगल्या सवयी आत्मसात करूया आणि या पृथ्वीला आणि आपल्या जीवनाला संस्मरणीय बनवूया.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा