मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

गावागांतील जैवविविधतेची माहिती लोकांसमोर यावी


जैवविविधता हे निसर्गाचे महत्त्वपूर्ण अंग आहे.  गावागावांमध्ये जैवविविधतेबाबत  जागरूकता असणे आणि त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येक गावाच्या परिसरात विविध वनस्पतींच्या जाती, प्रजाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्या नोंदी गावपातळीवर होणे आवश्यक आहे.  या माध्यमातून लोकांनाही जैवविविधतेबाबत सखोल ज्ञान प्राप्त होईल. तसेच हा एकत्रित ठेवा भावी पिढय़ांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आपापल्या गावातील जैवविविधता नोंदविण्यासाठी  प्रशासकीय स्तरावरील कृषी सल्लागार, ग्रामसेवक यांना प्रशिक्षण दिले जावे. याशिवाय परिसरातील जैवविविधतेबाबत जागरूक असलेल्या किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी.या माध्यमातून गावातील जैवविविधतेची वेगळी ओळख सर्वांसमोर येण्यास मदत होईल. जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जतन करणे व त्याच्या नोंदवह्या बनवणे ही काळाची गरज आहे. जैवविविधतेचे जतन, संरक्षण व संवर्धन होण्यासाठी तसेच जैविक संसाधनांच्या शाश्‍वत वापरासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. जैविक संसाधनांचा व्यावसायिक वापर केल्यावर मिळणार्‍या लाभांचे न्यायी व समन्यायी वाटप होण्याकरिता जैविक विविधता कायदा 2002 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार जैविक संसाधनांचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करावयाची आहे. समितीमार्फत गावनिहाय जैव विविधता नोंदवही तयार केली जावी, असेही सुचवण्यात आले आहे. जैविक संसाधन व त्याच्या वापरासंबंधी व्यक्तींच्या पारंपरिक ज्ञानाव्दारे घेतल्या जाणार्‍या स्वामित्त्व हक्कावर बंधणे आणण्यासाठी ही नोंदवही तयार करणे आवश्यक आहे. मूळ स्थानिक वाण व त्याची जतनपध्दती काळाच्या ओघात नाहीशी होऊ नये यासाठी करण्यात येणार्‍या प्रयत्नांचा भाग म्हणून ही नोंदवही अत्यावश्यक बनली आहे.  यामुळे परिसरातील संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण होण्यास मदत होईल. अन्यथा जागतिक तापमान वाढ, जंगल तोड, अवैध खाणकाम, शिकार, जंगलातून होणारे घाट रस्ते याचा दुरगामी परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागण्याची शक्यता आहे. आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहे. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक सपंत्तीचा अर्मयाद वापर यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधन संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसर्‍यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा