शनिवार, ८ जानेवारी, २०२२

प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य


 सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूने तिच्या उत्तरात म्हटले होते, 'प्रत्येक तरुणाने स्वतःचा आवाज  बनला पाहिजे. स्वतःची इतरांशी तुलना करणे निरर्थक आहे.  तुम्ही अद्वितीय आहात, तेच तुम्हाला उत्तेजन देते.' म्हणजेच तुम्ही चांगले आहात, प्रत्येकजण चांगला आहे.  कोणीही वाईट किंवा कुणीही निरुपयोगी नाही.  प्रत्येक ऋतू आपापल्या जागी उपयुक्त असतो - सूर्यप्रकाश शरीरासाठी फायदेशीर असतो, पाऊस शरीर आणि मनाला तजेला देतो, वारा मूड प्रसन्न करतो आणि हिमवर्षाव एक विलक्षण आनंद देतो.  त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूचे आणि जीवाचे स्वतःचे असे महत्त्व आहे.म्हणून, एकाला दुसर्‍यापेक्षा कमी किंवा जास्त लेखू नका. सगळ्यांचे सारखे महत्त्व आहे. प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य आहे. चाकू धारदार आहे, पण झाड कापू शकत नाही.  कुऱ्हाड मजबूत आहे, परंतु केस कापू शकत नाही.
कुणी योग्य किंवा अयोग्यदेखील नसतो, फक्त हेतू आवश्यक आहे.  अमेरिकन लेखिका हेलन केलर म्हणते, 'मी सर्वकाही करू शकत नाही, परंतु मी जे करू शकते ते करणे मी कधीही सोडणार नाही.' कोणीही परिपूर्ण नसतो, परंतु प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने परिपूर्ण असतो, अव्वल असतो. हीच गोष्ट आपल्या प्रत्येकाला खास बनवते.
इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स असे स्पष्ट करतात की, 'एक छोटीशी चावी एका झटक्यात एक मोठा आणि जड दरवाजा उघडू शकते.' म्हणजेच एक लहान किंवा विनम्र दिसणारा माणूसही त्याच्या चारित्र्याने, त्याच्या उपयुक्ततेने भारी-भक्कम व्यक्तीला मागे टाकू शकतो.  एक निश्चित आहे की इतरांशी तुलना किंवा स्पर्धा केल्याने, अनावश्यक दबाव मात्र वाढतो.  प्रत्येकाची काम करण्याची आपली एक गती असते.  हळू चालल्यानंतरही एकादा न थांबताही पुढे चालत राहतो, म्हणजेच समजा की तो सर्वात वेगाने चालतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा