मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

आता शाळा बंदच ठेवा


राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत 15 दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.हा त्यांचा निर्णय योग्यच आहे.कारण आता राज्यात विशेषतः ग्रामीण भागात रोज सरासरी 40 हजाराने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुढचे काही दिवस धोक्याचे असल्याचे  अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याची घाई करू नये. हां, शाळा बंद करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला हे मान्य! शाळा बंद करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असते तर योग्य ठरले असते. या चर्चेत आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. आणि इकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईचा रुग्ण वाढीचा वेग कमी आला आहे. तिथे या वेगाचा स्फोट झाला असता तर त्याचा फटका राज्यातला ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला असता. सुदैवाने महापालिकेच्या यंत्रणेला यश येत आहे,यासाठी त्यांचे कौतुकच करावे लागेल. दुसरी एक बाजू म्हणजे शाळा बंदच्या काळात शिक्षकांना  शाळेत पूर्ण वेळ 100 टक्के  उपस्थिती दाखवून ऑनलाईन अध्यापन करण्याचे आदेश अनेक जिल्ह्याच्या प्रशासनाने दिले आहेत. हा आदेह मात्र शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. शाळेच्या वेळेत मुलांकडे मोबाईल असत नाही.पालक मोबाईल घेऊन कामावर गेलेले असतात.त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ठप्प आहे. मात्र बरेच शिक्षक यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि अध्यापनाचे धडे देत आहेत. आता कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शाळा,पालक आणि शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये. शासनाला मुलांचा जीव महत्त्वाचा वाटतो, यात काय चुकीचं आहे?-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा