सोमवार, २० एप्रिल, २०२०

भारतात दारिद्र्य आणखी वाढणार

कोरोना संसर्ग गेल्या महिन्याभरात कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. ही बाब मोठी चिंताजनक आहे.या महामारीचा सर्वात मोठा फटका का  दारिद्रयाशी झगडणाऱ्या आपल्या भारताला बसणार आहे . आधीच एका आकडेवारीनुसार भारतामध्ये ८५ कोटी २० लाख लोक दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत . कोरोना महामारीमुळे यात आणखी १० कोटी ४० लाख लोकांची भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे . यामुळे गरिबांची संख्या आणखी ८ टक्क्यांनी वाढून तब्बल ९१ कोटी ५० लाख होणार आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे वर्ल्ड बँकेच्या मापदंडानुसार जो माणूस दर दिवशी ३.२ डॉलर म्हणजे २४४ रुपये कमाई करतो तो गरीब समजला जातो . भारतात मजुरांना दर दिवशी १७५  रुपये मजुरी मिळावे असे केंद्र सरकारने नक्की केले आहे . म्हणजे  भारतातील करोडो मजूर कुठल्या परिस्थितीत जगत आहेत हे दिसून येते .भारतात सध्या एकूण लोकसंख्येच्या  साठ टक्के  लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. लॉक डाऊननंतर ही टक्केवारी 68 वर जाईल.  वर्ल्ड बँकेने गरिबीचे हे मापदंड युरोप आणि अमेरिकेतील देशातील लोकांकडे पाहून ठरविलेले आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७८ हजार ४३८ रुपयांपासून तीन लाख रुपयापर्यंत म्हणजेच ३ हजार ९९५ डॉलर एवढे असेल तर तो लोअर मिडल क्लासमध्ये मोडतो . भारताला हा मापदंड कधीच लागू होऊ शकत नाही . भारतातील मिडल क्लास लोकांचे उत्पन्न या मापदंडपेक्षा खूपच कमी आहे . ज्यांचे उत्पन्न वर्षाला १२ हजार ३७५ डॉलर आहे . म्हणजेच दहा लाख आहे , तो अप्पर मिडल क्लास मध्ये मोडतो . हा वर्ल्ड बँकेचा मापदंड आहे . भारतात प्रचंड दारिद्र्य असल्यामुळे पाश्चिमात्य आणि भारताच्या गरीबीच्या मापदंडात प्रचंड तफावत आहे . त्यात आता कोरोना महामारीचा फटका बसल्याने भारतातील गरिबांची परिस्थिती आणखीनच कमजोर होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा