सोमवार, ४ मे, २०२०

मोठ्या शहरांमध्ये सायकल संस्कृती रुजवावी

मुंबई, पुण्याबरोबरच राज्यातल्या मोठ्या शहरातील सर्व प्रकारच्या वाहतूकव्यवस्थेला शिस्त लावायची असल्यास लॉकडाऊनचा फायदा उचलत पालिकांनी आपल्या अधिकारात पदपथ सामान्य नागरिकांसाठी मोकळे करावेत तसेच सायकल संस्कृती रुजवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. यामुळे पादचारी लोकांना मोकळा श्वास मिळेल आणि वातावरण प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल.
पादचारी हा वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या दृष्टीने राज्यातील मोठ्या शहरांमधील  वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यास पालिका कमी पडल्याचे अनेक वाहतूकतज्ज्ञांचे मत आहे. एकट्या मुंबई शहरातील वाहनांची संख्या ३७ लाखांपार गेली असून, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हास ध्यानात घेऊन नागरी सुविधांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही व्यवस्था बळकट करायची असल्यास पादचार्‍यांमध्ये शिस्त आणण्याची गरज असून त्यासाठी त्यांना पदपथ मोकळे करून देणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमध्ये सायकलसंस्कृती रुजवल्यास वाहतूक व्यवस्थेत सायकलचा पर्याय सर्वाधिक सुरक्षित ठरू शकतो. तसेच शहरांतील बहुतांश पदपथ अनधिकृत बांधकामांनी व्यापले असून पादचार्‍यांना रस्त्यांवर येऊन चालावे लागते. परिणामी अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊनचा वापर कोरोनापश्‍चात सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी   राज्यांमधील पदपथ पालिकांनी आपल्या अधिकारात नागरिकांसाठी मोकळे करून घ्यावेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्थेतील पादचार्‍यांची भूमिका, नियम, फायदे नागरिकांपर्यंत जोरकसपणे पोहोचवावेत. याशिवाय  सायकलसेवा टप्प्याटप्प्याने राज्यांमधल्या मोठ्या शहरांमध्ये राबवावी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा