रविवार, १० मे, २०२०

हा तर कसोटीचा काळ

लॉकडाउन शिथिल केल्यानंतरचे चित्र अस्वस्थ करणारे आणि धोक्याची सूचना देणारे आहे.  आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या हजारो तरुणांवर वाहने जप्त करून कारवाई केली. ती अद्याप सुरूच आहे. काहीजण मास्क न वापरता बाहेर पडताहेत. काम नसतानाही बाहेर पडणारे अनेकजण आहेत. बाहेर आल्यानंतर सामाजिक दुरावा प्रत्येकाने पाळायलाच हवा; पण काहीजण त्याचेही पालन करताना दिसत नाहीत. पुण्या-मुंबईतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांची बेकायदा घुसखोरी सुरू आहे. सारेच घरात असल्यामुळे लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या
आवर्तनात संसर्गाचा जास्त धोका उद्भवला नाही; पण लॉकडाउन ३.०  मध्ये तो धोका अधिक आहे आणि याच टप्प्यावर जबाबदारीची जाणीव  कमी झाल्याचे चित्र आहे.
कामानिमित्त, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी  वाढत आहे. उद्योग सुरू झाल्याने वर्दळही वाढणार आहे. कोरोनाच्या  महासंकटाने अनेक क्षेत्रात दूरगामी परिणाम होणार आहेत आणि त्याचा  फटका कमीअधिक प्रमाणात प्रत्येकालाच बसणार आहे. त्यामुळे यातून  शक्य तितक्या लवकर राज्य मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  मात्र, या प्रयत्नांना आपण सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर संकटाचा
धोका आणि कालावधी आणखी वाढणार, यात शंका नाही. हे सर्व लक्षात  घेता अधिक जवाबदारीने वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मास्क व  सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्स पाळणे, कामाशिवाय बाहेर न  पडणे, हात वारंवार धुणे या सवयी आता आपल्या सामाजिक संस्काराच्या  आणि वैयक्तिक जगण्याचा अविभाज्य घटक बनल्या पाहिजेत तेही
दीर्घकाळासाठी वा कायमस्वरूपी... जनजागृती, त्यास प्रतिबंधात्मक उपायांची कृतिशील जोड आणि  सामाजिक उत्तरदायीत्व ही त्रिसूत्रीच आपणास 'कोरोना'विरुद्धचा लढा  जिंकण्यास बळ देईल; अन्यथा परिस्थिती हातबाहेर गेल्यास त्याला 'उत्तर'  देण्यास आणि त्याची 'उत्तरे' शोधण्यास आपल्याकडे वेळ किती असणार  आहे? म्हणून या कसोटीच्या काळातच आपली कसोटी लागणार आहे  आणि यात आपण यशस्वी होण्यासाठी शिकस्त करूया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा