मंगळवार, १९ मे, २०२०

मोबाईलवर 'शिक्षण' विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसाठी घातक!

शिक्षण विभागातीकडून सध्या 'लर्न फ्रॉम होम' उपक्रम राबवण्यात येत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विद्यार्थ्यांना 'स्मार्ट शिक्षण' हे 'स्मार्ट फोन' च्या माध्यमातून देण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र  या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकतात. काही अतिउत्साही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या डोक्यातून विद्यार्थ्यांकरिता 'लर्न फ्रॉम होम'ची कल्पना पुढे आली आणि तिच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकार्‍यांकडून अट्टाहास सुरू झाला आणि कालपर्यंत विद्यार्थ्यांना मोबाईल बघायला मनाई करणारे गुरुजीच 'मोबाईल पहा रे' मुलांनो असे आवर्जून विनवणी करू लागले.
परंतु या उपक्रमाचा अट्टाहास धरताना त्यामधून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. याशिवाय ज्यांच्याकडे मोबाईल नव्हता, ती मुलेसुद्धा घरच्यांना मोबाईल घेऊन देण्यासाठी अट्टाहास करू लागले आहेत. मोबाईलचा वापर हा लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे सर्वश्रुत असताना त्याच्या वापरासाठी शिक्षक व पालकांकडूनच आग्रह धरला जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांना मोबाईलमुळे डोळे व कानाचे आजार होऊ शकतात. मुलांचे डोळे आळशी होण्याचा धोका असतो. अलीकडेच झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार राज्यात सव्वा लाख मुले या आजाराची शिकार झाल्याची बाब पुढे आली आहे. मुलांची 'कल्पनाशक्ती कमी होणे, दूरवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नाहीशी होणे, भूक न लागणे, झोप न लागणे, मानेचे आजार होणे, सर्जनशीलता व सौंदर्यदृष्टीचा र्‍हास होणे, एकलकोंडेपणा वाढणे, कानाचे आजार व दृष्टिदोष' होणे अशाप्रकारचे अनेक दुष्परिणाम मोबाईलच्या वापरामुळे होत असतात. एवढेच नाही तर मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकवेळा मुलांना मानसिक समस्यासुद्धा निर्माण होतात. या सर्व बाबींची जाणीव शिक्षक व पालकांना असूनही 'लर्न फ्रॉम होम' या उपक्रमामुळे त्यांच्याकडूनच मुलांना मोबाईल बघण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
हे सर्व करीत असताना एका अर्थाने पालक व शिक्षक या मुलांना स्वत:हून आजाराच्या खाईत लोटत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात आपण विद्यार्थ्यांकरिता विविध शैक्षणिक उपक्रम राबविले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला, या बाबी सिद्ध करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक करीत असून त्याबदल्यात ते विद्यार्थ्यांचे भविष्य मात्र डावावर लावत आहे. मोबाईलवर शिक्षण द्यायला काही हरकत नाही,पण त्याच्या वेळेची मर्यादा द्यायला हवी. टीव्ही, रेडीओ अशा तुलनेने स्वस्त आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करायला हवा. आणि मुळात म्हणजे याचे प्रशिक्षण द्यायला हवे. प्रशिक्षण न देताच, अशा प्रकारचे शिक्षण सुरू झाले आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण द्यायला हवे, नाहीतर ही पिढी शारीरिक आणि मानसिक दृष्या कामातून जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा