शुक्रवार, ८ मे, २०२०

कोरोना आणि कॅशलेस इंडिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापासून सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' चा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. 'बँकिंग' व्यवसायाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. संसर्ग टाळण्यासाठी बँका ऑनलाईन बँकिंगचा वापर करण्यासाठी आवाहन करत आहेत. तरूण पिढी मोबाईल बँकिंगचा सध्या वापर करतच आहे. नोटांबंदीनंतर ऑनलाईन बँकिंगला सुरुवात झाली असली तरी त्याला आता आणखी वेग येण्याची गरज आहे. लॉक डाऊन आणि संचारबंदीच्या काळात मोबाईल बँकिंगचा सर्वाधिक वापर झाला असला तरी त्याला अजून मर्यादाच आहेत. मोबाईल बील, वीज बिल, डिश रिचार्ज, कर्जाचे हफ्ते, विमा, वाहन विमा अशा गोष्टी मोबाईल मधून करता येत आहेत.
मात्र अन्य आवश्यक ठिकाणीही याचा वापर व्हायला हवा आहे. मोबाईल बँकिंग ही सुविधा फक्त शहरी भागात मोठ्या प्रमाणात तीही मोबाईल साक्षर लोकांमधून वापरली गेली किंवा जात आहे.  आता ग्रामीण भागातील ग्राहकांना देखील मोबाईल बँकिंगचा वापर करण्यासाठी साक्षर होण्याची गरज आहे. मात्र बँका आता नेट बँकिंगचा आग्रह धरत आहेत. इथून पुढे कायमच कॅशलेस व्यवहार साठी बँका आग्रही राहणार असेच दिसत आहे. बँका सध्या अडचणीत सापडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बँकांना कर्जाचे हफ्ते तीन महिने पुढे ढकलावे लागले आहेत. मात्र त्यापुढेही हफ्ते वसुली कशी होणार असा प्रश्न आहे. अनेक नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना 50 टक्के पगारावर काम करावे लागत आहे. हफ्ते वसुलीसाठी कर्जदाराच्या दारात जाण्यास आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे बँकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. पुढे आणखीही काही महिने होणार आहे. त्यांना ठेवींच्या व्याजाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. लॉक डाऊन काळात पैसे भरायला येणाऱयांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कर्जाचे हफ्ते किंवा पैशांचा व्यवहार कॅशलेस पद्धतीने व्हावे, असे बँकांना वाटत आहे. मात्र यासाठी ग्राहकांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. शिवाय सायबर क्राईमचा आलेखही वाढतो आहे. याकडेही बँका, सायबर क्राईम ब्रँच, पोलीस आणि शासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे सर्व व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी कॅशलेस व्यवहार वाढला पाहिजे, पण संभाव्य धोक्यांचाही विचार झाला पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा