गुरुवार, १४ मे, २०२०

सकारात्मक विचारांची गरज

ऑरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याचा आनंद व दुःख हे समाजाला धरून असते. लॉकडाउनच्या काळात माणसं समाजापासून अलिप्त राहिली. अशा परिस्थितीत काहींच्या मनात नकारात्मक मानसिकता तयार होत असते. लॉकडाउनचा कालावधी जास्तच वाढल्याने अनेकांना भविष्याची चिंता लागून राहिली. अनेकांचे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यही धोक्यात आले आहे. याचे दूरगामी परिणाम सर्व क्षेत्रांवर होणार आहेतच. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.
आतापर्यंत आपण जी जीवनशैली अंगीकारत आलो आहोत, येथून पुढे तशी जपता येणार नाही, आपली नोकरी गेली तर आपल्या कुटुंबाचे काय होणार, अशा प्रश्नांची मालिका तयार झाली. आर्थिक स्थिती अत्यंत खालवत गेली तर दडपण येण्याची मानसिकता तयार होते. अशा नकारात्मक मानसिकतेतून टोकाचे पाऊल उचलले जाते; मात्र त्यावर सकारात्मक विचारांचे सातत्याने शिंपण केल्यास या टोकाच्या पाऊल उचलण्यापासून अनेकांना माघारी ओढता येणे नक्कीच शक्य आहे. विशेषतः तरुणांनी येणाऱ्या संकटांना सकारात्मक विचारांनी सामोरे जाऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, हेच भविष्यकाळातील मोठे आव्हान असणार आहे.
काहींचे मानसिक खच्चीकरणही झाले. आर्थिक कोंडीमुळे घुसमट झाली. यातून बाहेर पडण्यासाठी जरी मार्ग सापडत नसला तरी त्यातून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल मुळीच उचलण्याची आवश्यकता नाही. आत्महत्या ही एक ज्वलंत सामाजिक समस्या आहे. आत्महत्येमागे विविध बाबी, कारणे असू शकतात. खरेतर आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे आणि कायद्यानेही गुन्हा आहे; मात्र तरीही हे टोकाचे पाऊल उचलले जाते. अशा कृत्याने कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. यातून कशाप्रकारे मार्ग काढता येईल, यावर शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार करून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पराभूत मनोवृत्तीने संकटाला सामोरे जाण्यापेक्षा संकटांचा सामना निडरपणे करण्यासाठी स्वतःला तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा