दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले देशातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे दिवाळी. दिव्यांची आरास आणि फटाक्यांची आतिषबाजी म्हणजेच दिवाळी. दिवाळी सुरू झाल्याने आता फटाक्यांचीही चर्चा सुरू झाली आहे. बेरियमयुक्त फटाक्यांवर बंदी केवळ दिल्ली-एनसीआर क्षेत्रापुरती मर्यादित नसून ती देशातील प्रत्येक राज्यासाठी आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या आदेशाचे पालन करण्याकडे राज्य सरकारांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाची चिंता समजून घेण्याची गरज आहे कारण वायू प्रदूषणाची समस्या फक्त दिल्लीची नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवाही खालावली आहे. दिवाळीत फक्त सायंकाळी तीन तास फटाके उडवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
तापमान कमी झाल्यामुळे आर्द्रता वाढते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे प्रदूषणही वाढते. दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके फोडल्याने प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होत आहे. हवेतील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते, जे अनेक रोगांचे कारण बनते. यामुळेच दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे आणि इतर राज्यांना फक्त बेरियम मुक्त हिरवे फटाकेच वापरले जातील याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. दीपोत्सव सुरू झाला आहे. फटाक्यांची दुकाने सजली आहेत.या परिस्थितीत, बेरियमयुक्त फटाके लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत हे आता सोपे राहिलेले नाही. ती अगोदरच पोहचली आहेत. अशा फटाक्यांची निर्मिती कडकपणे थांबवली असती तर कदाचित ते बाजारपेठेत पोहोचू शकले नसते. सर्व निर्बंध असूनही, आपल्या देशात कायदे आणि नियमांकडे दुर्लक्ष करण्याची सवयच आहे. फटाक्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीतही असेच झाले आहे. याचे कारण म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात मात्र ती पाळली जात नाहीत. पर्यावरण प्रदूषणाच्या इतर घटकांना सामोरे जाताना सरकारची हीच वृत्ती दिसून येते. किंबहुना, प्रदूषणाबाबत तितकीच काळजी आणि ते कमी करण्याच्या प्रयत्नांची बांधिलकी असल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. सण साजरे करण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी असतो हेही जरी खरे असले तरी आनंदाच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळू देऊ नये.हीदेखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
दिवाळीत फटाके फोडण्याबाबत आणि बंदी वगळता इतर ठिकाणी बेरियममुक्त आणि मर्यादित प्रमाणात फटाके फोडण्यात कोणतीही हानी नाही. नियोजित वेळेनंतरही फटाके फोडले जातात ही चिंताजनक बाब आहे. घर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, ते स्वतःच नियम-कायदांबाबत बेफिकीर होतात. ही मानसिकता घातक आहे.
प्रदूषणामुळे कोणकोणते आजार होतात आणि आयुष्य किती वर्षांनी कमी होते,याची आकडेवारी संबंधित विभाग नेहमीच देत असतो, मात्र तरीही कायदे करणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे भारत प्रदूषणाच्या बाबतीत सध्या जगात एक नंबरवर पोहचला आहे. याकडे अजूनही आपण गांभीर्याने पाहिले नाहीतर पुढची पिढी आपल्याला अजिबात माफ करणार नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा