शुक्रवार, १५ मे, २०२०

बांधकाम व्यवसायाला चालना मिळायला हवी

लॉकडाऊन वाढल्यामुळे उत्पादन, बेरोजगारी, मजुरांचे स्थलांतरण या सर्व गोष्टीत वाढ झाली. लॉकडाऊनमुळे सर्वात मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. लॉकडाऊननंतर ज्या बांधकाम मजुरांचे पोट हातावर होते त्यांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. शिवाय बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील मजूर  आपापल्या गावी ,राज्यात गेल्याने आता काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण होणार आहे. आपल्या गावी परतलेले मजूर पुन्हा परत येतील याचीही काही निश्‍चिती राहिली नाही.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक बांधकामाला सुरुवात करतात किंवा घर खरेदी करतात परंतु यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे हा मुहूर्तही बांधकाम व्यावसायिकांना हुलकावणी देणाराच ठरला आहे.
संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने अक्षय्य तृतीयेच्या सणानिमित्त अनेक आकर्षक सवलीत देऊनही बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळालेला नाही. अनेक शहरात अजूनही बांधकामांना सक्षमतेने परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच दोन महिने अनेकांचे पगार नसल्याने बुकिंगही होत नाही. बांधकामे अर्धवट आहेत, तर लॉकडाऊननंतर बांधकाम व्यवसाय लगेच सुरळीत येईल याची खात्री नाही. अशा अनेक अडचणीत सापडलेल्या बांधकाम व्यावसायिकांना व्यवसाय सुरळीत होण्यासाठी किमान दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार हे निश्‍चितच. अगोदरच ग्राहकांची वाणवा असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बिल्डरांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून ठेवलेली असताना ग्राहक नसल्यामुळे संपूर्ण पैसा अडकून पडलेला आहे. ३१ मार्च अखेर सात प्रमुख शहरांमध्ये तब्बल ७८हजार फ्लॅट शिल्लक होते.  यात बिल्डरांचे ६६हजार कोटी गुंतले आहेत. हे पैसे सोडवण्यासाठी आता बिल्डर कासावीस झाले आहेत. बहुतांश बिल्डरांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लॅटवर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. काही बिल्डारांनी तर आता कुठलाही नफा न कमावता फ्लॅट विकण्याचेही बोलले आहे. नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीची अंमलबजावणी यामुळे घरांच्या विक्रीला मिळणारा प्रतिसाद थंडावला. रिअल इस्टेट क्षेत्रास संकटमुक्त करण्यात यश आल्यास, ग्राहकांचा लाभ आहेच, पण रोजगारनिर्मितीच्या दृष्टीनेही हे क्षेत्र महत्त्वाचे आहे, हे विसरता कामा नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा