गुरुवार, २ एप्रिल, २०२०

बेरोजगारी वाढू नये,याची खबरदारी घ्या

कोरोना विषाणूमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे गंभीर परिणाम होतील. भारताचा २0२0 मध्ये विकासदर ५.३ टक्के राहणार आहे.पण आता भारताचा विकासदर तीन टक्क्य़ाहून कमीच राहील. याचा अर्थ असा आहे की, या २0२0-२१ या वर्षात भारताला अंदाजे पाच लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तीन आठवड्यांचे लॉकडाऊन आणखी नुकसान होऊ शकते. काही महिन्यांसाठी अर्थव्यवस्था खिळखिळी राहिली किंवा सातत्याने विकासदरात घसरण होत असेल तर त्याला मंदी म्हणतात. हीच स्थिती जर बराच काळ टिकली आणि विकासदर नकारात्मकच झाला तर त्याला महामंदी म्हणतात. भविष्यात आपल्याला महामंदीची झळ बसू नये, म्हणून केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार कोसळला. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली. कोरोनामुळे गुंतवणूकदारांमध्ये अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले. अर्थव्यवस्था ही फक्त याच गोष्टींबद्दल नसते, तर आपल्याकडे जो किराणा येतो, भाज्या येतात, दूध येते, वाहतूक हे सर्व घटक अर्थव्यवस्थेत येतात. त्यामुळे कोरोनाचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि भविष्यात होऊ शकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे आणि पुढील दोन-तीन महिने आपली अर्थव्यवस्था नाजूक राहणार आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातले १९0 हून अधिक देश कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत. भारतात हजारो मजूर स्थलांतर करत आहेत. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अंदाजे अडीच कोटी रोजगार जातील, असे संयुक्त राष्ट्रांशी संलग्न इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनने म्हटले आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन, कामाचे तास कमी होणे तसेच पगार कपात या गोष्टींमुळे बेरोजगारी वाढू शकते. याचा फटका विकसनशील देशांना बसेल. त्यामुळे बेरोजगारी वाढू नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारने रोजगार निर्मिती करायला हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा