मंगळवारी (दि.19) बदायूंमध्ये दोन मुलांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. या गुन्ह्याच्या घटनेला जातीय रंग दिला जात आहे. आरोपी मुस्लीम असून पीडित हिंदू आहेत. त्यामुळे राजकारण्यांसाठी या निवडणुकीच्या मोसमात यापेक्षा योग्य मुद्दा कोणता असू शकतो. पोलिसांनी एका आरोपीला चकमकीत (एन्काऊंटर) ठार केले. ना अटक , ना तपास नाही, ना पुरावे, ना साक्षीदार, ना न्यायालय. थेट न्याय. प्रत्येक खुनातील आरोपीला अशाप्रकारे चकमकीत ठार मारला जाते का? तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका हेडकॉन्स्टेबलने क्षुल्लक कारणावरून शिक्षकाची हत्या केली होती.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दोघांना जिवंत जाळण्यात आले. या हत्या नाहीत का? यातल्या आरोपींचाही एन्काऊंटर केला जाणार का? गुन्ह्याला जातीय रंग देणे हे दुर्दैवी तर आहेच, पण त्याचा राजकीय फायदा घेण्याचा हेतू त्याहूनही अधिक दुर्दैवी आहे. कोणत्याही हत्येमागे एक हेतू असतो, कारण असते.बदायूंतील दोन मुलांच्या हत्येमागचा कोणताही हेतू अद्याप समोर आलेला नाही, तसेच पोलिसांना कोणतेही कारण सांगता आलेले नाही. एक आरोपी मारला गेला. दुसऱ्या आरोपीचे काय होणार याबाबत काहीही सांगता येत नाही. आरोपीला जिवंत पकडता आले असते.यावरून हत्येमागील हेतू उघड झाला असता. आरोपींना शिक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाला होता, पोलिसांना नाही. कोर्टाचे काम पोलिस करणार असतील तर कोर्ट काय करणार? कथित एन्काऊंटरवरून सातत्याने नवनवे प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्येक एन्काऊंटरवरून प्रश्न निर्माण होत आहेत. याही चकमकीच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यापूर्वीही एन्काऊंटर्स बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. चकमकीचा समर्थन करणे योग्य नाही. पण समाजातील एक वर्ग त्याचे समर्थन करू लागला आहे, जो अत्यंत धोकादायक आहे.
कालच (दि. 20) मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलिस कर्मचारी आणि मुंबईतील वादग्रस्त 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 मध्ये मुंबईतील गँगस्टर छोटा राजनचा जवळचा सहकारी रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याच्या बनावट एन्काऊंटरमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने प्रदीप शर्माला दोषी ठरवले, तर अन्य 13 आरोपींची शिक्षाही कायम ठेवली.चकमकीत किंवा वैयक्तिक वैमनस्यातून झालेला खून, अत्यंत निषेधार्ह आहे. खून करणे किती सोपे झाले आहे, हे बदायूंतील दोन मुलांच्या हत्येवरून दिसून येते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली