मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

बालस्नेही पोलीस ठाण्यांची गरज


अलिकडच्या काळात बालकांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर बालगुन्हेगारीही वाढली आहे.अशा परिस्थितीत त्यांच्या तक्रारींचे निराकरण,मुलांमध्ये आपलेपणा आणि धाडस निर्माण करण्याबरोबरच त्यांना समुदेशन करण्याचीही आवश्यकता असते. यासाठी खास काही गोष्टी समाज माध्यमातून किंवा प्रशासकीय पातळीवर होण्याची आवश्यकता होती. ती बालस्नेही पोलीस ठाणी स्थापन करून पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. कारण पुण्यात पोलिसांच्या पुढाकाराने बालस्नेही पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे.  अशा प्रकारचे हे राज्यातील पाहिले पोलीस ठाणे ठरले असून ही एक चांगली सुरुवात आहे, असे म्हणायला हवे. बालस्नेही पोलीस ठाण्यात येणाऱ्या बालकांना विश्वास देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामान्य तक्रारदारांना विश्वास देऊन त्यांच्या तक्रारींचे निराकरण करायला हवे.खरे तर अशा प्रकारची राज्यात सर्वत्र पोलीस ठाणी स्थापन करण्याची गरज आहे. या माध्यमातून बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना  बालकांच्या तक्रारींचे निराकरण, गंभीर गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन तसेच बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील. बालकांच्या तक्रारींच्या निराकरणाचे काम या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केले जाईल.

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारातील एका इमारतीत बालस्नेही पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे.  आपल्या माहीत आहे, पोलीस ठाण्याचे आवार म्हटले की, डोळ्यासमोर गणवेशातील पोलीस, पोलिसांच्या गाड्या, पोलीस ठाण्यातील गोंधळ दृष्टीस पडतो. मात्र, बालस्नेही पोलीस ठाण्याचा कक्ष पूर्णपणे वेगळा करण्यात आला असून आकर्षक रंगसंगतीने सजवलेले हे पोलीस ठाणे लक्ष वेधून घेते. या पोलीस ठाण्याच्या भिंतीवर पशु, पक्ष्यांची चित्रे रंगविण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची रंगसंगती करण्यात आली आहे. बालकांचा विश्वास मिळवण्यासाठी तेथे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.बालस्नेही पोलीस ठाणे म्हणजे बालकांच्या तक्रारींचे निराकरण,बालकांचे समुपदेशन तसेच अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करताना  साचेबद्ध कामकाज पद्धती वगळून केलेले कामकाज. बालकांवर घरात आणि दारात दोन्हीकडे अत्याचार होताना दिसत आहेत. शिवाय इंटरनेटच्या माध्यमातूनही अत्याचार होत आहेत. या मुलांना पोलिसांची भीती वाटू नये आणि बिनधास्त अत्याचार विरोधात तक्रार करता यावी, अशा पद्धतीचा विश्वास मुलांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मुले गुन्हेगारी क्षेत्रातही वावरत आहेत. फूस लावून या गुन्हेगारी क्षेत्रात त्यांना आणले जात आहे. तसेच ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना समुदेशनाची गरज आहे. अशा मुलांना त्या मानसिकतेतून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे,त्यासाठी अशा बालस्नेही पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली