सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

भारतीय बनावटीची संवाद माध्यमे पुढे का आले नाहीत?


'कुकूच कू!' हे शनिवारचे संपादकीय (लोकसत्ता 13 फेब्रुवारी) वाचल्यावर आपल्या देशात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, यातून स्पष्ट होते.  ट्विटरसह अन्य संवाद माध्यमांवर केंद्र सरकारने आपली वक्रदृष्टी दाखवायला सुरुवात केली आहे. या माध्यमांना भारतात व्यवसाय करायचा असेल, गुंतवणूक करायची असेल तर 'भारताच्या संविधानाचा आदर' करावाच लागेल, असे स्पष्ट केले आहे. मात्र याच सरकारने सत्ता मिळवताना याच विदेशी संवाद माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. आजही आपले म्हणणे ठासून मांडण्यासाठी याचा वापर होत आहे. यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. आता मात्र हीच संवाद माध्यमे खटकू लागली आहेत. आपल्याकडे जी संवाद माध्यमे आहेत ती सगळी परदेशी आहेत. आपल्या देशातील तंत्रस्नेही लोक याच परदेशातील अशा कंपन्यांमध्ये काम करण्यात इच्छूक असतात. कारण त्यांना तिथेच सर्वार्थाने सुरक्षित वाटते. आपल्या देशात अशा संवाद यंत्रणा उभे करण्यासाठी सत्ताधारी लोकांनी किती पुढाकार घेतला आणि परदेशातील आपल्या तंत्रस्नेही लोकांना आपल्या देशात बोलावून घेण्यासाठी किती प्रयत्न केले गेले. रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणजेच 'आत्मनिर्भर' बनवण्यासाठी काय केलं? आपल्या देशात काही कारणाने काही ऍप्स किंवा संवाद माध्यमे बनली गेली पण काही काळात त्यांचे अस्तित्वही संपले. लोकांनी त्यांना का नाकारले याचाही विचार व्हायला हवा. आपल्या देशाला 'आत्मनिर्भर' करण्याची घोषणा करताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले गेले? किती बेरोजगारांना रोजगार मिळाला? वास्तविक यापुढचा काळ फक्त तंत्रज्ञानाचा आहे, याची जाणीव ठेवून या गोष्टीला आणि विज्ञानाला प्राधान्य द्यायला हवे होते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. संवाद माध्यमांचा फक्त राजकारण करण्यात आणि त्यातून सत्ता मिळवण्यासाठी गेला जातोय. यापलीकडे आपण जाणार आहोत की नाही. लोकशाही देशांत कोणत्याही प्रकारच्या संवादाला बंदी घालणं चुकीचं आहे. जिथे बंदी घातली जाते आणि जिथे फक्त आपलेच म्हणणे रेटले जाते,तिथे हुकुशाहीला सुरुवात होते. आणि हे आपल्या देशात खपवून घेतले जाणार नाही. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. शिक्षण, आरोग्य यांसारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून भलतेच राजकारण करण्याने काय साध्य होणार आहे. 'पेराल ते उगवते' या उक्तीप्रमाणे आज सत्ताधारी मंडळींना संवाद माध्यमे खटकू लागली आहेत. ज्यांचा वापर करून आताच्या सत्ताधारी मंडळींनी सत्ता काबीज केली, त्यांना आता त्यांचाच त्रास होऊ लागला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा