गुरुवार, २५ मार्च, २०२१

खराब रस्त्यांचा देश


भारतातल्या रस्त्यांची अवस्था आणि त्यांवरील वाढते अपघात हा मोठा चिंतेचा विषय आहे. खरं तर आपल्या देशाला खराब देशांचा देश म्हणून जगात हिनवलं जातं. गावातले गल्ली-बोळातील रस्तेच काय मोठमोठ्या रस्त्यांना जोडणारे महामार्गही खड्ड्यांनी व्यापले आहेत. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू पावणाऱ्या  आणि कायमस्वरूपी विकलांग होणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. रस्ते अपघातात आपण जगात एक नंबरला आहोत. अलीकडेच धोकादायक रस्त्यांच्याबाबतीत एक सर्व्हेक्षण जाहीर झाले आहे, त्यात आपला देश जगात चौथ्या क्रमांकावर आहे. 

हे सर्व्हेक्षण 'जुतोबी' या आंतरराष्ट्रीय चालक प्रशिक्षण कंपनीने केले आहे. या सर्व्हेक्षणात एकूण 56 देशांचा समावेश करण्यात आला होता. वाहन चालवण्याच्या बाबतीत सर्वात धोकादायक देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या स्थानावर थायलंड आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्यापाठोपाठ भारताचा चौथा क्रमांक लागतो. रस्ता सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात भाग्यवान देश म्हणजे नार्वे आणि त्यानंतर जपान व स्वीडन या देशांचे क्रमांक लागतात. 'जुतोबी' च्या अहवालानुसार त्यांनी सर्व देशांचे विश्लेषण पाच तथ्यांवर आधारित केले आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येच्या रस्त्यावर होणारे मृत्यू, वाहनाच्या पहिल्या सीटवर बसणाऱ्या लोकांचे सीट बेल्ट लावण्याचे प्रमाण, दारू पिण्याच्या कारणावरून होणारे अपघात यांसारख्या तथ्यांचा आधार घेण्यात आला आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या 'ग्लोब हेल्थ ऑब्जवेन्ट्री' आकाड्यांवर आधारलेली आहे. वास्तविक आपला देश खराब, वाईट, धोकादायक, भयंकर अशा नकारात्मक शब्दांवर पोसला जात आहे. विकासाचा अभाव, महागाई, बेरोजगारी, गलिच्छ राजकारण , कायदेकानून तोडणे आदींबाबतीत भारत अव्वालस्थानी आहे. देशातले प्रश्न सुटणार आहेत की नाहीत?- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, १८ मार्च, २०२१

मरण झाले स्वस्त!


आजकालच्या लोकांना काय झाले आहे,कळायला मार्ग नाही. किरकोळ कारणावरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. इतका क्रोध, संताप येतोय तर कोठून?  अलीकडच्या काही वर्षात सहनशीलता, संयम याची याची जागा कमालीच्या संतापाने घेतला आहे. माणसे सुंदर जगण्याला गालबोट लावून सगळ्यांचेच जीवन उद्ध्वस्त करत आहेत. हा प्रवास थांबणार आहे की नाही, हे सांगणे कठीण आहे, कारण वास्तवात आणि टीव्ही,सोशल मीडियात अशाच घटनांना खतपाणी घातले जात आहे. सत्ता, अधिकार या माध्यमातून पिपासूवृत्ती वाढत आहे. 

राजकारणातल्या बड्या लोकांपासून ते मोलमजुरी करून जगणाऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांमध्येच मान-अपमान ,ईर्ष्या बळावत चालली आहे. माघार घेणे किंवा माफीचे शब्द उच्चारणे आता लोकांना कमीपणाचे वाटत आहेत. मागचा इतिहास पाहिला तर सहनशीलता बाळगून पुढे जाणारेच जगात पुढे गेले आहेत, अशा लोकांनीच आदर्श निर्माण केला आहे, पण आजकाल फक्त पायातलेच पाहणारे लोक इतिहास जाणून घेण्याची तसदीच घेताना दिसत आहेत. सुंदर जीवन मिळाले आहे, त्याचे सार्थक करावे असे संस्कार देणारी माणसे आणि तसे शिक्षण संपले आहे. 

परवाच सांगली जिल्ह्यातील करोली (एम) येथे मजुरांना शिवीगाळ करतो म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी गज घालून खून केला. मजूर धाकट्या भावाच्या द्राक्षबागेत काम करत होती आणि मोठा भाऊ त्यांना शिवीगाळ करत होता. चार-चौघांच्या मध्यस्थीने हा प्रकार थांबला असता, सहनशीलता आजकाल लोकांमध्ये राहिलाच कुठे आहे. आता ही जीव घेण्याची घटना होती का? असाच काहीसा प्रकार सांगली जिल्ह्यातल्या कर्नाळ गावात घडला आहे. शेजारी शेजारी राहणाऱ्या दोघांचा घरासमोर खाट ठेवण्यावरून वाद झाला आणि एकाने दुसऱ्याच्या एका क्षुल्लक कारणावरून खून केला. एक वर गेला आणि दुसरा तुरुंगात. काय नशीब म्हणायचे. रस्त्यावरच्या किरकोळ अपघातावरून, कट मारल्यावरून जीव घेण्याचा प्रकार तर 'सामान्य' झाला आहे. माणसाचा जगण्याचा संघर्ष वाढला आहेच शिवाय ऐतखाऊवृत्तीही वाढत आहे.  किरकोळ पैशाच्या देवाणघेवणीवरून , रागाने बघितल्यावरून जीवघेण्याच्या घटना माणसाचा जीव स्वस्त झाल्याचेच अधोरेखित करत आहे. गरिबी, वाढती महागाई, रोजगाराचा अभाव, नाशपान, व्यसन यामुळे माणसांचा संयम सुटत चालला आहे. माणसे बिथरली आहेत. वागण्या-बोलण्यातला  संयम, सहनशीलता यांचा ऱ्हास होत चालला आहे. दहशत माजवून ऐतखाऊ वृत्ती वाढत चालली आहे. याला राजकारणी, कायदा-सुव्यवस्था राखणाऱयांचा नेभळटपणा खतपाणी घालत आहे. पोलिसांचा धाक, त्यांची प्रतिमा संपली आहे. राजकारणी आणि पोलिस एकमेकांच्या हातात घालून आणि गळ्यात गळे घालून सर्वसामान्यांना लुटण्याचा उद्योग करत आहेत. यातूनच काही लोक यंत्रणेविरोधात 'बागावत' करत आहेत. माणसांमध्ये कसली भीतीच राहिलेली नाही. मात्र यामुळे सरळ नाकासमोर जगणाऱ्या लोकांचे जगणे असह्य झाले आहे. सकाळी बाहेर पडलेली व्यक्ती सहजासहजी संध्याकाळी घरी येईल की नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. देश चालवण्यारयांना देशाची चिंता नाही, तर मग सर्व सामान्यांची काळजी कुणाला असावी?-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली