गुरुवार, २५ मार्च, २०२१

खराब रस्त्यांचा देश


भारतातल्या रस्त्यांची अवस्था आणि त्यांवरील वाढते अपघात हा मोठा चिंतेचा विषय आहे. खरं तर आपल्या देशाला खराब देशांचा देश म्हणून जगात हिनवलं जातं. गावातले गल्ली-बोळातील रस्तेच काय मोठमोठ्या रस्त्यांना जोडणारे महामार्गही खड्ड्यांनी व्यापले आहेत. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू पावणाऱ्या  आणि कायमस्वरूपी विकलांग होणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. रस्ते अपघातात आपण जगात एक नंबरला आहोत. अलीकडेच धोकादायक रस्त्यांच्याबाबतीत एक सर्व्हेक्षण जाहीर झाले आहे, त्यात आपला देश जगात चौथ्या क्रमांकावर आहे. 

हे सर्व्हेक्षण 'जुतोबी' या आंतरराष्ट्रीय चालक प्रशिक्षण कंपनीने केले आहे. या सर्व्हेक्षणात एकूण 56 देशांचा समावेश करण्यात आला होता. वाहन चालवण्याच्या बाबतीत सर्वात धोकादायक देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या स्थानावर थायलंड आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्यापाठोपाठ भारताचा चौथा क्रमांक लागतो. रस्ता सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात भाग्यवान देश म्हणजे नार्वे आणि त्यानंतर जपान व स्वीडन या देशांचे क्रमांक लागतात. 'जुतोबी' च्या अहवालानुसार त्यांनी सर्व देशांचे विश्लेषण पाच तथ्यांवर आधारित केले आहे. प्रत्येकी एक लाख लोकसंख्येच्या रस्त्यावर होणारे मृत्यू, वाहनाच्या पहिल्या सीटवर बसणाऱ्या लोकांचे सीट बेल्ट लावण्याचे प्रमाण, दारू पिण्याच्या कारणावरून होणारे अपघात यांसारख्या तथ्यांचा आधार घेण्यात आला आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या 'ग्लोब हेल्थ ऑब्जवेन्ट्री' आकाड्यांवर आधारलेली आहे. वास्तविक आपला देश खराब, वाईट, धोकादायक, भयंकर अशा नकारात्मक शब्दांवर पोसला जात आहे. विकासाचा अभाव, महागाई, बेरोजगारी, गलिच्छ राजकारण , कायदेकानून तोडणे आदींबाबतीत भारत अव्वालस्थानी आहे. देशातले प्रश्न सुटणार आहेत की नाहीत?- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा