गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

घुबडांचे अधिवास संरक्षित करण्याची गरज


घुबड हे लक्ष्मीचं वाहन असल्याचं मानलं जातं. दुसरीकडे ते अशुभ असल्याची लोकसमजूतही आहे. प्रत्यक्षात जैवविविधतेच्या दृष्टीने घुबड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. घुबडांची संख्या कमी होत जाणं, ही सध्या मोठी समस्या ठरते आहे.शेतीचं नुकसान करणाऱ्या उंदीर, घुशी व अनेकविध कीटकांचा फडशा पाडणारा हा पक्षी शेतकऱ्यांसाठी उपकारक आहे. मात्र वृक्षतोड व शिकारीमुळे घुबडांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. 2019 मध्ये पुण्यात जागतिक घुबड परिषद झाली. त्यामध्ये जगभरातील 16 देशातील संशोधकांनी शोधनिबंध मांडले. भारतात पहिल्यांदाच ही परिषद झाली. अंधश्रध्देपोटी त्याचा बळी दिला जातो. त्यामुळे देशात आज दरवर्षी 78 हजार घुबडांची हत्या होत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. वनपिंगळा या प्रजातीची तीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी उत्क्रांती झाली. शेतीचं नुकसान करणाऱ्या प्राणी व कीटकांना खाऊन, त्यांची संख्या नियंत्रित ठेवणाऱ्या घुबडवर्गीय प्रजातींची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. जंगलतोडीमुळे त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. घुबडाची शिकार करून त्याच्या शरीराचे काही अवयव जादूटोण्यासाठी वापरले जातात.  त्यांचे अधिवास नाहीसे होत चालल्यामुळे कित्येक ठिकाणी आता हा पक्षी फारसा दिसत नाही.घुबडांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे. 

या पक्ष्याबाबत लोकांमध्ये चांगल्या-वाईट, दोन्ही प्रकारच्या समजुती पसरलेल्या आहेत. एक तर हा पक्षी रात्री फिरतो. त्याचा आवाज कर्णकर्कश असतो. डोळे मोठाले असल्याने हा अचानक दिसल्यावर माणसांना भय वाटू शकतं. त्यातून चित्रपट व मालिकांमध्ये भयावह दृश्य दाखवताना कधी हा पक्षी व त्याचा आवाज दाखवून भीती निर्माण केली जाते. तो सर्वसाधारण पक्ष्यांपेक्षा वेगळा दिसतो. लोकांना विचित्र वाटतो. शिवाय त्याच्या संदर्भात भरपूर अंधश्रद्धा आहेत. मात्र अनेक संस्कृतींमध्ये घुबडाचं दर्शन शुभ मानलं जातं. त्याला लक्ष्मीचं वाहन समजतात. कर्नाटकातील कूर्गमध्ये देवीच्या चित्रांमध्ये गव्हाणी घुबड पाहायला मिळतो. पश्चिम बंगालमध्येही असंच दिसतं. 

जगभरात घुबडांच्या दोनशेहून अधिक जाती दिसून येतात. भारतात सुमारे 35 प्रकारची घुबडे वास्तव्यास आहेत. यातील पन्नास टक्के घुबड महाराष्ट्रात आढळतात. त्यांच्यावर अजून संशोधन व्हायला हवे. गव्हाणी घुबड शहरी भागात दिसतो. पांढऱ्या रंगाचा हा पक्षी अतिशय सुंदर दिसतो. त्या सगळ्यांबद्दल अंधश्रद्धा नाहीत. पण काही प्रजाती मात्र अंधश्रद्धेपायी मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. या संदर्भात अभ्यास झालेले आहेत. खरंतर 50 टक्के नागरिकांना घुबडाविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे आजही घुबडांविषयी अज्ञान दिसते.मात्र काळ्या जादूसाठी घुबडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घुबडाच्या विविध अवयवांचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो. घुबडांविषयी खूप अंधश्रध्दा आहेत. त्या खोट्या असून, घुबड अशुभ नाही.  वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडांची तस्करी करणारे मोठे जाळे महाराष्ट्रातही सक्रिय आहे. झाडांच्या ढोलीवर नजर ठेवून लोक रात्रीच्या वेळी घुबडांची पिल्ले पळवतात. आत्तापर्यंत घुबडांची चोरी होती, हेदेखील अनेकांना माहिती नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही घुबडांच्या तस्करांचे जाळे पसरलेले आहे. औषधांसाठी त्याचा वापर करण्यासाठी घुबडांची हत्या केली जाते.  वेगाने नष्ट होत असलेली माळराने, गवताळ प्रदेश, गावालगतच्या रिकाम्या जागांवर मानवी अतिक्रमण वाढत आहे. गावाच्या वेशीवर ढोली असलेली मोठ्या झाडांची कत्तल होत आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार घुबडाची शिकार, विक्री अथवा कत्तल हा गुन्हा ठरतो. आपल्या देशात याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. घुबडांचे अधिवास शोधून ते संरक्षित करण्याची नितांत आवश्यकता आहे. लोकसहभागातूनच हे साध्य होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

कोवॅक्सीनच्या मान्यतेला विलंब झाल्याने भारताचे मोठे नुकसान


जागतिक आरोग्य संघटने (WHO) कडून कोवॅक्सीन लसीला मान्यता मिळण्यास उशीर झाल्यामुळे भारताला खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  वेळीच मान्यता मिळाली असती तर भारतीय कोवॅक्सीन लस जगभर निर्यात करता आली असती.  लससंबंधीची कागदपत्रे डब्ल्यूएचओ मानकांनुसार आहेत आणि सर्व औपचारिकता देखील पूर्ण झाल्या आहेत.  भारतात आतापर्यंत कोवॅक्सीनचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.  त्यामुळे WHO ने कोवॅक्सीनला लवकर मान्यता द्यावी हे बरे.
 जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  COVID-19 ला महामारी घोषित करण्यास विलंब केला होता, ज्याचा फटका जवळजवळ संपूर्ण जगाला सहन करावा लागला होता.  जर कोरोना पुन्हा पाय पसरत असेल तर WHO ने मानवाच्या हिताचा निर्णय घ्यायवा हवा.  या लसीला मान्यता न मिळाल्याने भारतीय आणि इतर देशांतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासारखे  होईल. वास्तविक WHO कडून लसीला मान्यता मिळण्यास झालेल्या विलंबाचा मोठा परिणाम होत आहे. लसीकरणालादेखील विलंब होत आहे. मान्यतेस होत असलेल्या  विलंबामुळे भारतीयांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परदेशात प्रवास करणे कठीण होईल.  लसीकरण झालेल्यांना आत्ता परदेशात जाणे शक्य होणार नाही.  यासोबतच व्यावसायिक कामानिमित्त परदेशात जाणाऱ्या नागरिकांचेही नुकसान होत आहे.  बहुतेक देश डब्ल्यूएचओच्या मान्यतेशिवाय कोवॅक्सीनला मान्यताप्राप्त लस मानत नाहीत. भारतात कोविशील्डसह जानेवारीमध्येच कोवॅक्सीन लसदेखील लोकांना देण्यास सुरुवात झाली होती.
 WHO च्या कोवॅक्सीनला मान्यता देण्यास होणारा विलंब म्हणजे आपल्या लसीकरणाची गती मंद होणे.  साहजिकच कोवॅक्सीनचे उत्पादन पूर्ण गतीने होत नाही. आजही कोरोनाची भीती कायम आहे.  लसीकरणाच्या बाबतीत भारतासह अनेक देशांमध्ये खूप मोठा गाठावयास बाकी आहे. उत्पादनाचा जादा ताण एकट्या कोविशील्डवर पडत आहे. त्यांनाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे लस लोकांना लवकरात लवकर लोकांना उपलब्ध व्हावी,यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने तात्काळ कोवॅक्सीनला मान्यता द्यावी आणि कोंडी फोडावी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

संकटात अन्नदाता


शतकानुशतके ज्याला देशाला संपूर्ण जगात कृषीप्रधान देशाचा मानाचा दर्जा मिळाला आहे,  ज्या राष्ट्राबाबत असे मानले जाते की 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र प्रत्यक्षात 86 टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतीयोग्य जमीन आहे.  अशा शेतकऱ्यांचे कोणतेही निश्चित मासिक उत्पन्न नसल्याने त्यांना वेळोवेळी नवीन समस्यांना सामोरे जावे लागते.  याबाबतच बोलायचे झाले तर एकीकडे महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या टंचाईमुळे त्यांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.  ररासायनिक खतांचे दर इतके भयानक वाढले आहेत की, ते शेतकऱ्यांना विकत घेणे त्यांच्या ऐपती बाहेर गेले आहे. अशा परिस्थितीत 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पाहिलेले पंतप्रधानांचे 'छोटे किसान बने देश की शान' हे स्वप्न कुठेतरी धुळीला मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे कुठलेच चिन्हे समोर दिसत नाहीत.  या छोट्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करायला हवी.  भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असताना अन्नदात्याला आनंदी केल्याशिवाय आपण या राष्ट्राला सुखी करू शकत नाही. त्यामुळे देशातील प्रत्येक सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

खिलाडूवृत्तीचा अंत


रविवारच्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या विचित्र का आहेत?  जर आपण विजय-पराजयाचा आदर करू शकत नाही, तर आपण खेळाकडे निरोगी खेळ कसे पाहू शकतो?  अनेक विजयांनंतर टीम इंडियाचा एक पराभव काय झाला , तो आम्हाला साधा पचवताही येत नाही.  धार्मिक अस्मितेच्या आधारे खेळाडूंना लक्ष्य केले जात आहे,हे भारताच्या सर्वधर्म समभाव अस्मितेसाठी धोकादायक आहे. शिवाय पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचे विधानही निषेधार्ह असून त्यांनी चुकीच्या पद्धतीने या खेळाचा धर्माशी संबंध जोडला.  अशीच परिस्थिती राहिली, तर येणारी पिढी जागतिक शांततेचा धडा कसा शिकणार?-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

अक्षय ऊर्जेच्या दिशेने


संयुक्त राष्ट्रांच्या कितीही बैठका झाल्या तरी जोपर्यंत विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये 'तू-तू, मैं-मैं'चा खेळ सुरू राहील, तोपर्यंत हवामान बदलाच्या या गंभीर समस्येवर ठोस तोडगा निघणार नाही.  समस्या अशी आहे की विकसित राष्ट्रे नेहमीच पालकांच्या भूमिकेत विकसनशील राष्ट्रांना आरसा दाखवतात, तर विकसनशील देशही त्यांच्या तथाकथित पालकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन पाहून आपली नैतिक जबाबदारी झटकतात.  आणि मग सर्वजण मिळून बिनदिक्कत विकासाच्या शर्यतीत सामील होतात.  मात्र, त्यामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. साहजिकच याचा फटका आपल्या या मानव प्राण्यावरच होत आहे. पृथ्वीवरून मानव जात नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  अलीकडच्या काळात अक्षय ऊर्जेवर विशेष भर दिला जात आहे.  भारतासारखे देश या दिशेने हालचाली करत आहेत.  मात्र हे प्रमाण फारच कमी आहे. अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे आहे. यामुळे देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. कोळशाचा तुटवडा, पेट्रोल-डिझेलची भयानक भाववाढ अशा गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. अक्षय ऊर्जा फक्त भारतातच नव्हे तर तिथल्या उपयुक्त आणि उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून वाढवली पाहिजे. अशी स्पर्धा प्रत्येक देशात असायला हवी.  नवीकरणीय ऊर्जा वाढवण्याच्या दिशेने प्रत्येकाने स्पर्धा केली तर आपली पृथ्वी अधिक हिरवीगार होईल आणि माणसाला सुखा समाधानाने जगता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

देशी विरुद्ध विदेशी


दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे.  बाजारपेठा दिवाळीच्या अनेकविध सामानांनी भरगच्च भरल्या आहेत.  मात्र जिकडे पाहावे तिकडे चिनी वस्तूंचा भरमार दिसत आहे. यावरून एक चिंताजनक गोष्ट समोर येतेय,ती म्हणजे   देशातील सर्व सण-उत्सव आता चीनच्या ताब्यात गेले आहेत.  यावेळी आपण चिनी  नक्की उत्पादनांवर बहिष्कार घालू असे आपण अनेकदा  बोलत आलो आहोत, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा त्याच उत्पादनाच्या स्वस्ततेमुळे आपण त्याकडे आकर्षित होतो.  तथापि, हे देखील खरे आहे की स्थानिक उत्पादने महाग आहेत आणि प्रत्येकाचा खिसा स्वदेशी वस्तू खरेदी करू देत नाही.  दिवाळीच्या वस्तूंबद्दल बोलायचे झाले तर बल्बच्या तारांपासून ते दिवे, मेणबत्त्या, चायनीज वस्तू बाजारात मुबलक प्रमाणात दिसतात आणि त्या भारतीय वस्तूंच्या तुलनेत फारच स्वस्त आणि आकर्षक असतात.  त्यामुळे नाईलाजाने का होईना आपल्याला खिशाला परवडेल, याचाच विचार करावा लागतो.साहजिकच चिनी वस्तूंचा उठाव मोठ्या प्रमाणात होतो. स्थानिक मालाचा उठाव अधिक होण्यासाठी आणि चिनी वस्तूंना मार बसण्यासाठी आता  केंद्र आणि राज्य सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे. सर्वसामान्य लोक स्वदेशी वस्तूंकडे आकृष्ट व्हावेत असा मार्ग सर्वांनीच अवलंबायला हवा.  आपला पैसा चिनी अर्थव्यवस्थेच्या का उपयोगी पडावा?-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या


कोरोनाची प्रत्येक कुटुंबाला झळ बसली आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामही समाजावर झाले आहेत. या सगळ्यांचा ताण घेऊन प्रत्येक कुटुंब जगत आहे. याचे प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर सांगली जिल्ह्याचे देता येईल.  सांगली जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे तर मृत्यूची संख्या पाच हजारांवर गेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानसिक उपचाराची गरज असल्याचे एक सर्व्हे सांगतो. आजारपणातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू सहन केलेली जिल्ह्याभरात आज घडीला साडेपाच हजारांवर कुटुंबे आहेत. या कुटुंबातील सदस्य मानसिक ताण-तणावाचा सामना करीत आहेत. मनातील भीती,आर्थिक व कौटुंबिक भवितव्याबद्दलची अनिश्चितता याचा व्यक्तीवर परिणाम असतोच ,त्यातून अचानक दचकणे, भीती वाटणे,थोडासा आवाज आला तरी घाबरणे, झोपेत दचकणे, छातीत धडधडणे, हातपाय थरथरणे, घाम फुटणे अशा अनेक शारीरिक तक्रारी सर्व्हेतून पुढे आल्या आहेत. मनात सतत चिंता,उदास वाटणे, निराश वाटणे, जगणे निरस होणे अशा सततच्या तक्रारीतून व्यसनाधीनता वाढते.अशा व्यक्तींना समुपदेशन व मनोविकार तज्ञ यांची गरज असते. ही परिस्थिती राज्यासह देशभरात सर्वत्र असून लोकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर कुटुंब कलह,आत्महत्या असे गंभीर परिणाम वाढत जातील. त्यासाठी सरकारी जिल्हा रुग्णालये त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात 'किमान आधार व्यवस्था' उभाराव्यात. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्तींवर घरातील माणसांनी व समाजाने लक्ष देऊन योग्य उपचारापर्यंत त्यांना न्यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली