बुधवार, ८ जून, २०२२

चीनची घुसखोरी हाणून पाडा


लडाखच्या सीमेजवळ चीनने सुरू केलेल्या हालचाली भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. लडाखच्या सीमेनजीक चीनने चालविलेल्या हालचालींबद्दल अमेरिकेनेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्या भागात चीन पायाभूत सुविधा उभारत असून, त्यामुळे अतिशय सतर्क राहाण्याची गरज आहे, असा सावधगिरीचा इशारा अमेरिकी लष्कराचे पॅसिफिक भागाचे कमांडिंग जनरल चार्ल्स फ्लिन यांनी भारताला दिला आहे.  हिमालय पर्वतराजीतील सीमा प्रदेशात चीनने पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. या हालचाली कशासाठी सुरू आहेत, याचा जाब कोणीतरी चीनला विचारायला हवा. एखाद्याला अस्थिर करण्याचा हेतू चीनच्या या कारवायांमागे असू शकतो,असेही त्यांनी म्हटले आहे.  पेगाँग तलावाजवळ चीन एक पूल बांधत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी गेल्या जानेवारीमध्ये दिले होते. चीनने चालविलेल्या या हालचालींची अतिशय गंभीर दखल भारताने घेतली होती. गलवान खोऱ्यात चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता.मात्र पुन्हा चीनच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भारतासारख्या लोकशाही मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या देशाची कोंडी करण्याची चीनची योजना लपून राहिलेली नाही. भारताच्या भोवतीच्या देशांना आपल्या कह्यात घेऊन आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मिंधे बनवून भारतावर दबाव आणण्याची त्याची नीती वारंवार स्पष्टपणे दिसून आली आहे. लडाख, डोकलाम अशा आघाड्या भारताविरोधात उघडून तेथे भारताला गुंतवून ठेवण्याचे त्याचे धोरण आहे. वास्तविक भारताने चीनला कधीही आणि कोणत्याही प्रकारे त्रास दिलेला नाही. उलट त्याच्याकडून आयात वाढवून त्याच्या आर्थिक प्रगतीला हातभारच लावलेला आहे. असे असूनही चीन शिरजोरी थांबविणार नसेल, तर चीनचा प्रतिकार करुन आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करणे , हे भारतापुढील प्राधान्य असेल. याशिवाय चीनमधील उत्पादनांची आयात कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणे, यावर आता जोर दिला गेला पाहिजे.स्वत:ची आर्थिक आणि सामरिक शक्‍ती उपयोगात आणून, तसेच अन्य देशांशी यासंदर्भात सहकार्य घेऊन भारताला चीनपासून आपले संरक्षण करावे लागणार हे उघड आहे.  भारतापुरते बोलायचे तर भारताने आपल्या समस्यांशी दोन हात स्वबळावरच करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आर्थिकबळ आणि शस्त्रास्त्रबळ वाढविले पाहिजे. भारत कमकुवत नाही. मात्र आपली क्षमता आणखी वाढविण्याची आणि ती दाखवून देण्याची गरज आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 टिप्पणी:

  1. भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा चीनने आगळीक केली आहे. चीनची फायटर एअरक्राफ्ट चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली आहेत. पूर्व लडाखलगत भारतीय हद्दीजवळ असलेल्या होतान या एअरबेसवर चीनने २५ फायटर जेट्स तैनात केली आहेत.
    पूर्व लडाख सेक्टरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे एका अमेरिकन लष्करी अधिकार्‍याने सांगितले असताना, चिनी हवाई दलाने भारतीय हद्दीजवळील मुख्य तळावर लढाऊ विमानांची तैनाती दुप्पट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
    चीनने या आधी या एअरबेसवर 12 विमाने तैनात केली होती. आता इथे 25 फायटर जेट्स तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकन मिलिटरी ऑफिसरने सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून ही माहिती उघड केली आहे. भारतीय लष्करी यंत्रणाचंही या हालचालींकडे बारकाईने लक्ष आहे.
    भारत-चीन सीमेवर सातत्याने संघर्ष चालू आहे. आधी गलवान, नंतर डोकलाम, अरुणाचल प्रदेशातील तवांग असा संघर्ष चालू आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सैन्यदलांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. भारत आणि चीन या दोन्हीही देशांनी आपले सैन्य या भागात तैनात केले होते. याचे कारण आहे, येथील भौगोलिक रचना. भारत आणि चीन सीमेवर हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. ज्याच्या ताब्यात येथील जास्त भाग असेल, त्याला जास्त लाभ मिळतो.

    उत्तर द्याहटवा