गुरुवार, ९ जून, २०२२

'सांगली हळद' ब्रॅंडला धक्का


महाराष्ट्रात हळद पिकवणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत सांगलीचे स्थान अकरावे आहे. परंतु इथे बाजारपेठ असल्याने  हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. साहजिकच सांगलीची हळद देशात प्रसिद्ध आहे. येथे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात हळद उतरवली जाते. प्रक्रिया उद्योगही आहेत,त्यामुळे याचा फायदा अडते, व्यापाऱ्यांना अधिक आहे. मात्र हळद उत्पादन वाढीसाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नसल्याने सांगलीची हळदीची मक्तेदारी मराठवाड्याकडे जात असल्याचे दिसून येत आहे. सांगलीसाठी ही चिंतेची गोष्ट आहे. सांगली महापालिकेने शहरातील इमारती पिवळ्या रंगाने रंगवून  सांगली 'यलो सिटी' करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सांगलीची ओळखच पुसली गेली तर या 'यलो सिटी'ला घेऊन काय करायचे? पहिल्यांदा सांगलीच्या मातीत हळदीचे उत्पादन वाढवावे लागेल.

सांगली परिसर यापूर्वी हळद उत्पादनात अग्रेसर होता. मात्र अलीकडच्या काळात शेतकरी फळपिके आणि ऊस शेतीकडे वळला आहे. त्यामुळे येथील हळदीचे क्षेत्र आणि उत्पादन कमी झाले आहे. तरीही याठिकाणी हळद आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारपेठ चांगली विकसित झाली आहे. आता यालाही तडे जात आहेत.कारण हळदीची मोठी उलाढाल आता हिंगोलीत होत आहे. या हंगामातील आकडेवारी  सांगलीसाठी चिंताजनक आहे. यंदा या भागातील हळदीचे उत्पादन सरासरी15 लाख पोती (50 किलोचे पोते) राहिले. या तुलनेत मराठवाड्यातील हळदीचे उत्पादन सुमारे 30-32 लाख पोत्यांच्या घरात गेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळदीची बाजारपेठ विकसित होत आहे. उत्तर भारतातून सांगलीकडे येणारी हळद वसमतमध्ये उतरली जाऊ लागली आहे. 

जगाच्या बाजारात सौंदर्य प्रसाधनांना प्रचंड मागणी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतीय हळदीला अधिक पसंती आहे.  सुमारे 70 टक्के भारतीय हळद ही सौंदर्य प्रसाधनासाठी वापरली जाते, असा अहवाल सांगतो. याशिवाय औषधी वापर अधिक आहेच. त्याचा फायदा सांगलीने घेतला पाहिजे. विशेष म्हणजे सांगलीच्या हळदीला जी. आय.मानांकन मिळाले आहे.  शिवाय सांगली परिसरातील राजापूर हळद दर्जेदार मानली जाते. त्या तुलनेत मराठवाड्यातील हळद मध्यम प्रतीची आहे. या ठिकाणी शेलम आणि फुले स्वरूपा या जातीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सांगलीने आपला ब्रँड टिकवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. जागतिक दर्जाचे शेफ संजीव कपूर मागे सांगलीला आल्यावर सेंद्रिय हळद ही सांगलीची ताकद ठरू शकते, असे म्हटले होते. हळद निर्यातीत महाराष्ट्राचे स्थान देशात दुसरे आहे. सांगलीला या यादीत पुढे सरकण्याची संधी आहे. त्याचा फायदाही शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जगात 'सांगली हळद' हा ब्रँड देशभरात रुजवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. 

सांगली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र 774 हेक्टर आहे. पहिल्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा असून तिथे 49 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर हळदीचे पीक घेतले जाते. नांदेड दुसऱ्या क्रमांकावर असून इथे 13 हजार 131 हेक्टर आणि तिसऱ्या स्थानावर वाशिम 4 हजार 149 हेक्टर क्षेत्रावर हळद पीक घेतले जाते. सांगली जिल्ह्यात हळद कमी पिकत असली तरी आता हळदीला प्रमुख पीक म्हणून पुढे आणण्याची मोठी संधी आहे. द्राक्ष, ऊस या प्रमुख पिकांभोवती बाजारपेठेतील अस्थिरता, लहरी हवामान याचा चक्रव्यूह पडला आहे. या तुलनेत हळदीचे पीक फायद्याचे आणि तांत्रिक सल्ला} घेऊन केल्यास कमी धोक्याचे आहे. जिल्ह्याच्या पीक पटर्नची फेररचना करून हळदीला प्राधान्य देण्याची गरज आहे. ठिबक सिंचनावर हळद घेतली आणि नवे वाण विकसित केले तर मोठे उत्पन्न घेणे शक्य आहे. त्यातून निर्यात हाऊस, गोदाम, शीतगृह वाढतील. या सर्व क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी शासनानेही प्रयत्न केले पाहिजेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा