मंगळवार, २४ मे, २०२२

श्रीमंतांना अधिक कर लावा


कोरोना महामारीने जगाला भयंकर धडा शिकवला. लोकांचे लॉकडाऊनमुळे अतोनात हाल झाले. अनेकांना आर्थिक फटका बसला. काहींच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात झाली. काहींची आर्थिक घडी कोलमडून गेली. कोरोनाने अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या. मात्र याचवेळी काहींना अतोनात फायदाही झाला. ऑक्सफॉम’ या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेनुसार कोरोनाच्या महामारीने दर 30 तासांत एक नवीन अब्जाधीश निर्माण केला आहे आणि आता दहा लाख लोक त्याच गतीने दारिद्र्यात लोटले जाऊ शकतात.  अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) बैठकीसाठी जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित वर्ग एकत्र आले होते. त्यामध्ये मत मांडताना ‘ऑक्सफॉम’ने म्हटले आहे की,या गरिबीत लोटल्या गेलेल्या दुर्दैवी फेरीवर मात्रा म्हणून गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे. खरोखरच याचा विचार झाला पाहिजे.
या संस्थेच्या मते यावर्षी 26.3 कोटी लोक दारिद्र्य पातळीच्या खाली आले आहेत. तुलनात्मकरीत्या कोरोनामारीच्या काळात 573 लोक अब्जाधीश बनले आहेत किंवा दर 30 तासाला एक व्यक्ती धनाढ्य बनले आहेत. कोरोनाकाळात वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक खर्चाचे संकट मोठे होते. संपत्तीत अविश्वसनीय वाढ झाल्याच्या आनंद साजरा करण्यासाठी अब्जाधीश दावोसला पोहोचत आहेत, असे ‘ऑक्सफॉम’च्या कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी सांगितले. आधी कोरोनाची साथ आणि आता अन्नधान्य व ऊर्जेच्या किमतीत झालेली मोठी वाढ त्यांच्यासाठी ‘बोनस’ आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.‘ऑक्सफॉम’चे मत कोरोनातील महागाईचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदतीसाठी श्रीमंतांवर ‘एकता कर’ लागू करावा.नफाखोरी थांबविण्यासाठी बड्या उद्योगांच्या अनपेक्षित नफ्यावर 90 टक्के तात्पुरता जादा नफा कर लादावा.कोट्यधीशांच्या संपत्तीवरील 2 टक्के आणि अब्जाधीशांवरील पाच टक्के वार्षिक करातून दर वर्षी दोन हजार 520 अब्ज डॉलर एवढा निधी जमा होईल.या संपत्ती कराचा वापर 2.5 अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी करता येईल.या पैशातून जगात पुरेशा लशी उपलब्ध करता येतील.गरीब देशांमधील सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठीही त्याचा उपयोग करता येईल.दारिद्र्य कमी करण्याच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांना यश आले असतानाच आता उलट परिणाम दिसत आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच्या खर्चात अशक्य वाढ झाल्याने लाखो लोकांसमोर संकट निर्माण झाले आहे.यावर मात्रा निघाली पाहिजे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
26 मे 2022


1 टिप्पणी:

  1. देशातील आरोग्य सेवा महाग होत आहेच, पण रुग्णांना कंगालही करत आहेत. सतत वाढत जाणारा वैद्यकीय खर्च दरवर्षी सात टक्के लोकसंख्येला दारिद्र्यरेषेखाली ढकलत आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की जर भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीवर दोन टक्के एकरकमी कर लावला गेला तर त्याच रकमेतून देशातील कुपोषितांच्या पोषणासाठी तीन वर्षांपर्यंत 40,423 कोटी रुपयांची गरज भागवली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, देशातील दहा सर्वात श्रीमंत अब्जाधीशांवर पाच टक्के एकवेळ कर लादल्यास आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाच्या एका वर्षासाठी अर्थसंकल्पाची भरपाई होऊ शकते.

    उत्तर द्याहटवा