रविवार, १५ मे, २०२२

विधवा प्रथा बंद करून महिलांचा सन्मान करा


कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावच्या सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेऊन विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याचा आणि एक आदर्श घालून देण्याचा गावाने चांगला पायंडा पाडला आहे. गावाला यासाठी धन्यवाद द्यायला हवेत. याचे अनुकरण आता महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या गावांनी घ्यायला हवा आहे. साहजिकच यामुळे विधवा महिला सन्मानाने जगातील. त्यांच्यात अपराधीपणाची भावना, भीती आणि न्यूनगंड राहणार नाही. पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कूंकू पुसण्यात येते, बांगड्या फोडण्यात येतात. आयुष्यभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेऊन वावरता येत नाही. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमातला विधवांचा वावर अशुभ मनाला जातो.त्यामुळे त्यांना घरच्या कार्यक्रमातही एकाद्या कोपऱ्यात बसावे लागते. समाजात वावरताना मंगळसूत्राशिवाय आणि कपाळावरील काळ्या टिकलीसह वावरावे लागते. साहजिकच समाजातल्या विकारी नजरांना दबकत जगावे लागते. महिलेला नवरा नाही याच्या खुणा दिसत असल्याने जबरदस्ती, टोमणे,हीन वागणूक यांसारख्या  प्रकारामुळे जिवंतपणी नरकयातना सोसाव्या लागतात. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी ती विधवा आहे, याचे प्रदर्शन कोणत्याही प्रकाराने होता कामा नये. याचसाठी हेरवाड गावचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. गावातल्या लोकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

दैनिक सकाळ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा