गुरुवार, १९ मे, २०२२

वाघ-मानव संघर्षावर उपाययोजना हवी


वाघांच्या आणि वन्यजीवांच्या हल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले, ही आहे. वाघ-मानव संघर्षात वाघांचे मृत्यू होतात; तसेच मानवांचे मृत्यू सुद्धा होतात. अलीकडे शिकारी कमी झाल्या असल्या तरी वाघांच्या अपघाती मृत्यूत वाढ झाली आहे. परंतु आज खरी समस्या वाघांच्या आणि वन्यजीवांच्या हल्ल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले,हे आहे. महाराष्ट्रात वन्यजीवांच्या हल्ल्यात २०१७ मध्ये ५० लोकांचा बळी गेला. २०१८ आणि २०१९मध्ये अनुक्रमे ३६ आणि ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२०मध्ये हा आकडा सर्वाधिक ८८ वर गेला, कारण कोविडच्या लॉकडाऊनमुळे लोकांचा जंगलातील हस्तक्षेप वाढला होता. आता तर त्यात चांगलीच वाढ झाली आहे. वाघांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०१४-२०२० दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात ३२० लोकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रात ९९ तर पश्चिम बंगालमध्ये ७८ लोकांचा मृत्यू झाला होता. यावरून विदर्भात हा संघर्ष किती वाढला आहे .देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली आहे. परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे तुटलेले भ्रमण मार्ग, मानवाचा आणि गुराढोरांचा जंगलातील मुक्त  वावर, जंगलाच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, जंगलातील गावाची संख्या अशा अनेक कारणांमुळे वाघ-मानव संघर्षात वाढ होत असून त्यातून वाघ आणि मानव यांचे मृत्यू वाढू लागले आहेत. यावर कायमची उपाययोजना होणे आवश्यक आहे, अन्यथा जन आक्रोश वाढेल. वाघांच्या संरक्षणाचा प्रश्नही अनुत्तरित राहील.महत्त्वाचे म्हणजे वन आणि वन्यजीव संरक्षणात जोपर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य राहणार नाही,तोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नाही. लोकांची मने जिंकून लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन यशस्वी होऊ शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा