शुक्रवार, २० मे, २०२२

तापमानवाढ रोखण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा वापरा


हरितगृह वायू वातावरणात अडकून पडल्याने पृथ्वीच्या आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हणून पूर, दुष्काळ, वादळे, वणवे अशा नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता वाढली आहे. मानवाचे एकमेव निवासस्थान असलेल्या पृथ्वीची होरपळ होण्याआधी आपण जैविक इंधनापासून होणारे प्रदूषण निश्चयाने थांबवून शाश्‍वत ऊर्जेकडे वळायला हवे आहे.

मागील सलग सात वर्षे ही आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण वर्षे ठरल्याचा अहवाल जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. तीव्र  हवामानामुळे मृत्यू आणि रोगराई, स्थलांतर, आर्थिक नुकसान यांचे प्रमाण वाढणार आहे. जैविक इंधनावर विविध देशांमध्ये अंशदान दिले जाते. ते रद्द करावे, असेही अहवालात म्हटले आहे. लोकांच्या खिशावर ताण पडला तरी अंतिमत: पर्यावरणाला त्याचा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला आहे. अपारंपरिक ऊर्जेचा जगभरात वापर वाढविण्यासाठी संयुक्‍त राष्ट्राने नुकतीच पंचसूत्री जाहीर केली. त्यानुसार अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञानावरील बौद्धिक संपदा हक्क रद्द करावेत, अपारंपरिक ऊर्जेसंबंधित कच्च्या माल आणि पुरवठा साखळी सर्वानाच उपलब्ध व्हावी , अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारासाठी देशांनी आपल्या धोरणांमध्ये सुधारणा करावी ,जैविक इंधनाला दिले जाणारे अंशदान रद्द केले जावे  आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राकडून होणारी गुंतवणूक तिपटीने वाढावी,असे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.  वास्तविक पर्यावरणासमोरील समस्येचा सामना करण्यात मानवजातीला अपयश येत आहे. जगातील ऊर्जा यंत्रणा मोडकळीस आली असून, आपण आपत्तीच्या तोंडावर उभे आहोत.  हरितगृह वायूंचे उत्सर्जज कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे कमी किमतीत स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे. श्रीमंत देश स्वच्छ ऊर्जेसाठी येणारा मोठा खर्च सहन करू शकत असले तरी गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना ते परवडणारे नाही. त्यामुळे या अपारंपरिक ऊर्जेचा वापर कसा वाढवता येईल,यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली



संकेत टाइम्स 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा