रविवार, २२ मे, २०२२

एटीम मशिन्स 'रामभरोसे'


चोरट्यांकडून एटीएम मशीन फोडून रोख रक्कम पळवून नेण्याचा प्रकार वाढला आहे.लाखो रुपये साठवून ठेवणाऱ्या या एटीएमची सुरक्षा मात्र 'रामभरोसे' ठरली असल्याने गेल्या काही वर्षांपासून चोरट्यांनी ‘एटीएम’ फोडण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सांगली जिल्ह्यातील शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे 21 मे 2022 रोजी चोरट्यांनी दरोडा टाकून 22 लाख 34 हजारांची रोकड असलेली मशिनच पळवून नेली. यापूर्वीही जिल्ह्यात ,राज्यात आणि देशात अनेज ठिकाणी एटीएम मशिन फोडण्याचे प्रयत्न झालेत. त्यामुळे 'एटीम' च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत बँकांनी शाखांबरोबर ‘एटीएम’चे जाळे पसरवले आहे. लाखो रुपये भरणा होत असलेल्या एटीएम केंद्रामुळे ग्राहकांची सोय होते.  बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी होऊन त्यांना तत्काळ पैसे काढता यावेत यासाठी सर्वच बँकांच्या शाखांनी ‘एनी टाईम मनी’ अर्थात एटीएम केंद्रे सुरू केली. सुरुवातीला बँकेच्या शाखेबाहेरच एटीएम असायचे. परंतु, सध्या ग्राहकांची गरज ओळखून एटीएमचे जाळे शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत विस्तारले गेले. सुरुवातीला एटीएम केंद्रामध्ये सुरक्षारक्षक रात्रपाळीला तैनात असायचे. परंतु, सध्या बऱ्याच एटीएममधील चित्र बदलले आहे. बँकांच्या शाखाबाहेर असलेल्या एटीएममध्येच रक्षक असतो. इतरत्र असलेले ‘एटीएम’ केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर सुरू आहेत.त्यामुळे इथली सुरक्षा ‘रामभरोसे’च म्हणावी लागेल.एटीएम मशिनमध्ये एकावेळी 25 लाखांहून अधिक रक्कम भरून ठेवली जाते. चार माणसे सहजपणे उचलतील अशा आकाराची मशिन्स सध्या आहेत. एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील आरग (ता. मिरज) येथील एटीएम जेसीबीने फोडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वाटेत जेसीबीमधून मशिन पडल्यामुळे 24 लाखांची रोकड वाचली. परवा एटीएम पळवून नेऊन 22 लाख रुपये पळवले. त्यामुळे सुरक्षा रक्षक नसलेले एटीएम चोरट्यांच्या ‘टार्गेट’ वर असल्याचे दिसून येते. एकट्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँकांची 300 हून अधिक एटीएम केंद्रे आहेत. बँकांच्या एटीएम सुरक्षेसाठी बँकांनी तातडीने प्रत्येक एटीएममध्ये आत व बाहेर ‘सीसीटीव्ही’ बसवावेत. तसेच सुरक्षारक्षक तैनात करावेत. आरबीआयने एटीएम केंद्र स्थापन करताना काही मानके ठरवून दिली आहेत. त्यामध्ये आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, सायरन यंत्रणा, फ्लॅश लाईटस्‌ आदी प्रमुख मानकांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. सायरन व फ्लॅश लाईटस्‌ला अनेक ठिकाणी फाटा दिल्याचे दिसून येते. बँकांनी एटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना दंड आकारण्यात यावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
दैनिक लोकमत 13 जुलै 2021


प्रसिद्ध -26 मे 2022


1 टिप्पणी:

  1. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारला. एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यातील तीन एटीएम फोडण्याचे प्रयत्न चोरट्यांनी केले. यातील एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसले तरी दोन एटीएम फोडून तब्बल 49 लाख 27 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या सर्व घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. News9 जून 2022

    उत्तर द्याहटवा