शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या


कोरोनाची प्रत्येक कुटुंबाला झळ बसली आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामही समाजावर झाले आहेत. या सगळ्यांचा ताण घेऊन प्रत्येक कुटुंब जगत आहे. याचे प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर सांगली जिल्ह्याचे देता येईल.  सांगली जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे तर मृत्यूची संख्या पाच हजारांवर गेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानसिक उपचाराची गरज असल्याचे एक सर्व्हे सांगतो. आजारपणातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू सहन केलेली जिल्ह्याभरात आज घडीला साडेपाच हजारांवर कुटुंबे आहेत. या कुटुंबातील सदस्य मानसिक ताण-तणावाचा सामना करीत आहेत. मनातील भीती,आर्थिक व कौटुंबिक भवितव्याबद्दलची अनिश्चितता याचा व्यक्तीवर परिणाम असतोच ,त्यातून अचानक दचकणे, भीती वाटणे,थोडासा आवाज आला तरी घाबरणे, झोपेत दचकणे, छातीत धडधडणे, हातपाय थरथरणे, घाम फुटणे अशा अनेक शारीरिक तक्रारी सर्व्हेतून पुढे आल्या आहेत. मनात सतत चिंता,उदास वाटणे, निराश वाटणे, जगणे निरस होणे अशा सततच्या तक्रारीतून व्यसनाधीनता वाढते.अशा व्यक्तींना समुपदेशन व मनोविकार तज्ञ यांची गरज असते. ही परिस्थिती राज्यासह देशभरात सर्वत्र असून लोकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर कुटुंब कलह,आत्महत्या असे गंभीर परिणाम वाढत जातील. त्यासाठी सरकारी जिल्हा रुग्णालये त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात 'किमान आधार व्यवस्था' उभाराव्यात. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्तींवर घरातील माणसांनी व समाजाने लक्ष देऊन योग्य उपचारापर्यंत त्यांना न्यायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा