शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

चंदन लागवड करा,सुबत्ता आणा


'चंदनाचे झाड, परिमळे वाड... ' म्हणजेच चंदनाच्या झाडाचा परिमळ सगळीकडे दरवळत असतो. चंदन हा मौल्यवान वृक्ष आहे.कोरीव काम, काष्ठ शिल्प, सुगंधीत तेल तसेच धार्मिक पूजा-अर्चा आणि औषधी उपयोगी म्हणून देशभर नाहीतर जगभर भारतीय चंदनाला मागणी आहे.  हा वृक्ष सदाहरित प्रकारातला असून कोरडवाहू, चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम येतो. चंदन म्हटले की चोरी आणि तस्करी अशाच बातम्या कानावर पडत असतात. पण आता चंदनाच्या बाबतीत अलीकडे काही चांगल्या बातम्याही ऐकायला मिळू लागल्या  आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने चंदन लागवडीला परवानगी दिली आहे. शिवाय वन विभागाच्या जोखडातूनह चंदन वृक्ष राज्य शासनाने सहा महिन्यांपूर्वीच मुक्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात, बांधावर लागवड केलेल्या चंदनांच्या झाडांची तोड करण्यासाठी आता वन विभागाची परवानगी लागणार नाही.   चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच दिले आहे. त्यामुळे चंदनापासून शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मिळकत मिळू शकते. असे असले तरी चंदन लागवडीत अजूनही बऱ्याच अडचणी आहेत. 

चंदन लागवडीला परवानगी दिल्यानंतर त्याची सातबारावर नोंद करावी, असे सांगितले जातेय. परंतु बऱ्याच ठिकाणी अशा नोंदी होताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी सातबारावर चंदनाची नोंद केल्यानंतर त्याची एक प्रत वन विभाग आणि दुसरी पोलिस खात्यात द्यायला हवी. म्हणजे वाहतूक-विक्रीसाठी तसेच चोरी झाल्यास त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो. अन्यथा, चोरी झाल्यावर लागवडीचा पुरावा पोलिस खाते मागते. चंदनाची रीतसर लागवड करून त्याची सातबारावर नोंद झाल्यानंतर पुढे तोडणी, वाहतूक, विक्री यासाठी शेतकऱ्यांना तत्काळ परवानगी मिळायला हवी. चंदन लागवड खर्चिक असून हे बहुवार्षिक पीक आहे. त्यामुळे चंदन शेतीसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळायला हवे. चंदनाचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होते. त्यामुळे या पिकास विमा संरक्षण मिळायला पाहिजे. शिवाय यासाठीचे लागवड अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत मिळायला हवे. चंदनाची पीक म्हणून लागवड होत असताना इतर पिकांप्रमाणे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी. मौल्यवान चंदनाची चोरी, तस्करी रोखण्यासाठी शेतकरी, वन-कृषी विभाग आणि पोलिस खाते असे सर्व मिळून काही उपाय करता येईल का, यावरही विचार व्हायला हवी.

शिवाय राज्यात चंदनाची शेती वाढत असताना त्यावरील प्रक्रिया उद्योग देखील वाढायला पाहिजेत. असे झाले नाही तर कितीही मागणी असली तरी पुढे बाजारपेठेची अडचण निर्माण होऊ शकते.चंदन लागवडीस परवानगी मिळाल्यानंतर राज्यात याचे क्षेत्र नगर जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण असे सर्वत्र वाढत आहे.  ही बाब उल्लेखनीय असली तरी राज्यात अथवा देशात सर्वत्र सर्वदूर चंदन लागवड व्हायला हवी. चंदनाची लागवड आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग वाढले म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी पण वाढू शकते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा