शनिवार, ९ एप्रिल, २०२२

इच्छा आणि मार्ग


कोरोना महामारीमुळे जगाची चिंता वाढवली. सुखवस्तू जीवन जगणाऱ्यालादेखील कोरोनाने काळजी करायला भाग पाडलं. जीवन क्षणभंगुर आहे,याचा अनेकांना साक्षात्कार झाला. कोरोनामुळे माणसाची चिंता पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढली. अजूनही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना आपल्याकडे कधी येईल,याचा नेम नाही. म्हणजे चिंता संपलेली नाही. मात्र एक गोष्टी घडली आहे. त्याची भीती कमी झाली आहे. खरे तर आधीच प्रत्येकाकडे एक नाही तर अनेक चिंता आहेत. त्यामुळे या चिंतेचे काय करायचं, असा प्रश्न उभा राहतो.  एका विचारवंताला विचारले गेले- जीवन कसे आहे?  आयुष्य म्हणजे काय?  उत्तर मिळाले - आपण ते कसे जगतो यावर सर्व अवलंबून आहे.  आपण हे जीवन कसे जगता? यावर ते म्हणतात- हे आपल्यावर अवलंबून आहे.  आपल्याला हे संभाषण काल्पनिक वाटत असल्यास, जॉन एच. मिलर काय म्हणतात बघा.  ते म्हणतात - आपण कधीही चिंता टाळू शकत नाही, परंतु जर आपण त्याबद्दल आपली मानसिकता बदलली तर चिंता दूर केली जाऊ शकते.

 अज्ञान मिटले, गोंधळ मिटला, व्यर्थाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली. पण यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत.  याबाबत चिनी लेखक लीन युटंगे लिहितात की, जीवन केवळ जगण्यासाठी नाही तर ते हेतुपूर्ण आणि अंतर्गत विकासासाठी असते.  अंत: करणात काम करण्याची आवड आणि उत्कटता असावी लागते.  आपल्या इच्छेपेक्षा कठोर परिश्रम करण्याची क्षमता आणि उत्कटता आपले जीवन यशस्वी करता येते. जशी इच्छा,तसा मार्ग.एका महान विद्वानाने असे म्हटले होते की, जेव्हा आपण स्वार्थाच्या पलीकडे जातो आणि आपला वेळ  इतरांसाठी काहीतरी करण्यास तयार असतो तेव्हा आपण एक वास्तविक आणि सकारात्मक जीवन जगत असतो.  केवळ उर्जा आणि सकारात्मकतेने समृद्ध झाल्याने आपण आयुष्य आनंददायक बनवू शकतो.  जोहान वॉन गोएथे म्हणाले त्याप्रमाणे - जेव्हा एखादी व्यक्ती स्वत: ला पूर्णपणे शरण जाते तेव्हा देव देखील त्याच्याबरोबर चालत राहतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

शस्त्रास्त्र क्षेत्रात भारत होणार आत्मनिर्भर


युक्रेन आणि रशिया युद्धामुळे रशियाकडून भारताला होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने देशातच शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 300 हून अधिक प्रकारच्या शस्त्रांचे उत्पादन भारतातच करण्याचा आदेश संरक्षण विभागाने दिल्याची माहिती खुद्द संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या शस्त्रास्त्रांमध्ये अत्याधुनिक सामग्रीचा अंतर्भाव आहे. अलिकडेच फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे विकण्याच्या करार केला होता. यामुळे देशाने या क्षेत्रात उतुंग भरारी घेतलीच आहे.  यापूर्वीच भारत  जगातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात भारताचे यश आता छोटे राहिलेले नाही.  देश आधीच अनेक प्रकारच्या संरक्षण वस्तू, उपकरणे, शस्त्रे आणि सुट्या भागांची निर्यात करत आहे. यात आता सरकारच्या या निर्णयामुळे आणखी वाढ होणार आहे.

भारतात निर्मिल्या जाणाऱ्या शस्त्रांमध्ये युद्ध हेलिकॉप्टर्स, लघु ते दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, रणगाड्यांची इंजिने, अर्ली  वॉर्निंग सिस्टिम्स व इतर शास्त्रांचा समावेश आहे. सध्या शस्त्रसामग्रीसाठी भारत 60 टक्के इतक्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. हे अवलंबित्व कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे. भारताची मोठी सीमारेषा आणि सामरिक आव्हाने लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत शस्त्रसामग्रीच्या आयातीवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे संरक्षण विभागाने या क्षेत्रात जास्तीतजास्त प्रमाणात आत्मनिर्भर होण्याचा मार्ग चोखाळला आहे. भारताकडे उच्च तंत्रज्ञान उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास त्याचा विकास करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून स्वयंपूर्णता गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शस्त्रे, युद्ध विमाने आणि इतर सामग्री तसेच या सामग्रीचे सुटे भाग यांचा रशियाकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यास किंवा मंदावल्यास बुल्गारिया, पोलंड, जॉर्जिया, कझाकिस्तान आणि युक्रेन या देशांकडून तो होऊ शकतो. त्यामुळे सध्या मोठी अडचण निर्माण होणार नाही, मात्र यात आत्मनिर्भरता प्राप्त केल्यास देशालाच त्याचा फायदा होणार आहे. संरक्षण विभागाकडून 21 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील शस्त्रनिर्मिती कंपन्यांकडे आणि भारतातील खासगी कंपन्यांकडे येत्या पाच वर्षांमध्ये नोंदवण्यात येतील असा कयास बांधण्यात आला आहे. शस्त्र उत्पादनात खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्राने सहा वर्षांपूर्वीच घोषित केले आहे. त्यानुसार ही मागणी नोंदवली जाईल.
गेल्या काही वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत आणि शस्त्रे आणि संरक्षण उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनावर म्हणजेच 'मेक इन इंडिया'वर भर दिला आहे. त्याचीच ही परिणीती आहे, असे म्हणायला हरकत नाही. फिलीपिन्ससोबतचा हा क्षेपणास्त्र करार आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे कारण इतर आशियाई देशही आता भारतासोबतच्या संरक्षण सौद्यांमध्ये रस दाखवताना दिसत आहेत.  थायलंड, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांनीही भारताकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  या देशांना खरा धोका चीनकडून आहे.  त्यामुळे आपल्या लष्कराला अत्याधुनिक बनवणे त्यांच्यासाठी मजबुरी बनले आहे.  साहजिकच संरक्षण वस्तू आणि क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांच्या व्यापारासाठी भारतासमोर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
गेल्या सात वर्षांत भारताच्या संरक्षण निर्यातीत झपाट्याने वाढ झाल्याने आपण आता या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, हे आता सिद्ध झाले आहे.  संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी केवळ शस्त्रेच नव्हे तर सिम्युलेटर, टॉर्पेडो सिस्टीम, पाळत ठेवणे आणि नियंत्रण प्रणाली, अंधारातही पाहाता येणारी उपकरणे, चिलखती वाहने, सुरक्षा वाहने, शस्त्र शोधण्याचे रडार, कोस्टल रडार सिस्टीम यासारख्या प्रगत प्रणालींचीही निर्यात केली आहे.  सध्या भारत सत्तरहून अधिक देशांना संरक्षण उत्पादने विकत आहे, ही बाब काही कमी नाही.
आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की 2014-15 मध्ये भारताची संरक्षण निर्यात एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची होती, जी 2017-18 मध्ये चार हजार सहाशे 82 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि 2018-19 मध्ये  दहा हजार कोटी रुपयांचा  पल्ला गाठला.  एका वर्षात पाच हजार कोटींहून अधिकच्या या निर्याय उड्डाणावर प्रोत्साहित होऊन सरकारने पुढील पाच वर्षांत वार्षिक पस्तीस हजार कोटींच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.  विशेष म्हणजे अवकाश क्षेपणास्त्राच्या विक्रीलाही सरकारने मान्यता दिली असून अनेक आशियाई देशांव्यतिरिक्त  आशिया बाहेरील केनिया, सौदी अरेबिया, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेला भारत आज बहुतांश शस्त्रे स्वतःच बनवत आहे, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे.  त्याचाच परिणाम म्हणजे आज भारत आर्मेनियासारख्या देशाला संरक्षण वस्तू विकतो आहे जो एकेकाळी रशिया आणि पोलंडसारख्या देशांवर अवलंबून होता.  बुलेट प्रूफ जॅकेट विक्रीच्या बाबतीत अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीनंतर भारत हा चौथा देश बनला आहे.  सरकारने देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यास आणि  संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या नवीन कंपन्या सुरू करण्याकडे लक्ष दिल्यास भारत निश्चितच या क्षेत्रात मोठा निर्यातदार होऊ शकतो, यात शंका नाही.  मात्र या व्यवसायासाठी कंपन्यांना स्पर्धात्मक बनविण्याबरोबरच त्यांना लाल फितीच्या जाळ्यातून   मुक्त करावे लागेल. सरकारने आता या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतल्याने अडथळे आणि अडचणीही सुटत राहतील,यात शंका नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

वाढती महागाई संताप आणणारी!


सध्या देशात महागाई शिगेला पोहोचली आहे.  पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे त्याचा आलेख सातत्याने वरच्या दिशेने जात आहे.  याचा साहजिकच लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.  आधीच लोकांचे उत्पन्न घटले आहे, लाखो लोकांचा रोजगार हिरावून घेतला  गेला आहे, साहजिकच या वाढत्या महागाईमुळे कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादींवर खर्च करणे कठीण झाले आहे.  मात्र यावर नियंत्रण ठेवण्याची सरकारची कुठलीच भूमिका दिसत नाही. उलट महागाईचे समर्थन केले जात आहे,हे खेदजनक आहे. अशा स्थितीत विरोधकांनी एकजुटीने संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र सरकार याबाबत सकारात्मक भूमिका दाखवताना दिसत नाही.  लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास रद्द केले.  या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज बराच वेळ ठप्प झाले.  राज्यसभेतही तीच स्थिती होती.  इतर प्रकरणांमध्ये यापूर्वी दिसून आले आहे की, सभागृहात चर्चा न झाल्याने विरोधक रस्त्यावर उतरतात.  आधीच महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आंदोलन करत असताना, त्यावर संसदेत चर्चा न झाल्याने त्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्याची संधी मिळाली आहे. राज्याराज्यात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला लवचिक दृष्टिकोन ठेवून सर्व पक्षांची मते मागवावी लागतील.  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही, जिथे या विषयावर चर्चा करून व्यावहारिक मार्ग काढता येईल.  महागाईचा फटका प्रत्येक सामान्य नागरिकाला बसत आहे.  त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रावर होत आहे.  विशेषत: पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चर्चेत संकोच का असावा, असा प्रश्न उपस्थित होतो.  यावर मात करण्यासाठी सरकारने काही रणनीती आखली असेल, तर ती उघडपणे जाहीर करायला काहीच हरकत नसावी.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे इंधनाच्या वाढत्या किमतीचे प्रमुख कारण आहे.  मात्र सरकारने या वाढीचा निर्णय सुमारे तीन महिने रोखून धरल्यानंतरही या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत होत्या किंवा वाढल्या होत्या.  आता कंपन्यांचा पाच राज्यांतल्या निवडणूक काळातला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवल्या जात आहेत, त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याबाबत सरकार खरोखर गंभीर नसल्याचे यातून स्पष्ट होते. गेल्या सोळा दिवसांत इंधन दहा रुपयांनी महागले आहे.

गेल्या सात वर्षांत उत्पादन शुल्काच्या नावाखाली सरकारला लाखो कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.  सध्या इंधनावर उत्पादन शुल्कपोटी सुमारे 27 रुपये प्रति लिटर वसूल केले जात आहेत.  तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई आटोक्यात आणणे कठीण आहे, हे त्यांना समजत नाही, असे कसे म्हणता येईल. महागाईवर उपाय योजताना सरकार आधीच्या कमाईतून भरपाई करण्याचा विचार का करत नाही. तेल कंपन्यांचा विचार केला जातो,पण सामान्य लोकांचा का विचार केला जात नाही? सध्या महागाईचा उद्रेक संताप आणणारा आहे, पण लक्षात कोण घेतो, असा प्रश्न उपस्थित होतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली