फुटबॉलसारख्या जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळात लहान लहान देश सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना आपण पाहतो. परंतु लोकसंख्येने जगात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशाचा संघ पाहायला मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात फुटबॉलच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेऊन फुटबॉल विकासासाठी तळागाळातून प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात फुटबॉलमध्ये टॅलेंट आहे. जिद्दी, दमदार खेळाडू आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक नाव कमवत आहेत. परंतु देशातील फुटबॉलचा प्रसार, त्याला मिळणारे प्रोत्साहन ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे तसे दिले जात नाही.
फुटबॉल खेळाडू एक दोन वर्षात तयार होत नाहीत. त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. खेळाडूना मानसिक, आर्थिक पाठिंबा द्यावा लागतो. त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, योग्य आहार दिला पाहिजे. तेव्हा कोठे खेळाडू तयार होतात. म्हणूनच फुटबॉल टॅलॅटचा शोध घेऊन वयाच्या आठव्या, दहाव्या वर्षीपासूनच मुलांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये ईर्षा, आवड निर्माण होण्याकरिता वर्षभर सातत्याने स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे. यासाठी सरकारने या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना भरीव पाठिंबा दिला पाहिजे.
गोवा हे राज्य लहान आहे तरीही तेथील तीन-चार संघ सध्या राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. कारण तेथे वर्षभर फुटबॉल खेळला जातो. जर्मनीतील काही खेड्यात खेळाचे एकच मैदान आहे. मात्र अशा मैदानावर वर्षभर खेळाडू सराव करतात. याच पद्धतीने आपल्याकडे फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. ग्रामीण भागातसुद्धा खेळाची मैदाने तयार केली पाहिजेत. अलीकडील काळात कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. परंतु ही संख्या अजून वाढली पाहिजे. चांगल्या खेळासाठी तुम्हाला गावही सोडले पाहिजे.
कोल्हापुरातील केएसए फुटबॉलसाठी चांगले काम करत आहे. विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. आता मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे पदाधिकारी झाल्यापासून त्यांच्याही कामाला गती आली आहे. जागतिक स्पर्धा बघून ते नवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापुरात देशपातळीवरील संघांना येथे आणून त्यांच्याबरोबर स्थानिक संघांना खेळविण्याच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरचा फुटबॉल एका विशिष्ट उंचीवर पोहचला आहे. अशी कामगिरी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर खास योजना राबवली पाहिजे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा