बुधवार, ३१ मे, २०२३

शाळांमधील गुणवत्ता वाढली पाहिजे...

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शैक्षणिक स्थितीमध्ये काहीशी सुधारणा झालेली असली तरी, अजूनही मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज देशातील शालेय शिक्षणातील नोंदणीचे प्रमाण समाधानकारकरीत्या वाढले असले तरी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न मात्र कायम असल्याचेच दिसून येते.देशाच्या ग्रामीण भागातील शिक्षणाच्या वस्तुस्थितीचे सर्वेक्षण करुन तथ्य समोर आणणाऱ्या ‘प्रथम’ संस्थेद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘असर’च्या अहवालानुसार, देशातील तिसऱ्या इयत्तेतील वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ २०.५ टक्के तर दोन अंकी गणितीय वजाबाकी करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे २५.९ टक्के इतके आहे. दुसरीकडे, इयत्ता ५ वीच्या वर्गातील सामान्य भागाकार करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ २१.६ टक्के तर ८ वीच्या इयत्तेसाठी हे प्रमाण ४१.८ टक्के एवढेच असून त्यामध्ये २०१२ (४४.५%) च्या तुलनेत घट पहायला मिळते.इंग्रजी वाचनक्षमतेचा विचार करता, इयत्ता ५ वीच्या वर्गातील केवळ १७.५ टक्के विद्यार्थी इंग्रजी वाचन करू शकतात. इयत्ता ८ वीसाठी हे प्रमाण ४७.२ टक्के आहे. यावरून देशाच्या ग्रामीण भागाचे शैक्षणिक वास्तव समजण्यास मदत होते. आज माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राने जगभर मोठी क्रांती केली आहे. सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी, देशाच्या ग्रामीण भागातील केवळ ७.९ टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असल्याचे या अहवालावरून दिसून येते.तसेच, अजूनही २४ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तर २३.८ टक्के शाळांमध्ये शौचालयाची सुविधा नसल्याचे समोर येते. तर देशाच्या ग्रामीण भागातील ३१.१ टक्के शाळांमध्ये खेळाच्या मैदानाचा आभाव असल्याचे समोर येते. अशा प्रकारे, विद्यार्थ्यांची ज्ञानपातळी आणि शाळांच्या अवस्थेवरून देशाच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थितीचे वास्तव असेल तर आर्थिक विकासाला गती मिळेल का, हा मूलभूत प्रश्न आहे. नवीन शैक्षणिक धोरणात देशातील शिक्षणव्यवस्थेत रचनात्मक बदल करण्याचा सरकारचा विचार असला तरी, गुणात्मक पातळीवर ठोस कृतीचा अभाव जाणवतो, हे मात्र खरे. देशातील श्रमशक्ती आकडेवारी वाढवायची असेल तर शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

बुधवार, १७ मे, २०२३

फुटबॉल विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची आवश्यकता

फुटबॉलसारख्या जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळात लहान लहान देश सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना आपण पाहतो. परंतु लोकसंख्येने जगात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशाचा संघ पाहायला मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात फुटबॉलच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेऊन फुटबॉल विकासासाठी तळागाळातून प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात फुटबॉलमध्ये टॅलेंट आहे. जिद्दी, दमदार खेळाडू आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक नाव कमवत आहेत. परंतु देशातील फुटबॉलचा प्रसार, त्याला मिळणारे प्रोत्साहन ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे तसे दिले जात नाही.

 फुटबॉल खेळाडू एक दोन वर्षात तयार होत नाहीत. त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. खेळाडूना मानसिक, आर्थिक पाठिंबा द्यावा लागतो. त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, योग्य आहार दिला पाहिजे. तेव्हा कोठे खेळाडू तयार होतात. म्हणूनच फुटबॉल टॅलॅटचा शोध घेऊन वयाच्या आठव्या, दहाव्या वर्षीपासूनच मुलांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये ईर्षा, आवड निर्माण होण्याकरिता वर्षभर सातत्याने स्पर्धाचे आयोजन केले पाहिजे. यासाठी सरकारने या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्‍तींना भरीव पाठिंबा दिला पाहिजे. 

गोवा हे राज्य लहान आहे तरीही तेथील तीन-चार संघ सध्या राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. कारण तेथे वर्षभर फुटबॉल खेळला जातो. जर्मनीतील काही खेड्यात  खेळाचे एकच मैदान आहे. मात्र अशा मैदानावर वर्षभर खेळाडू सराव  करतात. याच पद्धतीने आपल्याकडे फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. ग्रामीण भागातसुद्धा खेळाची मैदाने तयार केली पाहिजेत. अलीकडील काळात कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. परंतु ही संख्या अजून वाढली पाहिजे. चांगल्या खेळासाठी तुम्हाला गावही सोडले पाहिजे. 

कोल्हापुरातील केएसए फुटबॉलसाठी चांगले काम करत आहे. विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. आता मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे पदाधिकारी झाल्यापासून त्यांच्याही कामाला गती आली आहे. जागतिक स्पर्धा बघून ते नवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापुरात देशपातळीवरील संघांना येथे आणून त्यांच्याबरोबर स्थानिक संघांना खेळविण्याच्या प्रयत्नामुळे कोल्हापूरचा फुटबॉल एका विशिष्ट उंचीवर पोहचला आहे. अशी कामगिरी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय स्तरावर खास योजना राबवली पाहिजे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईल स्क्रीनपासून ठेवा दूर

वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. मुलांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. प्रत्यक्षात मुलांचा स्क्रीन टाइम संपवावा व त्यांना वाचन लेखनाकडे पुन्हा वळवावे, असे प्रयत्न शाळा आणि कुटुंब स्तरावर व्हायला हवे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्याचा प्रयत्न होत आहे.  त्यामुळे सुट्टीत मोबाईल व टीव्हीची डीटॅचमेंट देणारे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. सुटीभर मुलांनी मोबाईल आणि टोव्ही स्क्रीनमुक्‍त राहावे, यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. एकतर मुले टीव्ही व मोबाईलमध्ये गुंतून पडतात. शाळा व अभ्यास नसल्याने पालकांना देखील मुलांना काय सांगावे, असा प्रश्‍न पडतो. तसेच मुले स्वतः तर टीव्ही व मोबाईलमध्ये गुंतून पडतात. पालक त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहत असतील तर ते देखील पाहतात. शाळा नसल्याने पालक त्यांना टाळून टीव्ही पाहू शकत नाहीत. म्हणजे उन्हाळी सुटीत या मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो आहे. मुलांना उत्तम प्रकारची उन्हाळी सुटी घालवण्यासाठी छंद वर्ग, शिबिरे, खेळ प्रशिक्षणे, कला वर्गांची गरज आहे. यामध्ये मुलांनी आवर्जून सहभागी व्हायला पाहिजे. विभक्त कुटुंबात मन लहान केल्याने नाती आक्रसतात. पण सुटीत नातेवाइकांकडे मुले पाठवली तर ते त्या कुटुंबाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना परिस्थितीशी तडजोड करण्याची सवय लागते. पण अति लाडाने पालक हे करायला तयार होत नाहीत. त्यामुळे नातीगोत्याचे संबंध मुलाने सुटीसाठी उपयोगी ठरतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सोमवार, २७ मार्च, २०२३

भूजल साठे समृद्ध करण्याची गरज

देशाच्या अद्वितीय भौगोलिक रचनेमुळे भारत हा जगातील सर्वात जास्त भूजल वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात पावसाद्वारे ४००० अब्ज घनमीटर पाणी मिळते. यापैकी १८६९ अब्ज घनमीटर पाणी भूपृष्ठावरील जलाच्या स्वरूपात असते. तर ४३२ अब्ज घनमीटर इतके पाणी भूजलाच्या स्वरूपात असते. उर्वरित पाणी बाष्प, द्रव, बर्फ ओलावा, दलदल या स्वरूपात असते. याच भूजलाचा आपण आज वारेमाप उपसा करीत आहोत. मात्र उपशाच्या प्रमाणात जलभरण आणि जलपुनर्भरण होत नाही. याचा गांभीर्याने कृतिशील विचार करण्याची वेळ आली आहे.  अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर इतर यांत्रिकी शोधाबरोबरच पाणी उपसणाऱ्या यंत्रांचा शोध लागला आणि त्यांचा वापर वाढला. डिझेल इंजिन वापरात आले आणि पूर्वीपेक्षा पंपाद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पुढे विजेच्या मोटारींवर पंपाच्या साहाय्याने भूजलाचा अल्पश्रमात आणि अल्प खर्चात उपसा आणखी वाढला. सबमर्सिबल पंप वापरात आले आणि विंधन विहिरी अधिक खोलवर आणि खडकाळ प्रदेशात घेणे शक्‍य झाले. यांत्रिकी शोधांमुळे मानवाची कष्टप्रद कामे अल्पश्रमात सहज साध्य होऊ लागली. परंतु या फायद्याबरोबरच शोधांचे काही अप्रत्यक्ष परिणामही होऊ लागले. पाण्याच्या अतिरेकी उपशाने आणि वापराने पाणीटंचाईत भर पडली. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. हे दुर्भिक्ष टाळावयाचे असेल तर भूजल साठे समृद्ध करणे गरजेचे आहे. या पृष्ठभूमीवर शाश्‍वत पाणी मिळण्यासाठी आता आपणास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यासाठी भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील जलसंवर्धनांच्या कामांना गती देण्याची गरज आहे. भूपृष्ठावर जागोजागी पावसाचे पाणी अडविण्याने लहान मोठे जलसाठे जर निर्माण झाले तर या पाण्याच्या जिरण्या मुरण्याने भूजलसाठेही समृद्ध होणार आहेत. जलभरणाच्या आणि कृत्रिम जलपुनर्भरणाच्या तुलनेत पाण्याचा उपसा कमी करून पाण्याची नासाडी, गळती, उधळपट्टी आणि अपव्यय टाळून पाण्याचा काटसकरीने वापर करून पाण्याच्या बचतीस चालना द्यावी लागणार आहे. किमान पाण्याच्या वापरातून आणि पुनर्वापरातून आपल्या गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तरच जलशक्तीच्या माध्यमातून जलक्रांतीकडे वाटचाल होऊ शकेल.


मंगळवार, २१ मार्च, २०२३

बेकारी कधी कमी होणार?

आपल्या देशात सर्वात मोठी समस्या ही वाढत्या बेकारीची आहे. वाढती बेकारी असंतोष आणि गुन्हेगारीला खतपाणी घालते. एनएसएसओच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, भारतातील 15 ते 29 वयोगटातील एकूण ३८ कोटींपैकी प्रत्येक तिसरा तरुण शिकतही नाही, काही प्रशिक्षण घेत नाही वा कोणताही व्यवसायही करत नाही. तथापि, भारतात ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चे युग सुरू आहे, ते 2036 पर्यंत राहील. चित्राची दुसरी बाजू आणखीनच भयावह आहे. लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, आठ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘पीएम कौशल विकास योजने’मध्ये प्रत्येक चार प्रशिक्षित व्यक्तींपैकी फक्त एकालाच नोकरी मिळू शकली, उर्वरित तीन जण प्रमाणपत्रे घेऊन फिरत राहिले. चिंतेची बाब अशी की, या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात केवळ 10 टक्के प्रशिक्षितांनाच नोकऱ्या मिळू शकतात. माहितीनुसार, आतापर्यंत 1.32 कोटी तरुणांना एकूण 188000 कोटी रुपये खर्च करून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. याचा अर्थ प्रत्येक तरुणाला प्रशिक्षित करण्यासाठी सरासरी 16000 रुपये लागले, परंतु केवळ 30 लाखांनाच उदरनिर्वाह करता आला. दुसरीकडे, नीती आयोगाने महिन्याभरापूर्वी आपल्या अहवालात म्हटले की, आयटीआयमधून प्रशिक्षित होऊन नोकरी मिळवणाऱ्या तरुणांची टक्केवारी 0.01 आहे. समाजातील 15 कोटी तरुण अशिक्षित आणि उत्पादन प्रक्रियेबाहेर असतील, तर आर्थिकपेक्षा सामाजिक धोका अधिक असेल. समाजशास्त्रज्ञांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण रिकामे बसण्यामुळे गुंडगिरी व गुन्हेगारी फोफावते. कोट्यवधी तरुण शिक्षण, प्रशिक्षण याबाबत उदासीन असतील किंवा ते मिळवूनही बेरोजगार असतील, तर घटनेच्या कलम 15(3) व 39 नुसार जबाबदारी सरकारची आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

शेतकऱ्याच्या उत्पादनाला चांगली किंमत येऊ द्या

यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. याशिवाय आणखी दिलासादायक बाब म्हणजे फक्त तृणधान्येच नव्हे तर कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादनही विक्रमी प्रमाणात होणार आहे. कडधान्ये आणि तेलबिया अथवा खाद्यतेल भारत मोठ्या प्रमाणात आयात करतो ,यासाठी आपल्याला जागतिक बाजारात भरपूर प्रमाणात परदेशी चलन खर्च करावे लागते. यात सर्वात दुखणे आपल्या शेतकऱ्यांचे आहे. दरवर्षी सरासरी उत्पादन वाढल्यानंतरही शेतकरी आनंदी नसतात. याचे कारण म्हणजे उत्पादन वाढले तर किमती घटतात आणि उत्पादन कमी झाले तर किंमत वाढीवर दलालांची अवकृपा होते. सध्या तृणधान्याचे उत्पादन २०२१- २२ पेक्षा आठ दशलक्ष मिलियन टन जास्त म्हणजे सुमारे ३२३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. यातून सरकारला आनंद वाटणे साहजिकच आहे,पण त्यांनी या उत्पादन वाढीचा लाभ घेण्यासाठी नवे धोरण आखण्याची गरज आहे. गहू आणि तांदूळ देशात आपल्या गरजेपेक्षा जास्त पिकत आहे. यात धान्याचे दर घसरू नयेत यासाठी सरकारचे प्रयत्न हवेत. रशिया- युक्रेन युद्धामुळे जगातील सर्व देशांमध्ये धान्याची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीही अशीच मागणी होती. मात्र सरकारने राजकीय कारणांमुळे किमतीवर नियंत्रणासाठी मध्येच निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला. आता सरकारला ठरवावे लागेल की त्यांना २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किमती नियंत्रणात ठेवायच्या की निर्यात पूर्णपणे खुली करत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगली किंमत मिळवून द्यायची आहे. धान्य उत्पादन वाढले आहे तर त्याचा फायदा रानात दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला झालाच पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

सुसंस्कृत पिढी घडविण्याचे केंद्र: राष्ट्रीय सेवा योजना


भारतातील महाविद्यालयांतून शिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींना ग्रामीण परिसराची जाणीव व्हावी, त्यांची सामाजिक कार्यात रुची वाढावी, र्शमदानाचे महत्त्व समजावे, सांस्कृतिक आदान-प्रदान होत असताना गतिक्षम नेतृत्व निर्माण व्हावे, या उद्देशाने महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून 24 सप्टेंबर 1969 पासून राष्ट्रीय सेवा योजना स्थापण्यात आली. युवक हा राष्ट्रीय सेवा योजनेचा केंद्रबिंदू असून, युवाशक्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे. देशाला सर्वोच्च स्थानावर नेणारा सुसंस्कारित युवक घडला नाही, तर देशाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युवाशक्तीकडे राष्ट्रीय संसाधन म्हणून पाहण्याची गरज आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे म्हणत, तरुणांचे हात उगारण्यासाठी नसून, देश उभारण्यासाठी आहेत. या तरुणांच्या शक्तीचा उपयोग ग्रामीण जनतेच्या विधायक कार्यासाठी करून घ्यायला हवा. युवकांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्ये रुजवली पाहिजेत. वाढत्या आत्महत्या, पैशांची लालसा वाढत चालल्याने गरज भागविण्यासाठी धुंडाळलेला वाममार्ग, वाढती व्यसनाधीनता, आदी समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालय पातळीवर व्हायला हवे. सुदृढ युवक हा सुदृढ समाजाची निर्मिती करू शकतो, हे लक्षात घेऊन या योजनेला सर्व स्तरांतून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. महाविद्यालयीन शिबिरे, विद्यापीठस्तरीय शिबिरे, मेगा कॅम्प शिबिरे, राज्यस्तरीय शिबिरे, आदींच्या माध्यमांतून व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रप्रेम, युवक नीतिमूल्ये, सामाजिक संस्कार, अंधर्शद्धा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, वृक्षलागवड, मूल्यशिक्षण, साक्षरता यांसारख्या मूल्यांचा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रसार सुरू आहे. तरुण हाच खरा देशाचा आधारस्तंभ आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली