शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

राज्यातील सिंचन क्षेत्र वाढण्याची गरज


शेतकर्‍यांचे 50 टक्केपेक्षा अधिक शेतीचे सिंचन होईल एवढे पाणी शेतकर्‍याला उपलब्ध झाले तर महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील व राज्याचे कृषी चित्रच बदलून जाईल.त्यामुळे ज्या भागात नद्या, धरणे नाहीत,त्या भागात नद्यांचे पाणी पाईपलाईन अथवा कालव्याद्वारे वळवण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न व्हायला हवा. आज कोरोना संकट काळात आपल्याला कृषी क्षेत्राने तारले आहे, हे समजून घेतले पाहिजे. कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग-व्यवसाय वाढीस लागण्याची गरज आहे. राज्याचा किंवा देशाचा विकास करताना इतर उद्योगांप्रमाणे कृषी उद्योग आणि कृषी क्षेत्र वाढीस लागण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी क्षेत्राच्या कमतरता आणि क्षमता याचे अध्ययन होणे आवश्यक आहे. विकासात शेती आणि उद्योगाचे महत्त्व अधिक आहे, हे नाकारून चालणार नाही.  आजच्या स्थितीत कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी अत्यंत कमी आहे. त्यामुळे रोजगार नाहीत व दरडोई उत्पन्नही वाढत नाही. 'वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन' या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आपल्याकडे ऊर्जा आहे, पाण्याची कमतरता आहे, दूरसंचार साधने आहेत आणि दळणवळण क्षेत्रात आपण खूप कामे केली आहेत. फक्त जलसिंचनाच्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत. मोदी सरकार  40 हजार कोटी महाराष्ट्राला सिंचनासाठी दिले  तसेच 60 हजार कोटी नदी जोड प्रकल्पाला दिले, असे सांगत आहे. यापूर्वीही राज्यात सिंचनावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, मात्र त्यामानाने पाण्याचे सिंचन झाले नाही. त्यामुळे अजूनही बहुतांश शेती जिरायतीवर अवलंबून आहे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याही मोठ्या प्रमाणात होत आहेत.  जोपर्यंत शेतकर्‍याला 12 तास पाणी मिळणार नाही तोपर्यंत शेतकर्‍याचे उत्पन्न वाढणार नाही. रस्त्यांची कामे करताना जेवढे नाले व नद्या आहेत, त्या खोल करण्याचे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे जलसंधारण होईल. उपलब्ध झालेले पाणी जमिनीत डिपॉझिट करा म्हणजे ते कधीही काढता येईल. जलसंधारणाचा मोठा कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.  सॅटेलाईट पोर्ट सिंदी राज्यात ठिकठिकाणी निर्माण करायला हवे. याद्वारे  शेतकर्‍याचा माल निर्यात करणे अत्यंत सुलभ होते. राज्यातल्या सांगली, सोलापूर, नाशिक याभागात डाळींब मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, द्राक्षे महत्त्वाचे पीक आहे. इथे पाण्याचा अपव्यय जास्त होत आहे. पाण्याची काटकसरीने वापर व्हायला हवा. विदर्भ पट्ट्यात  डाळींचे पीक चांगले होत आहे. या भागातील डाळींना वेगळी चव आहे. त्याचे मार्केटिंग केले गेले पाहिजे. नागपूर विभागात कापूस,  धान ही पिके अधिक होतात. अशा या पिकांवर अधिक संशोधन होऊन कमी पाण्यात शेती होण्यासाठी अधिक संशोधन होण्याची गरज आहे. त्यामुळे त्या भागात संशोधन केंद्र उभारले गेले पाहिजेत. देशात गहू, तांदळाचा साठा आता पुरेसा आहे. त्यामुळे पीकपध्दतीबद्दल विचार करावा लागणार आहे. शेतकर्‍यांनी आपल्या विहिरीचे पाणी आणि शेतीची जमीन तपासावी. त्यानुसार कोणते पीक घेणे योग्य राहील याचा निर्णय घेता येईल. सेंद्रीय खताचा अधिक वापर करून, खर्च कमी करून उत्पन्न कसे अधिक घेता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  तेलबियांचे उत्पन्न अधिक येईल यासाठीही प्रयत्न करावेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

जुन्या झाडांचे पुनर्रोपण व्हावे


राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने हमरस्ता होऊनही रयाच गेल्याची परिस्थिती आहे. डेरेदार झाडांच्या आकर्षक कमानी, उन्हाळ्यात मिळणारा थंडावा, ऊर्जा देणारा प्राणवायू या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. निसर्गसंपदाच नष्ट झाल्याने फार मोठे आणि भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे. खरे तर हा निसर्गाचा ठेवा टिकवता आला असता,परंतु प्रशासकीय अनास्था व विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कत्तलीमुळे महामार्ग उजाड बनत आहे. परदेशात आणि भारतातही अनेक ठिकाणी झाडांच्या पुनर्रोपणाचा यशस्वी झालेला प्रयोग राज्यात सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर  झाला असता तर बरे झाले असते. प्रशासकीय अनास्थेमुळे झालेले नुकसान एक शल्य म्हणून कायम बोचत राहणार आहे. रत्नागिरी-नागपूरसह राज्यात अनेक महामार्ग बनत चालले आहेत. मात्र यामुळे शेकडो वर्षांपासूनची झाडे सपापस कापली जात आहेत. अर्क महाकाय वृक्षांचा बळी गेला आहे. वास्तविक ही जुनी-पुराणी निसर्गसंपदा ऐतिहासिक ठेवा म्हणून जपला जावा म्हणून निसर्गप्रेमींनीही पुढाकार घ्यायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. उर्वरित भागातील जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण करून हा ऐतिहासिक ठेवा जपला जाऊ शकतो. पण शासनाचे काम,त्याला कोण अडवणार, ही मानसिकता सोडली पाहिजे. सांगली जिल्ह्यातील मिरजजवळील महाकाय वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. त्याला यश मिळाले. तसे अन्य जुन्या झाडांबाबतही करता येऊ शकते. याशिवाय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने दुतर्फा झाडे लावावीत ,असा नियम आहे. त्यानुसार महामार्गाला अडथळा येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करता येऊ शकते. ठेकेदारांच्या'हम करे सो कायदा' या वृत्तीमुळे तयार झाडांचा बळी जात आहे. वन विभागही याबाबत मूग गिळून बसल्यासारखी परिस्थिती आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पर्यावरण प्रेमी आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून जुन्या झाडांचे पुनर्रोपण करावे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या; संशय नको


कोरोनाचा संसर्ग मला होणार नाही ना? झाला तर माझ्यामुळे कुटुंबियांना होणार नाही ना, त्यातून मी बरा होईल ना. आरोग्य उपचार व्यवस्थित मिळतील ना. असे अनेक विचार सध्या अनेकांच्या डोक्यात येत असतील. लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नोकरी गेली आहे. अशातच आता काही व्यावसायिकांना व्यवसाय सुरळीत होईल का? अशा प्रश्नांनी बेचैन करून सोडले आहे, मात्र परिस्थिती गंभीर असली तरी काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या. संशय मनात आणू नका. विनाकारण त्रासात पडू नका. संकटाच्या काळात ताणतणाव, चिडचिडेपणा, झोप न येणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते. आणि सध्या याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सर्वत्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.याच दरम्यान कौटुंबिक कलहदेखील वाढले आहेत. मार्चपासून सतत या गोष्टी घडत असल्यामुळे अनेकांमध्ये ताणतणाव वाढले आहेत. कोरोनाचे संकट नुसते आरोग्याचे संकट न राहता हे आता आर्थिक आणि मानसिक संकट झाले आहे. बिघडलेली आर्थिक स्थिती कधी सुधारणार आणि पुढे काय करायचे? यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. या काळात धीराने आणि संयमाने स्वत:ला आणि कुटुंबाला सावरणे, सांभाळणे महत्त्वाचे आहे. ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून घरातील सर्वांनीच संयम बाळगला पाहिजे. घरातील वातावरण आनंदी, खेळकर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही परिस्थिती आणखी काही महिने राहणार आहे, हे उघड आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेत समाजात वावरले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेटणे जरी शक्य नसले तरी आपल्या जवळच्या मित्रांशी, नातेवाईकांशी फोनच्या माध्यमातून  बोलत राहणे गरजेचे आहे.   ताणतणाव असल्यास किंवा काही अडचणी असल्यास त्या गोष्टी एकमेकांशी बोलल्याने सुटू शकतात. कोणतेही विचार मनात दडवून ठेवणे म्हणजे मानसिक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या काळात विचारांना वाट मोकळी करून देणे गरजेचे आहे. सकारात्मक विचाराबरोबर सकारात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे. विशेषतः नकारात्मक बोलणाऱ्या, ताणतणाव देतील, अशा व्यक्तींपासून दूर रहा. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. त्याचबरोबर स्वत: स्वत:ची काळजी घ्यावी, ज्यांना मानसिक आजार असतील. त्यांनी एकटे राहू नये तसेच उपचार बंद न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नकारात्मक घटनांचा जास्त विचार करू नये आणि त्या पाहणेसुद्धा टाळावे. घरातील सर्वांनी मिळून वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली