सोमवार, २३ जानेवारी, २०२३

शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना

हरियाणातील कुस्तीपटुंच्या यशाचे, त्यांच्या परिश्रमाचे कौतुक होत आहे. हरियाणातून इतक्या मोठ्या संख्येने महिला कुस्तीपटू पुढे येणे आणि थेट राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारणे ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही. अशा या महिला खेळाडूंना  पोषक वातावरण, पायाभूत सुविधा देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारांचे आहे. परंतु वरवर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टी आतून किती भयावह आणि किडलेल्या आहेत, हे कुस्तीपटुंनीच चव्हाट्यावर आणले आहे. कुस्तीमध्ये भारताचे नाव जगात नेलेल्या या कुस्तीपटुंनी भारतीय कुस्ती महासंघाचे ‘नायक’ भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून जंतरमंतरवर त्यांच्या विरोधात आंदोलन केले. ही घटना देशवासियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.सहा वेळा खासदार आणि दशकापेक्षा अधिक काळ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असलेले ६६ वर्षीय ब्रिजभूषण सिंह दबंग आहेत. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात ते बाहुबली म्हणून ओळखले जातात. स्वत: कुस्तीगीर आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात पन्नासावर शाळा, महाविद्यालये आणि अनेक व्यायामशाळा उभारल्या आहेत. तरुणांना मैदानात उतरवले. त्यांच्याच काळात भारताने सर्वाधिक पदके पटकावली. परंतु अध्यक्षपदाचे यश त्यांच्या डोक्यात शिरले. शीघ्रकोपी असल्याने ते लवकरच ‘आता माझी सटकली’च्या भूमिकेत येतात. खाडकन मुस्काटातही देतात. याच ब्रिजभूषण यांच्यावर महिला मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना पदावरून हटवा आणि तुरुंगात डांबा, यासाठी जंतरमंतरवर बुधवार ते शुक्रवारपर्यंत त्यांनी आंदोलन केले. अनेक वर्षांपासून ते महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करीत असल्याच्या विनेश फोगट यांच्या आरोपाने केंद्र सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबले आहे. चौकशीसाठी समिती स्थापन झाली. महिनाभरात अहवाल येईल. परंतु प्रश्न सुटले का? विनेश फोगट यांनी ऑक्टोबर २०२१मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिवारासह भेट घेतली. तेव्हा त्यांनी विनेशला मुलगी म्हणून संबोधले होते. त्याचवेळी ब्रिजमोहन यांच्या काळ्या कृत्यांबाबत त्यांच्या कानावर घालण्यात आल्याचे विनेशचे म्हणणे आहे. सव्वा वर्ष होऊनही अत्यंत गंभीर आरोपावर मोदी कोणतीच कारवाई करणार नाहीत यावर विश्वास बसत नाही. कुठेतरी राजकारण मुरते का? हेही शोधावे लागेल. परंतु जंतरमंतरवरील मल्लांच्या आंदोलनाने मोदींच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’वर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लैंगिक शोषणातील आरोपी भाजपचा असला तर तो मोकाट सुटतो, अशी सातत्याने होणारी टीका यापुढे होणार नाही, याचीही सरकारला काळजी घ्यावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा