शनिवार, २४ जून, २०२३

रस्ते अपघात चिंताजनक

महाराष्ट्रात गेल्या वर्षी २०२२ मध्ये एकूण १४,८८३ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये हा आकडा 12,788 होता. अधिकृत आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात तीन वर्षात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत 2,095 ने वाढ झाली आहे, तर तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत 2022 मध्ये अशा घटनांमध्ये 144 ने वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 32,925 च्या तुलनेत गेल्या वर्षी राज्यात 33,069 रस्ते अपघात झाले. 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत 0.44 टक्क्यांनी वाढ झाली असताना, मृत्यूचे प्रमाण 16.38 टक्क्यांनी वाढले असले तरी या कालावधीत अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या 28,628 वरून 27,218 पर्यंत कमी झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ६१० तर विविध रस्त्यांवर एक हजारांपेक्षा जास्त 'ब्लॅक स्पॉट' आढळले आहेत. परिवहन विभागाने अशा ठिकाणांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. रस्त्यावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात ते ठिकाण म्हणजे ब्लॅक स्पॉट. त्याची अनेक कारणे सांगितली जातात. सरळ रस्त्यावर तीव्र उतार होतो, ज्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजूने येणारी वाहतूक दिसत नाही, रस्त्यावर अचानक येणारे तीव्र किंवा मोठे वळण जे चालकाच्या लवकर लक्षात येत नाही ही त्यापैकीच काही. दिशादर्शक चिन्हांचे, वेगमर्यादेचे फलक लावणे, रमलर स्ट्रिप्स, ब्लिंकर्स बसविण्यात यावेत असे काही उपाय त्यावर सुचवले जातात. रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. बळी जाणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, असे सातत्याने सांगितले जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरीही या मुद्दयावर सतत चिंता व्यक्‍त करतात. कमावत्या हातांचा अपघाती मृत्यू होणे हे केवळ त्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख तर असतेच, तसेच ते राष्ट्राचे देखील नुकसान असते. युवा पिढीमधील अतिवेगाची नशा, बेदरकारपणे वाहने चालवणे, सीटबेल्ट न लावणे आणि नियम न पाळणे यामुळेही अपघात वाढत आहेत. त्याचा भीतीदायक अनुभव पादचारी रोजच घेतात. २०२४ पर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्याहून कमी होईल, असा दावा गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता. महामार्गांवरील ब्लक स्पाट कमी करण्यासाठी सरकारने २५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. ब्लॅक स्पॉट कमी करण्याचे काम सरकारे करतील. पण उपरोक्त कारणे आटोक्यात आणणे ही वाहनचालकांची देखील जबाबदारी आहे. भरधाव वेगात वाहने चालवणे, नियमांना हरताळ फासणे यालाच युवापिढी पराक्रम मानू लागली असावी. पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतात. दंडही वसूल करतात. तथापि कारवाईमागचा उद्देश युवा पिढीने लक्षातच घेतला नाही तर कारवाई करणे हा फक्त उपचारच ठरणार नाही का? अपघातात तरुण व्यक्‍तीचा एकट्याचाच मृत्यू होतो का? त्याच्या अकाली मृत्यूने त्याचे कुटुंब उद्‌ध्वस्त होते. जगभरातील वाहनांपैकी फक्त एक टक्का वाहने भारतात आहेत, मात्र जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी एकूण  11 टक्के मृत्यू भारतात होतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्याचे  जाळे भारतात आहे. त्याची लांबी 58.9 लाख किमी आहे. मात्र निकृष्ट बांधकाम आणि  देखभालीच्या अभावामुळे बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.याशिवाय अपघातांना आळा घालण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि यंत्रणांची क्षमता वाढण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा