रविवार, १५ मे, २०२२

विधवा प्रथा बंद करून महिलांचा सन्मान करा


कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावच्या सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव घेऊन विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याचा आणि एक आदर्श घालून देण्याचा गावाने चांगला पायंडा पाडला आहे. गावाला यासाठी धन्यवाद द्यायला हवेत. याचे अनुकरण आता महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या गावांनी घ्यायला हवा आहे. साहजिकच यामुळे विधवा महिला सन्मानाने जगातील. त्यांच्यात अपराधीपणाची भावना, भीती आणि न्यूनगंड राहणार नाही. पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कूंकू पुसण्यात येते, बांगड्या फोडण्यात येतात. आयुष्यभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेऊन वावरता येत नाही. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमातला विधवांचा वावर अशुभ मनाला जातो.त्यामुळे त्यांना घरच्या कार्यक्रमातही एकाद्या कोपऱ्यात बसावे लागते. समाजात वावरताना मंगळसूत्राशिवाय आणि कपाळावरील काळ्या टिकलीसह वावरावे लागते. साहजिकच समाजातल्या विकारी नजरांना दबकत जगावे लागते. महिलेला नवरा नाही याच्या खुणा दिसत असल्याने जबरदस्ती, टोमणे,हीन वागणूक यांसारख्या  प्रकारामुळे जिवंतपणी नरकयातना सोसाव्या लागतात. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी ती विधवा आहे, याचे प्रदर्शन कोणत्याही प्रकाराने होता कामा नये. याचसाठी हेरवाड गावचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. गावातल्या लोकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

दैनिक सकाळ



शनिवार, ७ मे, २०२२

राष्ट्रपती निवडणूक: महिला उमेदवाराची चर्चा


पुढच्या महिन्यात राष्ट्रपती निवडणूक होत आहे. अर्थात या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदार कक्षाकडे म्हणजेच इलेक्ट्रोरल कॉलेजवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, भाजपला स्पष्ट बहुमतासाठी अजूनही सुमारे पाच लाखांहून जास्त मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी अजून तिथे या पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. पण तरीही यामुळे भाजपचे काही अडत नाही. 2017 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हे दाखवून दिले आहे. 'एनडीए' च्या परिघाबाहेरच्या नव्या पक्षांची साथ त्यांना मिळेल, असे बोलले जात आहे. एनडीएतील संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुक या मोठ्या पक्षांची साथ मिळत असली तरी शिवसेना आणि अकाली दल यावेळी भाजपसोबत असणार नाहीत. असे असले तरी अनेक प्रादेशिक पक्ष भाजप विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे. आंध्रप्रदेशमधील जगमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस व ओडिशातील नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल यांचा कल  भाजपकडे आहे. याशिवाय एकच पक्ष आणि एकाद दुसरा खासदार अशी स्थिती असलेले रिपब्लिकन पक्षासारखे (आठवले गट) अनेक पक्षही भाजपच्या बाजूने मतदान करणार आहेत. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय यंत्रणांचे शुक्लकाष्ठ मागे लागू नये म्हणून आणि जीएसटी परतावा थकबाकीसह केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर कसलाही परिणाम होऊ नये, यादृष्टीने अनेक सरकारे आपला निर्णय भाजपच्या बाजूने देतील, असा कयास बांधला जात आहे. 

युपीएची हालचाल अद्याप म्हणावी अशी गती पकडताना दिसत नाही. काँग्रेसच्या नव नेतृत्वाबद्दलच्या नाराजीतून काँग्रेसला काही राज्यांतल्या प्रमुख विरोधकांची साथ मिळणं कठीण झालं आहे. सध्याच्या घडीला द्रुमुक राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि डावे पक्ष यांचा युपीएला पाठींबा निश्चित मानला जात आहे. पंजाबमध्ये 'आप'ने मुसंडी मारली असल्याने आता राज्यसभेतही या पक्षाचे बळ वाढले आहे. दिल्ली व पंजाबातील घसघशीत संख्याबळ आधीच 'आप'कडे आहे. मात्र या पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे यूपीएला पाठिंबा देतील असे कोणी हमखास सांगू शकत नाही. तसेच अकाली दलाचे नेतृत्वही यूपीएच्या

उमेदवाराला पाठिंबा देईलच असे कोणीही सांगू शकत नाही. केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसी आदी अनेक नेते केवळ सोनिया गांधी यांनी शब्द टाकला तरच यूपीएला पाठिंबा देऊ शकतात, असा कयास काहीजण सांगतात. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचा सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. याशिवाय याखेपेला महिला उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, माजी सभापती सुमित्रा महाजन ,द्रौपदी मुर्मू ही नावे चर्चेत असली तरी मोदी एखाद्या वेगळ्याच नावाची घोषणा करून धक्कातंत्र वापरू शकतात, असेही म्हटले जात आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

शुक्रवार, ६ मे, २०२२

बॅटरीवरील वाहनांना संधी, पण...


डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने वाहन ग्राहक पर्यायी इंधन आणि वाहनांच्या शोधात आहे. इलेक्ट्रिक वाहनांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नव्हे ही वाहने खरेदी करण्याकडे शहरी ग्राहकांचा ओढा वाढला आहे. मात्र याच इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या स्फोटांच्या वारंवारच्या घटनांने ग्राहक संभ्रमितही झाला आहे. त्यामुळे साहजिकच या वाहनांच्या खरेदीला काहीशी खिळही बदली आहे. आणखी काही काळ थांबून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करूया, असा विचार ग्राहक करत आहे. त्यामुळे केंद्र सरकार किंवा अन्य सर्व्हेक्षणांच्या अंदाजानुसार या वाहनांचा उठाव म्हणावा तसा होणार नाही,हे उघड आहे.साहजिकच सरकारे आणि कंपन्या यांनी या वाहनांवर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर नियम व अटी कडक करण्याचीही आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहने घाईगडबडीत रस्त्यावर आणणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यावर अधिक काम होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच पुण्यात माहिती देताना सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांत विजेवर चालणार्‍या वाहनांच्या खपात तब्बल 1300 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या 12 लाख विजेवर चालणारी वाहनं आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा 40 लाखांपर्यंत जाईल. तर येत्या दोन वर्षात ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात खूप वाव असून या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं मत  त्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर विजेवर चालणार्‍या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेनं पर्यायी अँल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, अँल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झाले आहे. परिणामी आगामी काळात विजेवर चालणार्‍या वाहनांना खूप वाव असल्याचं श्री. गडकरी म्हणतात. मात्र यासाठी कंपन्यांनी वेगाने काम करताना काळजीही घ्यावी लागणार आहे. अलीकडच्या दोन तीन वर्षांत अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरल्या.मात्र आज अशाच कंपन्यांच्या वाहनांना बॅटरी बदलताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना बॅटऱ्या उपलब्ध होताना दिसत नसल्याने परिणामी ग्राहकांना आर्थिक घाटयाला सामोरे जावे लागत आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली



शनिवार, ९ एप्रिल, २०२२

इच्छा आणि मार्ग


कोरोना महामारीमुळे जगाची चिंता वाढवली. सुखवस्तू जीवन जगणाऱ्यालादेखील कोरोनाने काळजी करायला भाग पाडलं. जीवन क्षणभंगुर आहे,याचा अनेकांना साक्षात्कार झाला. कोरोनामुळे माणसाची चिंता पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढली. अजूनही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना आपल्याकडे कधी येईल,याचा नेम नाही. म्हणजे चिंता संपलेली नाही. मात्र एक गोष्टी घडली आहे. त्याची भीती कमी झाली आहे. खरे तर आधीच प्रत्येकाकडे एक नाही तर अनेक चिंता आहेत. त्यामुळे या चिंतेचे काय करायचं, असा प्रश्न उभा राहतो.  एका विचारवंताला विचारले गेले- जीवन कसे आहे?  आयुष्य म्हणजे काय?  उत्तर मिळाले - आपण ते कसे जगतो यावर सर्व अवलंबून आहे.  आपण हे जीवन कसे जगता? यावर ते म्हणतात- हे आपल्यावर अवलंबून आहे.  आपल्याला हे संभाषण काल्पनिक वाटत असल्यास, जॉन एच. मिलर काय म्हणतात बघा.  ते म्हणतात - आपण कधीही चिंता टाळू शकत नाही, परंतु जर आपण त्याबद्दल आपली मानसिकता बदलली तर चिंता दूर केली जाऊ शकते.

 अज्ञान मिटले, गोंधळ मिटला, व्यर्थाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली. पण यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत.  याबाबत चिनी लेखक लीन युटंगे लिहितात की, जीवन केवळ जगण्यासाठी नाही तर ते हेतुपूर्ण आणि अंतर्गत विकासासाठी असते.  अंत: करणात काम करण्याची आवड आणि उत्कटता असावी लागते.  आपल्या इच्छेपेक्षा कठोर परिश्रम करण्याची क्षमता आणि उत्कटता आपले जीवन यशस्वी करता येते. जशी इच्छा,तसा मार्ग.एका महान विद्वानाने असे म्हटले होते की, जेव्हा आपण स्वार्थाच्या पलीकडे जातो आणि आपला वेळ  इतरांसाठी काहीतरी करण्यास तयार असतो तेव्हा आपण एक वास्तविक आणि सकारात्मक जीवन जगत असतो.  केवळ उर्जा आणि सकारात्मकतेने समृद्ध झाल्याने आपण आयुष्य आनंददायक बनवू शकतो.  जोहान वॉन गोएथे म्हणाले त्याप्रमाणे - जेव्हा एखादी व्यक्ती स्वत: ला पूर्णपणे शरण जाते तेव्हा देव देखील त्याच्याबरोबर चालत राहतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

शस्त्रास्त्र क्षेत्रात भारत होणार आत्मनिर्भर


युक्रेन आणि रशिया युद्धामुळे रशियाकडून भारताला होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने देशातच शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 300 हून अधिक प्रकारच्या शस्त्रांचे उत्पादन भारतातच करण्याचा आदेश संरक्षण विभागाने दिल्याची माहिती खुद्द संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या शस्त्रास्त्रांमध्ये अत्याधुनिक सामग्रीचा अंतर्भाव आहे. अलिकडेच फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे विकण्याच्या करार केला होता. यामुळे देशाने या क्षेत्रात उतुंग भरारी घेतलीच आहे.  यापूर्वीच भारत  जगातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात भारताचे यश आता छोटे राहिलेले नाही.  देश आधीच अनेक प्रकारच्या संरक्षण वस्तू, उपकरणे, शस्त्रे आणि सुट्या भागांची निर्यात करत आहे. यात आता सरकारच्या या निर्णयामुळे आणखी वाढ होणार आहे.

भारतात निर्मिल्या जाणाऱ्या शस्त्रांमध्ये युद्ध हेलिकॉप्टर्स, लघु ते दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, रणगाड्यांची इंजिने, अर्ली  वॉर्निंग सिस्टिम्स व इतर शास्त्रांचा समावेश आहे. सध्या शस्त्रसामग्रीसाठी भारत 60 टक्के इतक्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. हे अवलंबित्व कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे. भारताची मोठी सीमारेषा आणि सामरिक आव्हाने लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत शस्त्रसामग्रीच्या आयातीवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे संरक्षण विभागाने या क्षेत्रात जास्तीतजास्त प्रमाणात आत्मनिर्भर होण्याचा मार्ग चोखाळला आहे. भारताकडे उच्च तंत्रज्ञान उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास त्याचा विकास करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून स्वयंपूर्णता गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शस्त्रे, युद्ध विमाने आणि इतर सामग्री तसेच या सामग्रीचे सुटे भाग यांचा रशियाकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यास किंवा मंदावल्यास बुल्गारिया, पोलंड, जॉर्जिया, कझाकिस्तान आणि युक्रेन या देशांकडून तो होऊ शकतो. त्यामुळे सध्या मोठी अडचण निर्माण होणार नाही, मात्र यात आत्मनिर्भरता प्राप्त केल्यास देशालाच त्याचा फायदा होणार आहे. संरक्षण विभागाकडून 21 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची मागणी सार्वजनिक क्षेत्रातील शस्त्रनिर्मिती कंपन्यांकडे आणि भारतातील खासगी कंपन्यांकडे येत्या पाच वर्षांमध्ये नोंदवण्यात येतील असा कयास बांधण्यात आला आहे. शस्त्र उत्पादनात खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्राने सहा वर्षांपूर्वीच घोषित केले आहे. त्यानुसार ही मागणी नोंदवली जाईल.
गेल्या काही वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत आणि शस्त्रे आणि संरक्षण उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनावर म्हणजेच 'मेक इन इंडिया'वर भर दिला आहे. त्याचीच ही परिणीती आहे, असे म्हणायला हरकत नाही. फिलीपिन्ससोबतचा हा क्षेपणास्त्र करार आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे कारण इतर आशियाई देशही आता भारतासोबतच्या संरक्षण सौद्यांमध्ये रस दाखवताना दिसत आहेत.  थायलंड, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांनीही भारताकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  या देशांना खरा धोका चीनकडून आहे.  त्यामुळे आपल्या लष्कराला अत्याधुनिक बनवणे त्यांच्यासाठी मजबुरी बनले आहे.  साहजिकच संरक्षण वस्तू आणि क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांच्या व्यापारासाठी भारतासमोर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
गेल्या सात वर्षांत भारताच्या संरक्षण निर्यातीत झपाट्याने वाढ झाल्याने आपण आता या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, हे आता सिद्ध झाले आहे.  संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी केवळ शस्त्रेच नव्हे तर सिम्युलेटर, टॉर्पेडो सिस्टीम, पाळत ठेवणे आणि नियंत्रण प्रणाली, अंधारातही पाहाता येणारी उपकरणे, चिलखती वाहने, सुरक्षा वाहने, शस्त्र शोधण्याचे रडार, कोस्टल रडार सिस्टीम यासारख्या प्रगत प्रणालींचीही निर्यात केली आहे.  सध्या भारत सत्तरहून अधिक देशांना संरक्षण उत्पादने विकत आहे, ही बाब काही कमी नाही.
आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की 2014-15 मध्ये भारताची संरक्षण निर्यात एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची होती, जी 2017-18 मध्ये चार हजार सहाशे 82 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि 2018-19 मध्ये  दहा हजार कोटी रुपयांचा  पल्ला गाठला.  एका वर्षात पाच हजार कोटींहून अधिकच्या या निर्याय उड्डाणावर प्रोत्साहित होऊन सरकारने पुढील पाच वर्षांत वार्षिक पस्तीस हजार कोटींच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.  विशेष म्हणजे अवकाश क्षेपणास्त्राच्या विक्रीलाही सरकारने मान्यता दिली असून अनेक आशियाई देशांव्यतिरिक्त  आशिया बाहेरील केनिया, सौदी अरेबिया, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेला भारत आज बहुतांश शस्त्रे स्वतःच बनवत आहे, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे.  त्याचाच परिणाम म्हणजे आज भारत आर्मेनियासारख्या देशाला संरक्षण वस्तू विकतो आहे जो एकेकाळी रशिया आणि पोलंडसारख्या देशांवर अवलंबून होता.  बुलेट प्रूफ जॅकेट विक्रीच्या बाबतीत अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीनंतर भारत हा चौथा देश बनला आहे.  सरकारने देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यास आणि  संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या नवीन कंपन्या सुरू करण्याकडे लक्ष दिल्यास भारत निश्चितच या क्षेत्रात मोठा निर्यातदार होऊ शकतो, यात शंका नाही.  मात्र या व्यवसायासाठी कंपन्यांना स्पर्धात्मक बनविण्याबरोबरच त्यांना लाल फितीच्या जाळ्यातून   मुक्त करावे लागेल. सरकारने आता या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतल्याने अडथळे आणि अडचणीही सुटत राहतील,यात शंका नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

वाढती महागाई संताप आणणारी!


सध्या देशात महागाई शिगेला पोहोचली आहे.  पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे त्याचा आलेख सातत्याने वरच्या दिशेने जात आहे.  याचा साहजिकच लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.  आधीच लोकांचे उत्पन्न घटले आहे, लाखो लोकांचा रोजगार हिरावून घेतला  गेला आहे, साहजिकच या वाढत्या महागाईमुळे कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादींवर खर्च करणे कठीण झाले आहे.  मात्र यावर नियंत्रण ठेवण्याची सरकारची कुठलीच भूमिका दिसत नाही. उलट महागाईचे समर्थन केले जात आहे,हे खेदजनक आहे. अशा स्थितीत विरोधकांनी एकजुटीने संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाईवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र सरकार याबाबत सकारात्मक भूमिका दाखवताना दिसत नाही.  लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास रद्द केले.  या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज बराच वेळ ठप्प झाले.  राज्यसभेतही तीच स्थिती होती.  इतर प्रकरणांमध्ये यापूर्वी दिसून आले आहे की, सभागृहात चर्चा न झाल्याने विरोधक रस्त्यावर उतरतात.  आधीच महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आंदोलन करत असताना, त्यावर संसदेत चर्चा न झाल्याने त्यांना आंदोलन अधिक तीव्र करण्याची संधी मिळाली आहे. राज्याराज्यात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत.

यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला लवचिक दृष्टिकोन ठेवून सर्व पक्षांची मते मागवावी लागतील.  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही, जिथे या विषयावर चर्चा करून व्यावहारिक मार्ग काढता येईल.  महागाईचा फटका प्रत्येक सामान्य नागरिकाला बसत आहे.  त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रावर होत आहे.  विशेषत: पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चर्चेत संकोच का असावा, असा प्रश्न उपस्थित होतो.  यावर मात करण्यासाठी सरकारने काही रणनीती आखली असेल, तर ती उघडपणे जाहीर करायला काहीच हरकत नसावी.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे इंधनाच्या वाढत्या किमतीचे प्रमुख कारण आहे.  मात्र सरकारने या वाढीचा निर्णय सुमारे तीन महिने रोखून धरल्यानंतरही या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत होत्या किंवा वाढल्या होत्या.  आता कंपन्यांचा पाच राज्यांतल्या निवडणूक काळातला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवल्या जात आहेत, त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याबाबत सरकार खरोखर गंभीर नसल्याचे यातून स्पष्ट होते. गेल्या सोळा दिवसांत इंधन दहा रुपयांनी महागले आहे.

गेल्या सात वर्षांत उत्पादन शुल्काच्या नावाखाली सरकारला लाखो कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे.  सध्या इंधनावर उत्पादन शुल्कपोटी सुमारे 27 रुपये प्रति लिटर वसूल केले जात आहेत.  तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई आटोक्यात आणणे कठीण आहे, हे त्यांना समजत नाही, असे कसे म्हणता येईल. महागाईवर उपाय योजताना सरकार आधीच्या कमाईतून भरपाई करण्याचा विचार का करत नाही. तेल कंपन्यांचा विचार केला जातो,पण सामान्य लोकांचा का विचार केला जात नाही? सध्या महागाईचा उद्रेक संताप आणणारा आहे, पण लक्षात कोण घेतो, असा प्रश्न उपस्थित होतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


शनिवार, १२ मार्च, २०२२

प्रयत्न करत राहा


जीवनात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर इतरांसाठी मार्गदर्शक ठराल.  स्वामी विवेकानंदांच्या या ओळींमध्ये जीवन-संघर्षाचे मर्म दडलेले आहे.  समाजात अशी अनेक माणसे आहेत, जी मोठी स्वप्ने घेऊन चालतात, पण एक-दोनदा अपयशी ठरल्यावर मधेच प्रयत्न सोडून देतात आणि मागे पडतात.  अशांना फार कमी कळलेलं असतं की ते यशाच्या अगदी जवळ आलेले असतात, कारण प्रत्येक प्रयत्नात एखादी व्यक्ती पूर्वीपेक्षा चांगली अनुभवी बनलेली असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही ना काही अनुभव समाविष्ट झालेला असतो. त्याचा उपयोग त्या व्यक्तीला पुढच्या प्रयत्नात नक्की होतो.

एखादी व्यक्ती पहिल्यांदाच नवीन ठिकाणी गेली तर तिला तिथे जाण्याचा मार्ग माहीत नसल्यामुळे वाटेत बराच वेळ वाया गेलेला असतो.  आणि जेव्हा तो पुन्हा त्याच ठिकाणी जातो तेव्हा त्याला त्या मार्गाचे ज्ञान झालेले असते आणि येणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा अनुभव देखील त्याला मिळालेला असतो. त्यामुळे ते ठिकाण त्यांना लवकर गाठता येतं. म्हणजे जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा त्याला आयुष्यात असे अनेक अनुभव येतात, जे कधीच व्यर्थ जात नाहीत.  समस्यांचे निराकरण करण्याचा गुण जन्मापासूनच माणसाच्या अंगी असतो, परंतु स्वतःच्या निर्णयातून, जीवनात घेतलेल्या कृतींमधून, मिळालेल्या अनुभवांमधून तो गुण अधिक उपयोगाचा ठरतो.  अनेक अपयशानंतर थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावला हे प्रसिद्ध आहे.  त्यांना प्रत्येक प्रयत्नात काही ना काही नवीन शिकायला मिळाले आणि पुढच्या प्रयत्नात त्यांनी त्याचा समावेश केला.  मग ते म्हणाले, 'मी कधीच अपयशी झालो नाही, मी दहा हजार मार्ग शोधले,एवढंच की जे माझ्यासाठी कामी आले नाहीत.'- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली