शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

बलात्काऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी....


उत्तरप्रदेशातील हाथरससारख्या तरुणींवर अत्याचार करून अमानुषपणे जीव घेण्याच्या घटना  यापुर्वीही अनेकदा घडल्या आहेत. अरुणा शानबाग, बलात्कार झाल्यानंतर तब्बल बेचाळीस वर्ष कोमात होती. निर्भया, जी बलात्कारानंतर मरण पावली. नेहा, जिला बलात्कार केल्यानंतर जाळून टाकले. अशा कितीतरी  अत्याचाराला बळी पडणार्‍या तरुणींची संख्या आहे. सध्याचा काळ हा बिभत्स स्वरुपाचा काळ आहे. नराधम पिसाळले आहेत. म्हणून अशा घटना वारंवार घडत आहेत. आरोपीला जबर शिक्षा होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना आज घडत आहेत. त्या घटनात वाढ होत आहे. मागे नेहा नावाच्या डॉक्टर मुलीवर, ती रात्रीला रुग्णालयातून घरी जात असताना बलात्कार झाला. त्यानंतर तिला जाळून टाकण्यात आले. त्याचबरोबर तिच्या मारेकर्‍यांना पोलिस चकमकीत मारुन टाकण्यात आले. हाथरस घटनेत ज्याप्रमाणे त्या आरोपींनी पीडितेची जीभ तोडली. कंबर आणि हातपाय तोडले. तसाच प्रकार आरोपीसोबत करून त्यांचीही जीभ आणि कंबरडे तोडायला हवे. हातपाय तोडायला हवे. किंवा फक्त एक हात शाबूत ठेवून त्याला भीक मागायला सोडायला हवे. अशा प्रकरणातील आरोपींना काही लोक फाशी द्या म्हणतात. पण फाशी हा त्यावरील उपाय नाही. लोक मरणाला आता घाबरत नाहीत. लोक निर्भीडपणे आत्महत्या करतात. त्यामुळे फाशी देणे म्हणजे आरोपीला त्रासातून मुक्त करणे होय. त्याला जगवावे. जेणेकरुन त्याला पश्‍चाताप व्हावा आपल्या सुदृढ शरीराचा. त्यालाही आठवायला हवे की मी जर असे केले नसते,तर माझे असे हातपाय तुटले नसते. मला असे लुळे पांगळे बनवले गेले नसते. हाच बोध इतरांनाही देता येईल. अनेकदा अशा अत्याचार प्रकरणात काही लोक माहिलांच उपदेशाचे डोस देतात. महिलांनी असे वागावे. तसे वागावे. महिला अशा वागतात, तशा वागतात. म्हणून असे होते. पण तसे काही नाही. ही मानसिकता आहे. कुविचाराची मानसिकता. जेव्हा असे कुविचार डोक्यात येतात. तेव्हा आपण काय करीत आहोत, याचे भान नसते. त्यानंतर आपले काय होणार आहे. काय होवू शकते. याचाही विचार कोणीच कृत्य करण्यापूर्वी करीत नाहीत. मग कृत्य झाले की त्यानंतर पश्‍चाताप येतो. तेवढीच भीतीही वाटते. वाटते की आपला हा गुन्हा उजेडात आला तर.... आपल्याला शिक्षा होईल. याच भीतीने मग हातपाय तोडणे, जीभ छाटणे, बाह्य तसेच आंतर अवयवांना इजा पोहचविणे तसेच कंबरडे मोडणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. कधी कधी ठारही केले जाते. वास्तविक सामूहिक बलात्काराचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही.  आरोपींना जबर शिक्षा,जशास तशा शिक्षा न झाल्याने आरोपींना अभय मिळाले. त्यामुळे त्यांचे धाडस वाढत चालले आहे. यावर आणखी एक  उपाय आहे की मुलींना स्व रक्षणाचे प्रशिक्षण सक्तीचे करणे. शाळास्तरावर याची व्यवस्था व्हायला हवी. ठराविक वयानंतर तरुणींना शस्र वापरण्याची  परवानगी द्यावी. जेणेकरुन त्या एखाद्या तरी नराधमाचे लचके नक्कीच तोडतील. असे लचके जोपर्यंत तोडले जाणार नाही,तोपर्यंत तरी या बलात्काराच्या संख्येत घट होणार नाही. तसेच देशातील बलात्कार बंद होणार नाहीत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा