रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू रोखायला हवेत


जगात हवेच्या प्रदूषणामुळे दरवर्षी सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू होतो. अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये हवेच्या प्रदूषणाचे कारण चौथ्या क्रमांकावर आहे. उच्च रक्तदाब आजाराने जगात दरवर्षी 1.08 कोटी लोक मृत्यू पावतात. तर तंबाकू सेवनाने 87.1 लाख लोकांचा मृत्यू होतो. आहारासंबंधीच्या आजारांमुळे सुमारे 79.4 लाख लोक आपला जीव गमावतात. आणि हवेच्या प्रदूषणामुळे जगभरातील 66.7 लाख लोक मृत्यू पावतात. आपल्या देशात हवेचे प्रदूषण भयानक वाढले आहे. मोठी आणि निमशहरे या प्रदूषणाच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात मुलांची संख्या मोठी असल्याचा धक्कादायक खुलासा अमेरिकेतील अभ्यासकांनी केला आहे. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे विश्लेषण करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार गेल्यावर्षी 1.16 लाख लहान मुलांचा बळी हवेच्या प्रदूषणाने गेला आहे. हवेतील विषारी घटकांमुळे जगभरात पाच लाख लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, ही मोठी चिंताजनक बाब आहे. हवेतील पीएम 2.5 कणांमुळे (2.5 मायक्रॉन पेक्षा कमी आकाराचे कण) बालकांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण निम्मे आहे. श्वसनाशी संबंधित 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज' (सीओपीडी) ,मधुमेह, हृदयरोग, तीव्र श्वसन संक्रमण (एलआर आय) अशा आजारांमधील मृत्यूतही हवेचे प्रदूषण कारणीभूत असते. वास्तविक बालकांचे सर्वाधिक मृत्यू हे जन्माच्या वेळी वजन कमी असणे किंवा अकाली जन्म झाल्याने होतात. याचे प्रमुख कारण गर्भवती महिला विषारी हवेच्या संपर्कात आल्याने ही वेळ ओढवू शकते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र याचे जैविक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही ज्याप्रमाणे मातेच्या धूम्रपानामुळे बाळाचे वजन कमी भरण्याबरोबरच अकाली जन्म होतो, त्याचप्रमाणे हवेच्या प्रदूषणाचा परिणाम होतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. सध्याच्या भौतिक सोयी-सुविधांची आसक्ती पाहता हवेचे प्रदूषण आपल्याला थांबवता येत नाही, पण कमी जरूर करता येते आणि प्रदूषणामुळे बळी जाणारे जीव आपण वाचवू शकतो. यासाठी आपल्याला पहिल्यांदा शहरांचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. हे कसे करायचे? - तर शहरातील स्थापित होणारे उद्योगधंदे खेड्यात उभी राहायला हवीत. वास्तविक शेतीपूरक उद्योग खेड्यांमध्ये सुरू करायला काहीच हरकत नाही. यासाठी लागणारा कच्चा माल येथेच उपलब्ध होतो. साहजिकच शहरातील माणसांची गर्दी कमी होऊन ती खेड्यांकडे जाईल. शहरे गर्दीमुक्त होतील. विशेष म्हणजे खेड्यातल्या लोकांना काम मिळेल. आणखी एक म्हणजे झाडे लावली पाहिजेत.शहरात जिथे जागा उपलब्ध आहे, तिथे झाडे लावली जायला हवीत.यासाठी खास जागा आरक्षित करण्याची गरज आहे. काहीही झाले तरी या जागांवर दुसऱ्या कुणी अतिक्रमण करता कामा नये, अशाप्रकारेचे कायदे व्हायला हवेत. पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनावर  चालणारी वाहने यांची संख्या कमी करून इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक समावेश होईल, अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. यासाठी अशा वाहनांना सवलती मिळाव्यात. घरापासून जवळपास जायचे असल्यास सायकलचा किंवा परिवहन महामंडळाच्या वाहनांचा वापर अधिक करायला हवा. तरच हवेची प्रदूषण समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषणामुळे लोकांच्या  होणाऱ्या  मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून ही समस्या अशीच वाढत राहिली तर मृत्यू प्रमाण तर वाढणार आहेच,पण हे आजार पुढच्या पिढीतही संक्रमित होणार आहेत.त्यामुळे आताच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रदूषणाचा मुद्दा जरूर घ्यायला हवा किंवा तसे करण्यास जनतेने त्यांना भाग पाडायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा