मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

डोळ्यांची काळजी घ्या, मोबाईल दूर ठेवा


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीने शाळा-कॉलेज बंद असल्याने मुलांना घरातच 'बंद' व्हावे लागले आहे. त्यातच शालेय शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मोबाईल,लॅपटॉप, टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना दिसत आहेत. दिवसभरात दोन-तीन तास स्क्रीनसाठी पुष्कळ झाले. पण तेही एकसारखे पाहिले जाऊ नये. अलिकडे टीव्ही, मोबाईलमुळे पुस्तकं किंवा वर्तमानपत्रे घेऊन वाचन करणे कमी झाले आहे. मात्र यामुळे डोळ्यांचे आजार वाढत चालले आहेत. युवकांसाठी डोळे शाबूत राखणे महत्त्वाचे आहे. ज्या सेवेत शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे, उदाहरणार्थ लष्कर, नौदल, वायुदल अशा या ठिकाणी जाणाऱ्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी तर आपल्या डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. घरातील मोठी माणसेही पुस्तके, वृत्तपत्र वाचण्याकडे दुर्लक्ष करीत इलेक्ट्रानिक  माध्यामांचा वापर अधिक करताना दिसत  आहेत. परंतु या इलेक्ट्रानिक साहित्याच्या वापरामुळे डोळ्यांचे आजार अधिक वाढत आहेत. सतत टीव्ही पाहिल्याने डोळ्यातील कोरडेपणा वाढतो. यामुळे डोळ्यांना काही आजार नसतांनाही डोळ्यांची चमक कमी होते. डोळ्यांवरील ताण वाढतो. त्यामुळे हळूहळू चष्याचे नंबर वाढतात. इलेक्ट्रानिक साहित्याचा वापर केला तर डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्याचा रेटीनाही खराब होण्याची शक्यता असते. अलीकडे तरुण पिढी आपला सर्वाधिक वेळ हा मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात घालविते. त्यामुळे तरुणी पिढीला लवकरच चष्म्यांचा आधार घ्यावा लागत आहे. पुर्वी लोक टीव्ही कमी पाहत होते, बातम्यांसाठी विश्वासहार्य माध्यम म्हणून वृत्तपत्रांचे वाचन अधिक करीत होते. त्यामुळे तेव्हा डोळ्यांचे आजार सुध्दा फार नव्हते.

वृत्तपत्र वाचनामुळे डोळ्यावर ताण पडत नाही. इलेक्ट्रानिक साहित्यांचा वापर वाढला आहे. ते साहित्य वापरु नका असे आजच्या काळात म्हणता येत नाही, परंतु त्यांचा वापर मर्यादीत करायला हवा आहे. जर त्याचा पर्याय वृतपत्र असेल तर तो निश्चित चांगला आहे. वृत्तपत्रातील बातम्या या कधीही विश्वासहार्य आणि अचूक असतात. त्याचा डोळ्यांवरही विपरीत परिणाम होत नाही. वृत्तपत्र माणूस सोयीनुसार वाचत व पाहात असतो. परंतु टीव्हीवरील बातम्या पाहताना एकसारखे पाहावे लागत असल्याने डोळ्यांवरील ताण वाढतो.परिणामी डोळ्यांचे आजार बळावतात. 

खरे तर लहान मुलांनी मोबाईलचा वापर करू नये, त्याचे त्यांच्या डोळ्यावर दुष्परिणाम होतात.परिणामी लहान वयातच त्यांना चष्मा लागतो. लॉकडाऊननंतर इलेक्ट्रानिक उपकरणांचा वापर अधिक वाढल्याने डोळ्यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डॉक्टर सांगतात की, इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करीत असताना योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी एकतर इलेक्ट्रानिकचा माध्यमाचा वापर करू नये आणि करायचा असल्यास ते कमी प्रमाणात करावे. सतत टीव्हीसमोर बसू राहू नये. डोळ्यांच्या पापण्यांच्या हालचाली करीत राहील्यास डोळ्यांचा ताण कमी होईल. परिणामी डोळ्यांचे आजार बळावणार नाहीत. यानंतरही त्रास जाणवले तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा