मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

पोलिसांची कार्यपद्धती सुधारण्याची गरज

देशातील लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या खूप कमी आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यरत पोलिसांना मोठ्या तणावाखाली काम करावे लागते. त्याचा परिणाम पोलिसांच्या तपासकार्यावर होतो.त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवून इतर शासकीय कर्मचा-यांप्रमाणे पोलिसांना देखील ८ तासांची ड्युटी देणे आवश्यक आहे. परंतु मनुष्यबळ कमी आहे म्हणून पोलिसांकडून होणाऱ्या चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुन्हा घडल्यानंतर आरोपीला अटक करणे व त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होईल, इतपत पुराव्यांसहित न्यायालयात आरोपपत्र दाखल करणे हे पोलिसांचे निहित कर्तव्य आहे. परंतु  अटक टाळण्यासाठी आरोपीकडे लाच मागणे, सदोष आरोपपत्र दाखल करणे, पोलिस कोठडीतील मृत्यू, खोट्या चकमकीत कथित गुन्हेगारांना ठार करणे, आर्थिक लाभासाठी हद्दीतील अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणे, तपास कार्याकडे दुर्लक्ष करणे, तक्रार स्वीकारण्यास नकार देणे इ. भारतीय पोलीस व्यवस्थेतील गंभीर दोष आहेत.एखाद्या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे मारणे ही एक नियमित बाब बनली आहे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आत्मविश्वासाने वावरतात तर अन्याय झालेल्या निरपराध व्यक्तीला तिथे असुरक्षित वाटते.याला सर्वस्वी पोलिसांची कार्यपद्धती जबाबदार आहे. सन २०२० मध्ये एका खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व सर्व राज्य सरकार यांना देशातील सर्व पोलिस स्टेशन्समध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. पण आजतागायत यावर अंमलबजावणी झालेली नाही. यातच काय ते आले."मानवी हक्कांना सर्वाधिक धोका पोलिस स्टेशनमध्ये आहे", हे माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे विधान जळजळीत वास्तव दाखवणारे आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेने आपली विश्वासार्हता धोक्यात आणली आहे.अर्थात, ही विश्वासार्हता धोक्यात येण्यामागे पोलिसांसोबतच सत्ताधारी राजकीय नेत्यांकडून होणारा हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे. एखादा गुन्हेगार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल तर त्याला अटक करण्यासाठी पोलिस कचरतात. अटकच टाळली जाणार असेल किंवा उशिरा होणारी असेल तर तपासकार्य कसे होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

बलात्कार प्रकरणातील प्रस्तावित कायद्यात बलात्कारासाठी सातऐवजी १० वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. परंतु जिथे राजकीय दबावामुळे अटकच होणार नसेल तर कठोर शिक्षेच्या तरतुदीचा उपयोग काय? गुन्हेगारांना कठोर शिक्षा असणाऱ्या कायद्याची भीती नसते.तर शिक्षेच्या निश्चित अंमलबजावणीची भीती असते. त्यामुळे अटक व तपासकार्य पारदर्शक होण्यासाठी स्वायत्त पोलिस यंत्रणेची गरज आहे. यासाठी १९९६ मध्ये प्रकाश सिंग व एन. के. सिंग या दोन माजी पोलिस महासंचालकांनी स्वायत्त पोलिस यंत्रणेसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.२००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय देत पोलिसांची स्वायत्तता निश्चित करण्यासाठी सरकारला सात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. परंतु सरकारने अद्याप यावर ठोस पावले उचलली नाहीत. पोलिस यंत्रणेचा गैरवापर करण्याची सवय असणारे राजकीय पक्ष पोलिसांना स्वायत्तता देऊ इच्छित नाहीत. यामुळे नागरिकांना न्याय मिळवून देण्याची घोषणा ही फक्त वल्गना ठरण्याची भीती आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा