सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी काय घोडं मारलंय?


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या मागणीसाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती आता यावर निर्णय घेणार आहे. आता त्याच धर्तीवर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनादेखील राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यासाठी समिती गठीत करायला हवी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते मिळत असले तरी अनेक महत्त्वपूर्ण सवलतींपासून जिल्हा परिषद कर्मचारी वंचित आहेत. राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे पगार कोषागारमधून एकत्रित निधीतून करण्यात येत असून, राज्य शासनाच्या अनुदानासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्यात अनुदानाची वाट पाहावी लागते, तर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दर महिन्यात वित्त विभागाकडे मागणी करावी लागते, यासाठी बराच कालापव्यय होतो व त्याचा भुर्दंड कर्मचार्‍यांना सोसावा लागतो. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा दिल्यास वेतनासाठी हात पसरविण्याचे आवश्यकता भासणार नाही. राज्य शासनाचा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा आकृतीबंधमध्ये तफावत असून, राज्य कर्मचार्‍यांना झुकते माप दिले आहे. राज्य कर्मचार्‍यांना जीआर निघाल्यावर निर्णय लागू होतो. तर जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना प्रत्येकवेळी ग्रामविकास विभागाचा निर्णयाची वाट पाहावी लागते. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना निमशासकीय कर्मचारी संबोधले जात असल्यामुळे अनेक सवलती शासनाकडून नाकारल्या जास्त जातात. त्यामुळे त्यांना राज्य कर्मचार्‍यांना दर्जा देण्याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली





शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

संयम आणि प्रगती


काही लोकांना वाटते की संयम म्हणजे हळू हळू कृती करणे. पण सत्य असं नाही.  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफे यांच्या मते, जो कोणी तुम्हाला तुमच्यापेक्षा जितका अधिक  पुढे आहे, असे दिसतो, तो खरं तर तुमच्यापेक्षाही जास्त धीर धरणारा म्हणजे मोठा संयमी असतो.  जीवनात कितीही संकटे आली तरी त्यावर सहज मात करता येते, जर व्यक्ती घाईगडबड करत नसेल आणि तो थांबून परिस्थितीवर विचार करू शकत असेल तर! हे खरे आहे की चिकाटीने केलेले काम यशाची हमी देत ​​नाही, परंतु अपयशावर मात करण्याचे इतर मार्ग आहेत याची हमी देते.  माणसाने संयमाने जीवन जगले तर त्याची भौतिक प्रगतीबरोबरच आध्यात्मिक प्रगतीही होते.

धीर धरणे हा केवळ एक चांगला गुण नाही तर एक कौशल्य देखील आहे.  संयम म्हणजे तुमचा संयम किंवा आशा न गमावता विलंब, संकट आणि त्रासदायक क्षण स्वीकारण्याची किंवा सहन करण्याची क्षमता.  जेव्हा परिस्थिती आपल्या अनुकूल नसते तेव्हा आपण प्रत्येक क्षणी संयम बाळगला पाहिजे.  सुप्रसिद्ध लेखिका जॉयस मेयर म्हणतात की संयम म्हणजे केवळ प्रतीक्षा करण्याची क्षमता नाही तर या काळात आपण कसे वागतो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.  आजकाल तंत्रज्ञानामुळे आपल्या कामाचा वेग तर वाढला आहेच, पण त्यासोबत लगेच निकाल मिळण्याची उत्सुकताही वाढली आहे.

थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांना बल्बचा शोध लावायला बरीच वर्षे लागली. या शोधात त्यांचे साथीदारही त्यांना सोडून गेले, पण एका रात्री ते योग्य तारेपर्यंत पोहोचले आणि बल्ब प्रकाशमान झाला.  ज्वलंत प्रकाश एडिसनच्या तीन वर्षांच्या संयमाचे प्रतिफळ होते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

तिसऱ्या लाटेकडे लक्ष असू द्या


कोरोना व्हायरसमुळे युरोपची पुन्हा एकदा वाईट परिस्थितीत झाली असल्याच्या बातम्या येत आहे.  तिथे कोविड संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत असल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार दिसून येत आहे. या अहवालानुसार जर्मनीमध्ये गेल्या 24 तासांत कोविडचे 50 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.  जर्मनीतील या संसर्गाने गेल्या पाच महिन्यांचा विक्रम मोडला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाचा हाहाकार माजत आहे. या बातम्यांनुसार युरोपात तिसऱ्या आणि चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतानेही याकडे लक्ष ठेवून नियोजन करायला हवे. निवडणुका,यात्रा आणि जत्रा यांचे नियोजन करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन कसे होईल,याकडे लक्ष दिले पाहिजे. दोन्ही डोस पूर्ण करण्याबरोबरच शाळा व महाविद्यालयातील मुलांना डोस तातडीने मिळण्याच्या दृष्टीने नियोजन व्हायला हवे आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप लस उपलब्ध झाली नाही. त्यांना शाळेतच लस कशी उपलब्ध होईल,हे पाहावे लागणार आहे. ज्यांनी दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोसचे नियोजन व्हायला हवे आहे. तिसरी लाट उसळण्यापूर्वीच त्यावर निर्बंध कसे घालता येईल,याची तयारी आता पासूनच व्हायला हवी. आपण दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करून निवडणुका घेत बसलो. त्याचा फटका आपल्याला चांगलाच बसला आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण मोठे होते. 

पहिली लाट शहरात मोठ्या प्रमाणात पसरली तर दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाची अवस्था वाईट करून सोडली. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून सर्वच पातळीवर अगोदरच नियोजन आणि व्यवस्था करून ठेवायला हवी आहे.

जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटले आहे की ज्यांना लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.  कोविड-19 विरुद्ध लोकांना अधिक प्रतिकारशक्ती देण्यासाठी जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी बूस्टर डोससह देशातील लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.  यासोबतच देशात तपासाची संख्या वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे. पहिली व दुसरी लाट उन्हाळ्याच्या प्रारंभाला भारतात आली होती. याचा अंदाज घेऊन काही लोक तिसरी लाट जानेवारी ते मार्च 2022 याच काळात येईल, असे म्हणत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन लोकांनी यात्रा,उत्सव, विवाह सोहळे साजरे करताना अंतर, मास्क आणि सॅनिटायझर या नियमांचे पालन करावे. यात खंड पडू देऊ नये. तिसरी लाट आल्यास पुन्हा आपल्या देशात अनेक व्यवसाय, उद्योग यांना मोठा फटका बसणार आहे. दोन लाटेत देशातील 17 कोटी मध्यमवर्गीय लोक दारिद्र्य रेषेखाली गेल्याचे आकडेवारी सांगत आहे. तिसरी लाट आल्यास आणखी मध्यमवर्गीय दारिद्र्य रेषेखाली जातील. गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासन,प्रशासन आणि समाजातील प्रत्येक घटकाने काळजी घेतली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

मोबाईलचा 'पॅटर्न लॉक' ठरतोय मदतीला अडसर


रात्री-अपरात्री प्रवास करताना अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना वेळेत मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. मात्र, संबंधित वाहनचालक व प्रवासी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या मोबाइलच्या पॅटर्न लॉकमुळे वेळेत मदत करता येत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.  त्यामुळे प्रवास करताना लोकांनी मोबाइलला 'पॅटर्न लॉक' ठेवू नये. आपल्या देशात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे आहे,शिवाय यातील मृत्यूचे प्रमाणही अन्य कारणांच्या तुलनेत अधिक आहे.  मोबाइल टॉकिंग,  विरुध्द दिशेने वाहन चालविणे,  क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा माल वाहतूक करणे, वेगाने व हयगयीने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे अशा प्रकारांमुळे सर्वाधिक अपघात होत आहेत. यातल्या अनेकांना वेळेत मदत न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय महामार्गाची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. बेशिस्त वाहनांवर कारवाई करूनही अपघात कमी झालेले नाहीत. तरीही, अपघातानंतर वेळेत मदत करता यावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुसरीकडे वाहनचालकांनी मोबाइलला शक्यतो पॅटर्न लॉक टाकू नये. 'मोबाईल पॅटर्न'मुळे वेळेत मदत मिळत नाही  आणि नाहक जीव जातो. सोलापुरातील पोलिसांनी याबाबतची एक ताजीच घटना सांगितली आहे. यातून लोकांनी बोध घ्यायला हवा.  दिवाळीनिमित्त खरेदी केलेले फटाके फुसके निघाल्याने एक तरुण फटाके बदलून आणायला सावळेश्वर (ता.मोहोळ) येथून बार्शी येथे गेला. रात्री नऊच्या सुमारास बार्शीहून परत येताना बार्शीजवळच पाच-सहा किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकीला मोठ्या वाहनाने समोरुन धडक दिली.  अपघातानंतर तो गंभीर जखमी होऊन रस्त्यालगत पडला. बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी झाली, परंतु त्याच्या मोबाइलला पॅटर्न लॉक असल्याने कोणालाच संपर्क करता आला नाही. काहीवेळाने त्याच्या मोबाइलवर कॉल आला आणि अपघात झाल्याची माहिती संबंधित नातेवाईकाला देण्यात आली. नातेवाईक त्याठिकाणी येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. असे होऊ नये, म्हणून लोकांनी प्रवासावेळी तरी मोबाईला पॅटर्न लॉक न करण्याची काळजी घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




व्यवस्थापन आणि कर्मचारी एसटीच्या दुरवस्थेला कारणीभूत


एखाद्या व्यवस्थेच्या समस्या वेळच्या वेळी सोडवल्या नाहीत, त्यावर परिणामकारक तोडगा काढण्यात सातत्याने चालढकल केली की, ती कशी कोलमडून पडते, याचा प्रत्यय सध्या एसटीच्या बाबतीत येत आहे. एका समस्येचा निपटारा केला नाही, की त्यातून समस्यांची मालिकाच तयार होते. गुंता वाढतो. तोडगा काढणेही जटील होते. महाराष्ट्रातील एसटी एकेकाळी व्यवसायात आणि नफा कमावण्यात देशात अव्वल होती. आशिया खंडात लौकिक होता. आजही सोळा हजारांवर बस, नव्वद हजारांवर कर्मचारी, अडीचशे बस आगार आणि दररोज सुमारे ६५ लाख प्रवाशांची वाहतूक आणि काही कोटींचा इंधनखर्च हा एसटीचा पसारा आहे. ग्रामीण भागाची ही जीवनवाहिनी समस्यांनी ग्रासल्याने जरार्जजर झालेली आहे. खासगीकरणाचे नख लागल्यानंतर लालपरीला ‘हिरकणी’, ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ अशी गोंडस रुपं दिली गेली. एसटीला अगदी टू बाय टू, वायफाययुक्त सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होऊनही एसटीमागील समस्यांची मालिका संपलेली नाही. कोरोनामुळे एसटीच्या बस अनेक महिने आगारात कुलूपबंद होत्या. त्यावर तोडग्यासाठी महाकार्गोसारख्या मालवाहतुकीच्या पर्यायातून काही कोटींची कमाई एसटीला झाली होती. तरीही एसटीला तग धरणे अवघड गेले. 

आजमितीला तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला.  एसटीसमोरील समस्या जटील होत गेल्या. तोट्यातून बाहेर पडण्याचे मार्ग खुंटत गेले, कामकाजातील व्यवस्थापनात्मक ढिसाळपणा, परिणामकारक आणि व्यापारी दृष्टीकोनातून कारभार न चालवणे, स्पर्धात्मक आव्हानांची व्याप्ती लक्षात न घेणे किंवा त्याबरहुकूम स्पर्धात्मकतेत टिकण्यासाठी उपाययोजना न करणे, सरकारनेदेखील एसटीला वेगवेगळ्या सोयीसवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी वेळच्या वेळी निधी न देणे, आधुनिकीकरणासाठी दूरगामी व्यापक आराखडा न करणे, तात्पुरत्या मलमपट्टी स्वरुपात उपाययोजना करणे अशा अनेक बाबींमुळे एसटीचे आर्थिक आरोग्य खालावले आहे. सरकारने आता प्रवाशांना सवलती देणे बंद केले पाहिजे. काही निर्णय कठोर घेणे क्रमप्राप्त आहे.

वास्तविक व्यवस्थापन आणि कर्मचारी दोघेही सध्याच्या दुरवस्थेला कारणीभूत आहेत. व्यावसायिक स्पर्धात्मकता वाढते तेव्हा ‘ग्राहक देवो भव’ या भावनेतून सेवासुविधांची बळकटी करायची असते. स्पर्धकावर मात केल्याशिवाय व्यवसायात टिकता येत नाही. व्यवस्थापनाकडे बोट दाखवताना कर्मचारीदेखील त्यांचे दायित्व आणि जबाबदारी विसरू शकत नाहीत. व्यवसाय वृद्धीसाठी हातभार लावण्यापासून ते प्रवाशांना सौजन्याने सेवा आणि सुविधा देणे, तोटा घटवण्यासाठी उपाययोजना करणे, हात दाखवा बस थांबवा, असे धोरण असतानाही तशीच बस दामटण्याने तोटा वाढेल की कमी होईल? हा विचार न करणे हेही दुरवस्थेला आमंत्रण देणारेच आहे.त्याकडे कानाडोळा करता येणार नाही. लाखो लोकांचा रोजगार आणि त्यांचा कुटुंबकबिला त्यावर अवलंबून आहे.एसटीनेच ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग दाखवला आहे. त्यामुळे सरकारने एसटीच्या व्यापक अस्तित्वासाठी उपाययोजनांवर भर देणे आणि स्पर्धेतही ती तग धरेल, या दिशेने पावले टाकावीत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

देशातले गरीब वाढले


कोरोना काळात हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांचे खायचे वांदे झाले. लॉकडाऊनमुळे अनेकांना काम बंद ठेवून घरात बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचे काय, असा प्रश्न पुढे आला. हा प्रश्न महत्त्वाचा आणि निकडीचा होता. याच अस्थिर वातावरणात शहराकडील मजुरांचे पाय गावाकडे निघाले. यात लोकांचे अतोनात हाल झाले. अनेकांना रस्त्यात खायला देखील मिळाले नाही. काहींनी चालता चालताच दम तोडला. या पार्श्वभूमीवर मार्चच्या अखेरच्या आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री सीतारामन यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मांडली. विविध योजनांच्या द्वारे 1 लाख 70 हजार कोटीची तरतूद केल्याची त्यांनी घोषणा केली. समाजातील गरीब, दिव्यांग, वृद्ध यांना हजार रुपये; महिलांच्या जनधन खात्यात तीन महिने पाचशे रुपये; दर महिन्याला रेशनवर मिळणाऱ्या धान्यात मोफतचे अधिक पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ अशा काही ठळक तरतुदी या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत करण्यात आल्या. गरिबांना बाहेर जाऊन कमवण्याची संधी नाही तेव्हा किमान खायला पुरेसे अन्न मिळावे ही अगदीच प्राथमिक स्वरूपाची मदत रेशनकार्डधारकांना तरी मिळणे शक्य झाले. ही मदत आता या महिन्यात संपुष्टात येत आहे अशी बातमी आली आहे.अर्थात ही मदत सर्वांनाच मिळाली असे नाही. एप्रिल 2020 मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा 75 कोटी लोकांना लाभ मिळाला. नंतर च्या महिन्यात ही संख्या 60 कोटींवर आली. वाढीव धान्य प्रत्येक महिन्याला मिळत नसल्याचा अनुभव काही सामाजिक संस्थांना त्यांच्या सर्व्हेक्षणातून आला आहे.

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचीही हीच गत पाहायला मिळाली. याच सर्वेक्षणात असेही दिसून आले की ज्या महिलांच्या जनधन खात्यात पाचशे रुपये महिना अशी रक्कम जमा करण्यात आली तीही सर्वांपर्यंत पोहोचली नाही. त्यातून सार्वजनिक बससेवा बंद असताना या वृद्ध, दिव्यांगांना वा महिलांना बॅंकेपर्यंत पोहोणेही मुश्कील होत होते. मनरेगाच्या संदर्भात सर्वेक्षणातील कुटुंबांनी सांगितले की ३२ टक्क्यांनी कामाची मागणी केली; परंतु त्यातील अर्ध्याच लोकांना काम उपलब्ध झाले. आता या गरीब कल्याण योजना चालू राहणार नाही म्हणजे जो काही थोडाफार हातभार मिळत होता तोही आता नसणार.

अर्थव्यवस्थेतील मंदावलेली स्थिती बघता गरिबांची लढाई फक्त कोरोनाशी नाही तर ती साधे तगून राहता यावे यासाठीही आहे. सर्वेक्षणाप्रमाणेच इतरही अभ्यास सांगत आहेत की भारतातील गरिबी वाढलेली आहे. 17 टक्के गरीब कुटुंबांनी सांगितले की त्यांना उधार उसनवार करावी लागली, घरातील वस्तू गहाण ठेवून घरखर्चासाठी उचल घ्यावी लागली. याच सर्वेक्षणातील 40 टक्के कुटुंबांनी सांगितले की त्यांना त्यांचा अन्नधान्यावरील खर्च कमी करावा लागला, त्यांनी दूध, अंडी, डाळी, भाज्या यासारख्या वस्तू खरेदीच केल्या नाहीत, कारण ते परवडत नव्हते. अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अभ्यासही अशीच निरीक्षणे देत मांडतो की गरिबांचे सर्वात जास्त नुकसान झाले. त्यांची कमाई या काळात 17 टक्क्यांनी कमी झाली. या समाजातील गरिबांची अवस्था सुधारेल यासाठी काय विचार झाला आहे का किंवा कुठले, धोरण मांडले आहे का, याची चर्चा कुठेच होताना दिसत नाही. गरिबांसाठी योजना चालू राहायला हव्यात, त्यांना कामधंदा मिळायला पाहिजे,कारण सर्वात जास्त नुकसान त्यांचंच झालं आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

'शतपावली'ने आजारांना लावा पळवून!


अलिकडे महागाई बेसुमार वाढली आहे. याचा परिणाम म्हणजे आपलयाला होणाऱ्या आजारांवरच्या औषधांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकदा डॉक्टरांकडे गेल्यावर पाचशेची नोट कधीआपल्या खिशातून गेली कळत नाही. त्यामुळे आता आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. मुळात आजार पळविण्यासाठी केवळ औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन घेणे अथवा बाटल्या रिचवणे गरजेजे आहे असे नाही. कारण कित्येक आजार हे मानवाच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जडत आहेत. असे असले तरी यावर उपायही आहेत.

 शतपावली हा एक उपाय हृदयरोग, मधुमेह, स्थूलता, ताण आदी आजारांना दूर ठेऊ शकतो अथवा नियंत्रणात आणू शकतो. 'शतपावली' चा मोठा आरोग्यदायी फायदा शरीराला होतो. रात्रीच्या शतपावलीमुळे विशेषतः आपली झोपण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणातील अंतर वाढते, जे शरीरासाठी आवश्यक आहे. जीवनशैलीत केलेल्या बदलातूनही आजारांशिवाय सहज, सामान्य जीवन जगू शकतात. कामाचा ताण, रोगट जीवनशैली आणि प्रदूषित अन्नाचे सेवन, व्यायामाचा अभाव अशा विविध प्रकारच्या त्रासांमुळे कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळते.रात्रीच्या शतपावलीमुळे बद्धकोष्ठता कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.शतपावली आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. अलिकडे डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा 'गुगल' सर्च करून आजाराची चौकशी करण्याचा व औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांविषयी संभ्रम निर्माण होण्याची भीती आहे. आपल्या शरीराची माहिती,नोंदी आपण वेळोवेळी ठेवल्यास आपल्याला आजार का झाला,याचे कारण कळून येईल. आणि त्यावर उपाययोजता येईल. रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती तर सुधारतेच पण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून कोविडासारख्या संक्रमणांना दूर ठेवण्यात मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालणं देखील तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. रात्री शांत झोप लागते. चालणे तणाव दूर करण्याचा आणि शरीरातील एंडोर्फिन रिलीज करण्यास देखील मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकते. नैराश्यावर मात करता येते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली