भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी चीनची वाढती आक्रमकता आणि विस्तारवादाला रोखण्यासाठी स्थापन केलेल्या क्वाड या संघटनेची परिषद नुकतीच जपानची राजधानी टोकिओ येथे पार पडली आहे. परिषदेत काय हाती लागलं, हा मुद्दा गौण आहे. संघटनेच्या माध्यमातून चीनवर दबाव टाकणं महत्त्वाचं आहे. हे देश एकाकी नाहीत, हा संदेश मोठा आहे. चीनचा वाढता वर्चस्ववाद जगासमोरचे एक महत्वाचे आव्हान आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या वर्चस्ववादाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोखण्याची आवश्यकता आहे यावर दुमत असण्याचे कारण नाही. रशिया वगळता आपल्या सीमेला लागून असणाऱ्या जवळपास प्रत्येक देशावर चीनने नेहमीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सीमेपासून दूर असणाऱ्या, पण सामरिकदृष्ट्या महत्वाच्या देशांवरही चीनची नजर आहे. केवळ भारताचीच अशी स्थिती नाही. तैवानला चीन त्याचाच भाग मानतो आणि त्याला गिळंकृत करण्यासाठी तो केव्हापासून सज्ज आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स आदी देशांसमोरही चीनने चिंता निर्माण केली आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांसमोरही चीनने आव्हान निर्माण केले आहे. अशा स्थितीत हे सर्व देश एकत्र येऊन त्यांनी चीनच्या विरोधात आघाडी उघडली आहे. क्वाडमधील सर्व देश लोकशाही मानणारे आहेत. तर चीन एकाधिकारशाही असणारा देश आहे. त्यामुळे चीन आपले निर्णय निरंकुशपणे आणि झपाट्याने घेऊ शकतो. तसे लोकशाही देशांचे नसते. त्यामुळे क्वाडच्या निर्णयांची गती मंद असली किंवा काही मुद्यांवर एकमत होण्यास अडचणी येत असल्या, तसेच आतापर्यंतची या संघटनेची कामगिरी एकदम नजरेत भरण्यासारखी नसली तरी, या संघटनेचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही. अशा संघटना स्थापन झाल्या नसत्या किंवा चीनला रोखण्याचे प्रयत्न झालेच नसते, तर चीनने आणखी आक्रमकपणा दाखविला असता आणि त्याच्या आसपासच्या देशांना अधिक मोठा धोका निर्माण झाला असंता. अद्याप चीनने कोणत्याही देशावर थेट हल्ला करुन किंवा युद्ध घोषित करुन लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. पण भविष्यात तो तसे करणारच नाही असे नाही. संघटनेमुळे दबाव कायम राहतो. चीनने लक्ष्मणरेषा ओलांडल्यास क्वाडचे देश ' काय कृती करतात हे त्यावेळी दिसेलच. तोपर्यंत या संघटनेसंबंधी आशावादी राहण्यास काही अडचण नसावी. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
शुक्रवार, २७ मे, २०२२
चीनची खुमखुमी जिरवणे आवश्यक
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांनी चीनची वाढती आक्रमकता आणि विस्तारवादाला रोखण्यासाठी स्थापन केलेल्या क्वाड या संघटनेची परिषद नुकतीच जपानची राजधानी टोकिओ येथे पार पडली आहे. परिषदेत काय हाती लागलं, हा मुद्दा गौण आहे. संघटनेच्या माध्यमातून चीनवर दबाव टाकणं महत्त्वाचं आहे. हे देश एकाकी नाहीत, हा संदेश मोठा आहे. चीनचा वाढता वर्चस्ववाद जगासमोरचे एक महत्वाचे आव्हान आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या वर्चस्ववादाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोखण्याची आवश्यकता आहे यावर दुमत असण्याचे कारण नाही. रशिया वगळता आपल्या सीमेला लागून असणाऱ्या जवळपास प्रत्येक देशावर चीनने नेहमीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सीमेपासून दूर असणाऱ्या, पण सामरिकदृष्ट्या महत्वाच्या देशांवरही चीनची नजर आहे. केवळ भारताचीच अशी स्थिती नाही. तैवानला चीन त्याचाच भाग मानतो आणि त्याला गिळंकृत करण्यासाठी तो केव्हापासून सज्ज आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स आदी देशांसमोरही चीनने चिंता निर्माण केली आहे. अमेरिकेच्या हितसंबंधांसमोरही चीनने आव्हान निर्माण केले आहे. अशा स्थितीत हे सर्व देश एकत्र येऊन त्यांनी चीनच्या विरोधात आघाडी उघडली आहे. क्वाडमधील सर्व देश लोकशाही मानणारे आहेत. तर चीन एकाधिकारशाही असणारा देश आहे. त्यामुळे चीन आपले निर्णय निरंकुशपणे आणि झपाट्याने घेऊ शकतो. तसे लोकशाही देशांचे नसते. त्यामुळे क्वाडच्या निर्णयांची गती मंद असली किंवा काही मुद्यांवर एकमत होण्यास अडचणी येत असल्या, तसेच आतापर्यंतची या संघटनेची कामगिरी एकदम नजरेत भरण्यासारखी नसली तरी, या संघटनेचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही. अशा संघटना स्थापन झाल्या नसत्या किंवा चीनला रोखण्याचे प्रयत्न झालेच नसते, तर चीनने आणखी आक्रमकपणा दाखविला असता आणि त्याच्या आसपासच्या देशांना अधिक मोठा धोका निर्माण झाला असंता. अद्याप चीनने कोणत्याही देशावर थेट हल्ला करुन किंवा युद्ध घोषित करुन लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. पण भविष्यात तो तसे करणारच नाही असे नाही. संघटनेमुळे दबाव कायम राहतो. चीनने लक्ष्मणरेषा ओलांडल्यास क्वाडचे देश ' काय कृती करतात हे त्यावेळी दिसेलच. तोपर्यंत या संघटनेसंबंधी आशावादी राहण्यास काही अडचण नसावी. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
मंगळवार, २४ मे, २०२२
गौण खनिजाचे मिनी केजीएफ
राष्ट्रीय हरित लवादाने नद्यांतून यांत्रिक पद्धतीने वाळू उपशाला बंदी घातली आहे. एकाही नदीतून वाळू उपशाला अधिकृत मान्यता देण्यात आली नाही. मात्र तरीही जो काही उपसा होतोय तो बेकायदा आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर एका सांगली जिल्ह्याचे देता येईल. सांगली जिल्ह्यात 70 खाणपटद्टे अधिकृत असून, सुमारे 159 हेक्टर क्षेत्रावर खणीकर्म सुरू आहे. तात्पुरते परवाने देण्यास हरित लवादाची बंदी आहे. मात्र गौण खनिजावर वर्चस्वासाठी राजकीय मंडळी, गावगुंड ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या खाणींची अवस्था 'मिनी केजीएफ'सारखी झाली आहे. 'केजीएफ' हा अलीकडच्या काळातील तुफान गाजलेला चित्रपट आहे. त्यात जेवढा संघर्ष दिसतोय, तसा संघर्ष भविष्यात इथल्या खणींमध्ये दिसू लागला तर धक्का बसायला नको. यात कोट्यवधीचा काळा बाजार होत असल्याचे आरोप होतात, त्यातून शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घाळून खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत धाडस वाढले आहे. हे समाजस्वास्थ्य बिघडवणारे आहे.
वाळूवर बंदी आल्यावर दगड खाणी, बारीक खडी, कृत्रिम वाळूला प्रचंड महत्त्व आले. बांधकाम, गिलाव्यासाठी त्याचा वापर सुरू झाला. त्यातुन नवा महाकाय उद्योग उभा राहिला आणि लुटीचा मार्गही तयार झाले. जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू झाल्यावर या उद्योगाला गगन ठेंगणे झाले. राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, शहरांतर्गत रस्ते, मोठमोठ्या इमारती, पाटबंधारे विभागाचे कालवे, पूल, रेल्वेचे विस्ताराकरण अशी कामे प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. कोरोनानंतर त्याने गती पकडली आहे. खडी, कृत्रिम वाळू, वाळू, मुरमाची मागणी उच्चांकी आहे. दुसऱ्या बाजूला गौण खनिजाची महसूल वसुली उद्दिष्टाच्या जवळ जायला तयार नाही. गेल्या वर्षी ती 80 टक्के होती आणि यंदा 72 टक्क्यांवर अडली आहे. महसुली कक्षेच्या बाहेरच्या उलाढालीचा हा परिणाम मानला जातो. गेल्या चार-पाच वर्षातील तस्करांचे प्रताप गंभीर आहेत. तस्करांनी अग्रणी, येरळा नदीची लक्तरे तोडली. दगड-खडीसाठी डोंगर रिकामे केले. मुरमासाठी गायराने लुटली. त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास महसुली कर्मचाऱ्यांवर वाहने घालण्याचे धाडस केले. तक्रार केल्यास मारहाण केली. जप्त वाहने दंड भरून सोडवण्यापेक्षा सडायला सोडून दिली. खनिजातून लुटायचे आणि राजकारणात वाटायचे, असा नवा पॅटर्न पुढे आला. सर्वपक्षियांचा सहभाग असल्याने कुणी कुणाविरुद्ध बोलायचे नाही, असे धोरण आले. त्यात महसूल कर्मचारी जीवावर उदार होऊन 'रिस्क' घ्यायला तयार नाहीत.यामुळे राजकारणी आणि गावगुंड , सरकारी कर्मचारी आपली घरे भरू लागली तर महसुलावर पाणी पडू लागले. महसूल विभागाने मनावर घेतल्यास महसूल वाढेल, पण इच्छाशक्ती हवी आहे. मुरमासाठी खणपट्टे तयार करणे शक्य आहे. ग्रामपंचायतींकडे याची जबाबदारी दिल्यास आणि, गावपातळीवर यंत्रणा उभी केल्यास लाभ होणार आहे. मुरूम उपशातून तळ्यांची निर्मिती झाल्यास फायद्याची गावांचा फायदाच होणार आहे. त्याचबरोबर सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण करून खणपट्ट्यांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. यातून संघर्ष उभा राहणार नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
श्रीमंतांना अधिक कर लावा
कोरोना महामारीने जगाला भयंकर धडा शिकवला. लोकांचे लॉकडाऊनमुळे अतोनात हाल झाले. अनेकांना आर्थिक फटका बसला. काहींच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात झाली. काहींची आर्थिक घडी कोलमडून गेली. कोरोनाने अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या. मात्र याचवेळी काहींना अतोनात फायदाही झाला. ऑक्सफॉम’ या ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेनुसार कोरोनाच्या महामारीने दर 30 तासांत एक नवीन अब्जाधीश निर्माण केला आहे आणि आता दहा लाख लोक त्याच गतीने दारिद्र्यात लोटले जाऊ शकतात. अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) बैठकीसाठी जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित वर्ग एकत्र आले होते. त्यामध्ये मत मांडताना ‘ऑक्सफॉम’ने म्हटले आहे की,या गरिबीत लोटल्या गेलेल्या दुर्दैवी फेरीवर मात्रा म्हणून गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर कर लावण्याची वेळ आली आहे. खरोखरच याचा विचार झाला पाहिजे.
रविवार, २२ मे, २०२२
एटीम मशिन्स 'रामभरोसे'
चोरट्यांकडून एटीएम मशीन फोडून रोख रक्कम पळवून नेण्याचा प्रकार वाढला आहे.लाखो रुपये साठवून ठेवणाऱ्या या एटीएमची सुरक्षा मात्र 'रामभरोसे' ठरली असल्याने गेल्या काही वर्षांपासून चोरट्यांनी ‘एटीएम’ फोडण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सांगली जिल्ह्यातील शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे 21 मे 2022 रोजी चोरट्यांनी दरोडा टाकून 22 लाख 34 हजारांची रोकड असलेली मशिनच पळवून नेली. यापूर्वीही जिल्ह्यात ,राज्यात आणि देशात अनेज ठिकाणी एटीएम मशिन फोडण्याचे प्रयत्न झालेत. त्यामुळे 'एटीम' च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत बँकांनी शाखांबरोबर ‘एटीएम’चे जाळे पसरवले आहे. लाखो रुपये भरणा होत असलेल्या एटीएम केंद्रामुळे ग्राहकांची सोय होते. बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी होऊन त्यांना तत्काळ पैसे काढता यावेत यासाठी सर्वच बँकांच्या शाखांनी ‘एनी टाईम मनी’ अर्थात एटीएम केंद्रे सुरू केली. सुरुवातीला बँकेच्या शाखेबाहेरच एटीएम असायचे. परंतु, सध्या ग्राहकांची गरज ओळखून एटीएमचे जाळे शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत विस्तारले गेले. सुरुवातीला एटीएम केंद्रामध्ये सुरक्षारक्षक रात्रपाळीला तैनात असायचे. परंतु, सध्या बऱ्याच एटीएममधील चित्र बदलले आहे. बँकांच्या शाखाबाहेर असलेल्या एटीएममध्येच रक्षक असतो. इतरत्र असलेले ‘एटीएम’ केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावर सुरू आहेत.त्यामुळे इथली सुरक्षा ‘रामभरोसे’च म्हणावी लागेल.एटीएम मशिनमध्ये एकावेळी 25 लाखांहून अधिक रक्कम भरून ठेवली जाते. चार माणसे सहजपणे उचलतील अशा आकाराची मशिन्स सध्या आहेत. एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्यातील आरग (ता. मिरज) येथील एटीएम जेसीबीने फोडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वाटेत जेसीबीमधून मशिन पडल्यामुळे 24 लाखांची रोकड वाचली. परवा एटीएम पळवून नेऊन 22 लाख रुपये पळवले. त्यामुळे सुरक्षा रक्षक नसलेले एटीएम चोरट्यांच्या ‘टार्गेट’ वर असल्याचे दिसून येते. एकट्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँकांची 300 हून अधिक एटीएम केंद्रे आहेत. बँकांच्या एटीएम सुरक्षेसाठी बँकांनी तातडीने प्रत्येक एटीएममध्ये आत व बाहेर ‘सीसीटीव्ही’ बसवावेत. तसेच सुरक्षारक्षक तैनात करावेत. आरबीआयने एटीएम केंद्र स्थापन करताना काही मानके ठरवून दिली आहेत. त्यामध्ये आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, सायरन यंत्रणा, फ्लॅश लाईटस् आदी प्रमुख मानकांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. सायरन व फ्लॅश लाईटस्ला अनेक ठिकाणी फाटा दिल्याचे दिसून येते. बँकांनी एटीएम सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना दंड आकारण्यात यावा.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
काँगेस सोडलेले संपले
राजस्थानातल्या उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांना म्हणाल्या,'पक्षाने तुम्हाला खूप दिले,आता तुमची वेळ आहे' आता ही मंडळी पक्षाला किती आणि काय देतील हे बघावे लागेल. वास्तविक धर्मांध शक्तीविरुद्ध लढण्यासाठी काँग्रेस शिवाय पर्याय नाही,हे देश ओळखून आहे. त्यामुळे सध्याला एकजुटीची गरज आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची घसरण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र काँग्रेस संपलेली नाही. याउलट काँग्रेसमधून बाहेर पडलेले संपले आहेत. आज काँग्रेसचे लोकसभेत 53 खासदार, राज्यसभेत 36 खासदार आहेत. देशातल्या विधानसभांमध्ये 691 तर परिषदेत 46 आमदार आहेत. काँग्रेसने भरभरून दिले असतानाही पक्षाच्या वाईट काळात ज्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला ती मंडळी राजकारणातून संपलेली आहेत. पक्ष सोडलेले बहुतांश लोक भाजपात जाऊन 'शुद्ध' झाले आहेत, असा इतिहास आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह हे ताजे उदाहरण आहे. यातल्या काहींना सत्तेचा मोह आहे तर काहींना तुरुंगाचे भय आहे. ज्याने स्वतःच्या उज्ज्वल भविष्यापलिकडे राजकारणात कोणतेही दिवे लावले नाहीत,स्वतःच्या समुदायाचा,जातीचा उपयोग केवळ स्वतःला नेता म्हणून आकार देण्यासाठी करवून घेतला, अशांनी काँग्रेस सोडली. तेच मंडळी आता वृत्तपत्राच्या कोपऱ्यातसुद्धा शोधून सापडत नाहीत. त्यांची पक्षासाठी उपयुक्तता किती होती,हाही खरे तर चिंतनाचा विषय आहे. काँग्रेस संपवायला काहींनी देव पाण्यात घालून बसले आहेत, परंतु ती कधीच संपणार नाही. प्रत्येकाला वाईट काळ असतो. निसर्गचक्र फिरत राहते. पुन्हा पुन्हा मुक्कामाचे ठिकाण येत राहते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता निसर्गचक्र वेगाने मार्गक्रमण करेल, असेच दिसते आहे. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
शुक्रवार, २० मे, २०२२
जग आर्थिक महामंदीच्या उंबरठय़ावर
संपूर्ण जगभरातच मंदीचे संकट असून अमेरिकेसारखे विकसीत देश मंदीच्या उंबरठय़ावर असल्याचे सांगितले जात आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) घरसण होते, त्याला अर्थशास्त्रात मंदी असे म्हणतात. दोन, तीन किंवा सहा महिन्यांपर्यंत ही मंदी असते. तर जीडीपीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यास त्याला आर्थिक धीमी गती (इकोनॉमिक स्लो डाऊन) म्हणतात. तसेच अर्थशास्त्रात डिप्रेशन किंवा महामंदी म्हणून एक संज्ञा आहे. हे सर्वाधिक धोकादायक असते. देशाचा जीडीपीचा दर १0 टक्क्यांच्या खाली गेल्यास त्याला महामंदी म्हणतात. पहिल्या महायुद्धानंतर जगभरात आलेल्या महामंदीला द ग्रेट डिप्रेशन असे म्हणतात. आता जग अशाच महामंदीच्या उंबरठय़ावर उभे आहे. महामंदीसाठी पाच महत्त्वाची कारणे सांगण्यात येतात. त्यात कोरोना महामारी हे प्रमुख कारण आहे. २0१९ पासून जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. या महामारीमुळे आरोग्य संकटासोबतच मोठे आर्थिक संकटही निर्माण झाले. अनेक कंपनाही काही प्रकल्प बंद झाले. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचे समीकरण बिघडले आणि आता जगाला महागाईचा सामना करावा लागत आहे.
रशिया- युक्रेन युद्धामुळेही मंदीचे संकट वाढले आहे. हे युद्ध काही आठवड्यातच संपेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अद्यापही संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गहू, कच्चे तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेमध्ये मोठे आर्थिक संकट आले आहे. वाढत्या महागाईने या संकटात तेल ओतले आहे. भारतात महागाईचा दर उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. जगातील अनेक देशात अशीच परिस्थिती आहे. अमेरिकेतही महागाईचा दर ८.५ टक्क्यांवर पोहचला आहे. हा ४१ वर्षातील उच्चांकी स्तर आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे अनेक देश झपाट्याने मंदीकडे वाटचाल करत आहेत. महागाई आटोक्यात आणण्यासाठी कर्ज देण्यात येत आहे. कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे बँका व्याजदरात वाढ करत आहेत. भारतात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.४0 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे कर्ज आणि ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकही मोठय़ा प्रमाणात व्याजदरात वाढ करत आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे आर्थिक संकट वाढत आहे. कच्चा तेलाचा निर्यातक असलेल्या रशियावर जगाने आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. रशियावरील निबंर्धामुळे एप्रिल महिन्यात त्यांचे उत्पादन ९ टक्क्यांनी कमी झाले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दराचा फटका विकसनशील देशांना बसत आहे.साहजिकच जग आर्थिक महामंदीच्या उंबरठय़ावर उभे ठाकले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
बाजारपेठेचा अभ्यास पक्का असावा
रशिया युक्रेनमधील लांबलेल्या युद्धाने जगभरातील अर्थकारणाचा डोलारा हेलकावे खात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी “भारत जगाला गहु पुरवेल’, अशी हमी दिली. तथापि, देशातील उन्हाच्या तडाख्याने जनतेच्या ताटातील चपातीदेखील करपू लागली. गहू आणि आटट्याच्या दरात 20 ते 40 टक्क्क्यांपर्यंत वाढ झाली. ग्राहकवर्ग अस्वस्थ झाला. या वाढत्या महागाईमुळे दरनियंत्रणासाठी सरकारवर दबाव येणार हे उघडच होते. त्यामुळे निर्यातीला मुभा जाहीर करणाऱ्या सरकारने निर्यातबंदीचे पाऊल उचलले. या घडामोडींतून जागतिक तसेच देशांतर्गत बाजारपेठांच्या अभ्यासातील त्रुटी, तसेच धोरणनिश्चितीतील उणिवा समोर आल्या. शेतकरी, शेतमाल यांच्याबाबत धोरण ठरवताना बाजारपेठेचा अभ्यास पक्का असावा लागतो. भविष्यातील परिणामांचा अभ्यासाध्यारित अंदाज ही बाब महत्त्वाची ठरते. त्यात यंत्रणा मागे पडते तेव्हा धोरणात धरसोड दिसते. त्यामुळेच गहू, कांदा, सोयाबीन पेंड यांच्या निर्यातीबाबतचे निर्णय अंगलट आले होते. आताही तसेच झाले आहे. गहू निर्यातबंदीमुळे जर्मनीने आपल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. जी-7 संघटना तसेच अमेरिकाही भारताने बंदी मागे घ्यावी, या मताची आहे. खरेतर जागतिकीकरण झाले म्हणजे सगळेच खुले असे नव्हे. त्यालाही व्यवहाराची चौकट आलीच. पण व्यापार हा भरल्यापोटीच शक्य असतो. देशातील जनतेला उपाशी ठेवायचे आणि निर्यातीतून पैसा कमवायचा याला उफराटपणा म्हणतात. जागतिकीकरण कितीही व्यापक झाले तरी त्याला देशांतर्गत गरजांच्या पूर्ततेनंतरच अग्रक्रम द्यावा लागतो. आपण खरेतर कृषिप्रधान जरी असलो तरी जागतिक बाजारपेठेतला आपला वाटा तुलनेने खूपच कमी आहे. त्याला सरकारची धोरणे आणि त्यांच्या संरचनात्मक व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारखे देश आक्रमकपणे शेतमालाच्या विक्रीबाबत धोरण आखतात. त्याला व्यावसायिक तज्ज्ञ अभ्यासकांच्या, मार्गदर्शकांच्या शिफारशी, तसेच भविष्यात जागतिक बाजारपेठेत कोणते वारे वाहील, हे लक्षात घेऊन देशांतर्गत पीकपद्धतीचे नियोजन करतात. अशी स्थायी स्वरूपाची यंत्रणा आपल्याला गरजेची आहे. तरच गहू असू दे नाही तर कांदा, त्याच्या निर्यातीबाबत धोरण ठरवताना धरसोड आणि त्यातून बळिराजाच्या पोटावर मारावे लागणार नाहो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली












