सोमवार, २७ जुलै, २०२०

एचआयव्ही'पेक्षाही घातक कावीळ

शरीरातील बिलिरुबीन वाढणे म्हणजेच कावीळ होणे. या रोगाचा व्याप मोठा आहे. ए पासून तर जीपर्यंत या रोगाचे विविध प्रकार असतात. यात बी व सी या प्रकारचा काविळ हा एच.आय.व्ही पेक्षाही जास्त धोकादायक असते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कावीळ रुग्णाबाबत जगात भारत देशाचा ६ वा क्रमांक लागतो. दूषित पाण्याचा पुरवठा हे कावीळ पसरण्याचे प्रमुख कारण असते. खरे पाहता काविळ सर्वसाधारणपणे पावसाळ्यात होते. कारण पावसाळ्यात अनेक प्रकारचे पाणी, एकमेकांत मिसळल्याने ते दूषित होण्याचा धोका जास्त असतो. तसेच ज्या भागात मुळातच पाणीटंचाई आहे, तिथे तर हा धोका अधिक जास्त असतो. या रोगात लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन बिलिरुबीन (पिवळा पदार्थ) झपाट्याने वाढतो व प्रसंगी यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. या पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाण वाढले की लघवी ही जास्त पिवळी होते आणि डोळे व त्वचा पिवळी दिसते. सतत राहणारा मध्यम ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणे, मळमळ, उलटी ही मुख्य लक्षण आहेत. ग्रामीण भागात व शहरातल्या झोपडपट्टय़ांत हा आजार जास्त आढळतो. काविळीचे विषाणू रुग्णाकडून विष्ठेमार्फत आणि दूषित अन्न, पाण्यामार्फत इतरांकडे पसरतात. प्रदूषित समुद्री मासळीनेही हे विषाणू पसरतात. पाणी उकळल्यामुळे एक मिनिटात हे विषाणू नष्ट होतात. सहसा भारतात लहान वयातच हा संसर्ग होतो व त्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होते. दरवर्षी या रोगाचे रुग्ण वाढताहेत. या आजाराचा खर्च हा ४५ ते ५0 हजार रुपये इतका आहे. मात्र, केंद्र सरकारने या रोगावर आता मोफत ईलाज सुरू केला आहे. हिपॅटायटीस बी या काविळमध्ये लिव्हर खराब होत असल्याने त्याचे लिव्हर ट्रान्सफरण करावे लागते. मात्र वेळीच उपचार घेतल्याने हा आजार बरा होतो. साहजिकच लोकांनी काळजी घेताना पाणी उकळून थंड करून प्यावे. पावसाळ्यात याबाबत अधिक काळजी घ्यायला हवी.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

1 टिप्पणी: