सोमवार, २७ जुलै, २०२०

देशाची प्रगतीच होतेय

ब्रिटिश राज्यकर्ते भारतातून जाऊन आज 73 वर्षे होताहेत. त्यांची सत्ता गेल्यापासून आतापर्यंत आपल्याच नेत्यांची सत्ता आहे. कधी या राजकीय पक्षाची तर कधी त्या पक्षाची! कधी अनेक पक्षांच्या आघाडीची.पण एतद्देशीय-नेटिव्ह भारतीय नेत्यांनीच या देशात सत्ता आहे हे निर्विवाद. आज देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. लोककल्याणाच्या असंख्य योजना इथल्या गरीब लोकांसाठी चालू आहेत. विशेष म्हणजे आपल्या देशाचा सातत्यानं विकास आणि विकासच होत आहे. हे कोणी नाकारत नाही. विज्ञानाधिष्ठित प्रगतीची वाटचालही अखंडित चालू आहे. तरीही देखील आपल्या देशात अंधश्रद्धा वाढतच चालली आहे. बेकारी वाढत आहे. महागाईचा प्रचंड असा भस्मासूर देशात हैदोस घालतो आहे. लाचलुचपत, भ्रष्टाचार हेदेखील इतरांकडे वाढतच चालले आहेत. अजूनही इथे समान संधीचा अभाव आहे. श्रीमंत श्रीमंतच होत चालला आणि गरीब अति गरीब होत चालला आहे. स्त्रियांवरचे अन्याय-अत्याचारदेखील वाढत चालले आहेत. आता त्याला कुठलाच धरबंध राहिला नाही. एका वर्गानं दुसऱ्या वर्गाची लूट करणं चालूच आहे नव्हे त्यातही वाढ झाली आहे. एका जातीनं दुसऱ्या जातीवर अन्याय-जुलूम करणं, जातीजातींमध्ये , विविध धर्मियांमध्ये हाणामाऱ्या होणं, बलात्कार अशा घटना वाढतच चालल्या आहेत. इतकंच काय आता पूर आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती वाढू लागली आहे. स्वप्नातही पाहिल्या नाहीत, अशा घटना घडू लागल्या आहेत. पाणी टंचाई आणि अपघात यातही प्रगतीच आहे. पक्षी-प्राणी-झाडे अशांची तस्करीचा आलेखदेखील वाढतोच आहे. कोरोना संसर्गाच्या काळातदेखील सावकार शेतकऱ्याला पिळतोच आहे. कोविड-19 तही वरपासून खालपर्यंत लूटमार करण्याची साखळी वाढतच आहे. 

काही माणसं आपलं आपलं बघत आहेत, जे पूर्वी चालत होतं. यातही आता वाढच झालेली दिसते. आता तर समाजाचे 'मसीहा' वाढले, तसे फायदा उपटण्यासाठी समाजाची संख्याही वाढली. गरीब,मागास म्हणून घ्याला उच्च समाजही उठून बसू लागले. आपल्या समाजाचा फायदा करून घेण्यासाठी निरनिराळे दबावगट निर्माण करून सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्याचे उद्योगही काही लोकांकडून चालू राहिले. आपल्या देशात वीज,पाणी,जमीन या गोष्टी सोडून सगळ्या गोष्टी वाढत आहेत. सगळ्या क्षेत्रात प्रगती सुरू आहे. देशाचा व्याप आणि पसाराही चोहोबाजूंनी वाढत आहे. लोकसंख्येचा तर महाविस्फोटच झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आणि आज ती 135 कोटीपर्यंत पोहचली आहे. आणखी काही वर्षांत ही संख्या चारपट होईल.
लोकसंख्या वाढली तसा सोयी-सुविधांचा अभावही वाढला. आजही 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक शिक्षण, आरोग्य, निवास, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. धर्मविषयक कल्पना अधिक व्यापक आणि उदात्त होत चालल्या आहेत. सुराज्य आणि स्वराज्य या संकल्पनाही अजून स्वप्नवतच आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाली तेव्हा आणि आता यातले आता सारे संदर्भ आणि काही प्रमाणात परिस्थितीही बदललेली आहे. त्यामुळे आज हे सगळे प्रश्न सोडवायचे म्हटले तरी पूर्वीची जुनी, तशीच्या तशी उत्तरं योग्य ठरणार नाहीत. पुरीही पडणार नाहीत. नवनवीन उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत. सारे संदर्भ बदलले असल्याने त्या संदर्भांचा नव्याने विचार करून या नवीन समस्यांवर आपल्याला तोडगे काढावे लागणार आहेत. आणि हे काम वाटते तितके सोपे नाही.  यासाठी सद्याच्या परिस्थितीच्या संदर्भात नवीन उत्तरं शोधण्यासाठी आजच्या स्थितीचे सम्यक, सुस्पष्ट अवलोकन करणं आणि यथायोग्य ज्ञान होणं आवश्यक आहे. हे सारे होण्यासाठी आपल्या मनाची वृत्ती आणि बुद्धीची शक्ती जाणत्या  राजाची व्हायला हवी. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे, असे हृदयावर हात ठेवून म्हणतानाच  महत्त्वाचे म्हणजे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, ही भावना आतून उचंबळून आली पाहिजे. तेव्हाच आपल्या देशाची खरी उज्ज्वल प्रगती अनुभवयास मिळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा