रविवार, १२ जुलै, २०२०

'लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज'

राज्यात नाशिक,पुण्या-मुंबईसह मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही चिंता वाढवणारी असली तरी आता पुन्हा लॉकडाऊन याला पर्याय नाही. सध्या पुण्यात,सोलापूर शहरात लॉकडाऊन लादण्यात आला आहे. याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या शहर आणि गावांमध्ये 'जनता कर्फ्यु' लावला जात आहे. यापूर्वी तब्बल तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. बाधितांची संख्या कमी करण्यासाठी  हा लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांडून कोणत्याही नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यायला हवे, नाहीतर मग कशालाच काही अर्थ राहणार नाही.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोना संपल्यासारखे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यात गर्दी करणे, सोशल डिस्टिन्सिंग न पाळणे, मास्कचा वापर न करणे या सगळ्या गोष्टींना नागरिकांनी हरताळ फासला. साहजिकच यामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली. लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळणे ही प्राथमिकता असायला हवी, हे लोकांना का कळत नाही. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने चांगले प्रयत्न केले. तरीदेखील रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे त्याचा फारसा उपयोग झाला नाही. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियामांचे पालन, शिस्त प्रत्येकाडून पाळली गेली पाहिजे, तरच कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटू शकते. मास्क वापरण्याची सवय सध्या झालेली आहे. मात्र मास्क धुणे, नीट व्यवस्थित लावणे, सोशल डिस्टिन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.  कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती, आहारशैली चांगली असल्याने बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे.  लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, अनेक वस्तूंचे उत्पादन थांबले. देशासह राज्यांची अर्थव्यवस्था ठप्प झाली. आता पुन्हा लॉकडाऊन लादून आणखी समस्या उभी करणे, कुणालाच परवडणारे नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांची शिस्त पाळणे अधिक गरजेचे आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा