सोमवार, २७ जुलै, २०२०

महाराष्ट्राला झालेली भूतबाधा कधी जाणार?

2013 पासून राज्यात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन या नावाने एक कायदा लागू झाला आहे. अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यामुळे देशभरात राज्याचे कौतुकही झाले. परंतु, आज  त्याच्या अंमलबजावणीची काय परिस्थिती आहे. जादूटोण्याच्या संशयावरून चौघांना नग्न करून त्यांची धिंड काढण्याचा व त्यानंतर जाळून मारण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर जवळच्या राजापुरात काळाच्या रविवारी घडला. त्याचबरोबर कल्याणमधील खडकपाडा परिसरात अंगात संचारलेले भूत उतरविण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून तंत्रमंत्रानंतर केलेल्या बेदम मारहाणीत एका वृद्धेसह तिच्या मुलाचा मृत्यू झाला. आणि दोन दिवसांपूर्वी नागपूरजवळच्या खापरीतील एका वृद्धाची जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार उजेडात आला होता. या घटना आपण अजूनही किती मागासलेले आहोत आणि किती अंधश्रद्धेने बुरसटलेले आहोत,याची प्रचिती येते. आपण कायदे केले पण त्याची अंमलबजावणी करतानाच जनजागृती करण्यात कमी पडत असल्याचेही दिसत आहे. आपले इष्ट व्हावे आणि अरिष्टाचे भय नाहीसे व्हावे, अशा तीव्र भावनेतून कर्मकांडे केली जातात. आपल्या अव्यक्त मनाची ती कदाचित अभिव्यक्ती असेल. पण समाजात चिकित्सक बुद्धी आणि विज्ञानवाद रुजविण्यात आपली व्यवस्था आणि ते अंगी बाणविण्यात समाज म्हणून आपण कमी पडलो. माणूस हा सामजिक प्राणी आहे. समाजात आणि समुदायात तो राहाते. समुदायाप्रमाणे वर्तन करतो. अनेकदा आपली वैयक्तिक तार्किक बुद्धी समुदायात मंदावते, असे सांगितले जाते. त्यातून अनेक कल्पना जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. ती जळमट साफ करण्यासाठी कायद्याला प्रबोधनाची जोड द्यावी लागेल.अनिष्ट, अघोरी व अमानवी गैरसमजुतींमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची सकारात्मक, प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अनेकांचे शोषण थांबेल. जीवही वाचतील. हा अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात व्हावा, यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अविश्रांत मेहनत घेतली. ज्या मूल्यांसाठी या माणसाने आयुष्य वेचले, प्रसंगी त्या मूल्यांसाठी प्राणही वेचले. मात्र आपण लोकांना विज्ञाननिष्ठ बनवण्यात कमी पडत आहोत. कायदा झाला, पण ग्रामपातळीवर त्याची जनजागृती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्य सरकारने आता यागोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.  विविध माध्यमातून राज्यभर जनजागृतीसाठी जाहीर सभांचे आयोजन होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यशाळा घ्यायला हव्यात. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा शासन पातळीवरून ठिकठिकाणी घेण्याची गरज आहे. तरच विवेकाला झालेली भूतबाधा आपल्याला दूर सारता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा