बुधवार, २९ जुलै, २०२०

रोजगार निर्मितीशिवाय गरिबी संपणार नाही


विविध कौशल्याचा उपयोग करून नवीन उद्योग उभे करून लोकांना रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. जोपर्यंत लोकांना रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत गरिबी आणि भूकमारी संपणार नाही. अनेक योजना आणून रोजगार निर्माण कसा करता येईल, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायाला हवा. गरिबी, भूकमारी व बेरोजगारी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आली आणि रोजगार उपलब्ध झाला तरच विकास होईल. प्रत्येक जिल्ह्याची क्षमता ओळखून लहान-लहान उद्योगांचे क्लस्टर तयार झाले पाहिजे. या भागातील प्रमुख पीक असलेल्या पिकांपासून काय काय निर्माण होऊ शकते, याचा विचार होऊन, तसे उद्योग सुरू झाले पाहिजे. तांदळाचा पुरेसा साठा असल्यामुळे त्याऐवजी आता कोणते नवीन पीक घेता येईल? बाजाराची मागणी काय, ते पीक आणि त्यापासून तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून उद्योगांचे क्लस्टर तयार करावे लागतील. आपला भारत देश खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करत आहोत. तेल बियाणांचे अधिक उत्पन्न घेतल्यास परकीय गंगाजळी वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग, करडई, सूर्यफूल यांचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.  गूळ, उदबत्तीच्या काड्या, मध, बांबू, नीरा, मोह या उद्योगांच्या समूहातून महिलांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तांदळापासून इथेनॉल तयार झाल्यानंतर उरलेल्या पेस्टमधून पशुखाद्य तयार करता येईल. ज्वारीपासून साखर किंवा मद्यनिर्मिती करण्याकडे लक्ष वेधल्यास जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल. वास्तविक रोजगार निर्मिती हे आपल्या देशासमोर एक आव्हान निर्माण झाले आहे. जोपर्यंत उद्योग निर्मिती वाढणार नाही, तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाहीत. यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि १00 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बाजारात आणि विविध क्षेत्रात खेळते भांडवल येणे आवश्यक आहे. बाजारात खेळते भांडवल यावे यासाठी सार्वजनिक खाजगी आणि परकीय गुंतवणूक विविध क्षेत्रात होणे आवश्यक आहे. यामुळेच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद तसेच पायाभूत सुविधा या क्षेत्रात गुंतवणुकीच्या क्षमता अधिक आहेत. लोकप्रतिनिधी आणि सरकारांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा