सोमवार, ६ जुलै, २०२०

ई-कचरा वाढ चिंताजनक

खराब झालेले फ्लॅट स्क्रिन टीव्ही, मोबाईल आणि
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ई -कचरा वाढतच असून 2018 पेक्षा 2019 मधील ई -कचऱ्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. 'ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2019 मध्ये जागतिक पातळीवर 53.6 लाख मेट्रिक टन ई- कचरा जमा झाला होता. यापैकी फक्त 17.4 टक्के कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया झाली आहे. ज्या देशांमध्ये ई- कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अस्तित्वात आहे, तेथेही पुनर्प्रक्रियेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या ई- कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी कल्पनेच्या पलिकडे तर आहेच, पण सध्या ज्या प्रमाणात हा कचरा निर्माण होतो आहे, तो अत्यंत धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ई-कचरा करण्यामध्ये जे अव्वल देश आहेत, त्यात भारताचाही क्रमांक लागतो. चीन (10.1 लाख मेट्रिक टन), अमेरिका (6.9 लाख मेट्रिक टन) आणि भारत (3.2 लाख मेट्रिक टन) कचरा करणारे देश आहेत. 350 जहाजे भरतील, इतका हा कचरा आहे.  या कचऱ्यातून 98 दशलक्ष टन कार्बन हवेत सोडला जातो. वॅशिंग मशीन, फ्रीज, एसी यांना दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने ई-कचराही वाढत चालला आहे. कित्येक देशांमध्ये कचरा व्यवस्थापन यंत्रणा अद्याप पूर्णपणे विकसित झाली नाही शिवाय अधिक टिकणाऱ्या आणि कमी हानिकारक असलेल्या वस्तूंच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ई-कचऱ्याच्या पुनर्वापराकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ई-कचऱ्यात वाढ होत चालली असून यामुळे मानवी आरोग्यालाच अधिक धोका पोहचत आहे. ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच पुनर्वापरही वाढायला हवा आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे रोज नवनवीन मोबाईल संच बाजारात येत आहेत. त्यामुळे खराब झालेले मोबाईल किंवा जुने झालेले मोबाईल उपयोगाला येत नसल्याने कोठेही फेकून दिले जातात. काहीजण त्यातील लागणारे भाग सुटे करताना जाळण्याचे काम करतात. या धुरातून विषारी वायू हवेत पसरतात. हे विषारी वायू मानवी शरीराला फार धोकादायक असतात. कॅन्सरसारखे रोग होतात. हीच तऱ्हा संगणक, टीव्ही, एसी, फ्रीज यांच्याबाबतीत आहे. त्यामध्ये सुमारे एक हजार घातक (टॉक्‍सिक) पदार्थांचा वापर केलेला असतो. ज्यामुळे जमीन आणि त्याखालील पाणी प्रदूषित होऊ शकते. घातक पदार्थ म्हणजे कॅडमियम, पारा (मर्क्‍युरी), शिसे (लीड), हेक्‍साव्हॅलेंट क्रोमियम, प्लॅस्टिक, पीव्हीसी, बीएफआर, बेरिलियम यांच्यासह कार्बन ब्लॅक आणि जड धातू (हेवी मेटल्स) यांसारखे कार्सिनोजेन्स यांचा समावेश या उत्पादनांमध्ये असतो. त्यांच्या संपर्कात कोणी आल्यास सतत डोके दुखणे, चिडचिड होणे, मळमळणे, उलट्या होणे आणि डोळे व मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका संभवतो. पुनर्प्रक्रियेशी संबंधित असलेल्यांना यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूशी संबंधित आजार होण्याची शक्‍यता असते. यामुळे विघटन, पुनर्वापर प्रक्रिया यांचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा