रविवार, १२ जुलै, २०२०

प्रियांका गांधींना करा काँग्रेस अध्यक्ष

सध्या काँग्रेस पक्षाला कोणी वाली राहिला नाही. राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील एक एक राज्ये भाजपच्या गळाला लागत आहेत. कर्नाटक नंतर मध्यप्रदेश काँग्रेसच्या ताब्यातून निसटले आहे.आता राजस्थानची वाटचालही त्याच दिशेने चालू असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर2022 मध्ये देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशची पंचवार्षिक विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे, शा परिस्थितीत एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची झालेली वाताहत पूर्वपदावर आणण्यासाठी काँग्रेसला कणखर नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्वगुण असले तरी ते परिणामकारक ठरताना दिसत नाही.
शिवाय त्यांची काही वक्तव्ये बालिशपणाची वाटत असल्याने काँग्रेसमध्येच त्यांच्या वक्तव्यावर हस्यस्फोट होत असतात. त्यामुळे राहुल नेहमीच जनता आणि विरोधकांकडून 'ट्रोल' होत असतात. ते कितीही जबाबदारीने वागण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांचा राजकारणाविरहित पिंड वारंवार समोर येतो.   
    गांधी घराण्याचा युवराज म्हणून त्यांना पुढे करण्यात येत असले तरी त्यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा येत आहेत. आणि या मर्यादा राहुल भेदू शकणार नाहीत,त्यामुळे त्यांच्यावर इतर जबाबदारी देऊन प्रियांका गांधी यांना पक्षाची धुरा सोपवावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा जनता त्यांच्यात इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचे नेतृत्व पाहात आहेत. या दोघांच्या कार्यकाळात पक्षाची भरभराट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व महिलेकडे देऊन काँग्रेसमध्ये ऊर्जितावस्था आणण्याची गरज आहे. आज जी काँग्रेसची अवस्था झाली आहे, तशी अवस्था दीर्घकाळ भाजपची होती. आज भाजपला मिळालेले वैभव एकेकाळी काँग्रेसच्या घरात पाणी भरत होतं. त्यामुळे काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर नेतृत्वाची चावी प्रियांका गांधी यांच्याकडे सोपवावी लागेल.
प्रियांका गांधी यांना अडसर स्वतः राहुल गांधी आहेत. युवराजला नाकारून मुलीच्या हाती सत्ता सोपावणे सोनिया गांधींना कठीण जात असलं तरी आज त्याची गरज आहे. पंडित नेहरू यांना इंदिरा गांधी यांच्याकडे देशाची आणि काँगेस पक्षाची धुरा सोपावताना पर्याय नव्हता. मात्र आता नाईलाज आहे. मुद्दामहून आज युवराज राहुल यांना डावलून प्रियांका यांच्याकडे नेतृत्व सोपवावे लागणार आहे. यासाठी राहुल यांनी स्वतः पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांनी स्वतः अध्यक्षपद नाकारले असल्याने त्यांनी प्रियांका यांची शिफारस करायला काहीच हरकत नाही. आज पक्षाची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. दक्षिण भागातून पक्ष नेस्तनाबूत होत आहे. उत्तर भागातही काँग्रेसच्या हातात काही राहिलेले नाही. कर्नाटक, मध्यप्रदेश हातचे गेले आता राजस्थानसारखा प्रदेशही हातून जाण्याची शक्यता दिसत आहे. शिवाय दोन वर्षात उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पाठोपाठ देशाच्या लोकसभा निवडणुका होत आहेत. या कालावधीपर्यंत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी वेळ मिळणार आहे. यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा